बरं झालं दुसरं महायुद्ध झालं, त्यामुळेच तर बिकिनीचा शोध लागला..
सध्या भारतात विषय रंगलाय, बिकीनीचा. रंग कुठला, चांगली दिसती का नाही, घालायला पाहिजे होती का नाही. न संपणारा राडाय. आता आपण पडलो इतिहासात रमणारी माणसं, आपल्याला आवडो न आवडो दीपिका काय ड्रेस बदलणार नाही, मग म्हणलं जरा डीप जावं…
…इतिहासात ओ!
दुसऱ्या महायुद्धाचा तयारीचा काळ. अमेरिकेने आपल्या न्युक्लियर मिसाईलच परिक्षण केलं होतं. हे परिक्षण केलं होतं त्या ठिकाणाचं नाव होतं बिकिनी अटोल.
नेमकं त्याच काळात अमेरिकेत सन बाथची फॅशन आली होती. अमेरिकेत एकाच वेळी काय काय चालू असतं बघा. तर तेव्हा अमेरिका पण सनातनी होतं. तस ते आजही आहे पण त्यावेळी ते आतून आणि बाहेरून देखील सनातनीच होतं. महिलांना सन बाथ घेण्याची परवानगी होती पण ती गाउन घालून. गळ्यापासून ते गुडघ्यांच्या खाली असणारा गाउन. याच दरम्यान दुसरं महायुद्ध देखील चालू झालं होतं.
युद्धामुळे महागाई प्रचंड वाढली. जागतिक बाजारपेठेत कापडाचे भाव गगनाला भिडले. साहजिक सहभागी देशाकडून कपडे बचाव मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेचा पहिला बळी ठरला तो सन बाथ साठी वापरण्यात येणारा गाऊन. बरं खुळ्यासारखी बंदी आणली नाही त्याकाळात सुद्धा त्यांनी.
सनबाथ साठी वापरला जाणारा गाउन कमीत कमी कपड्यात तयार करण्यात यावा हा आंबट शौकिनांना गोड वाटेल असा सरकारी आदेश निघाला.
त्यावर उपाय म्हणून फ्रॉन्सच्या रुई लेअर्द या माणसानं टू पीस अर्थात बिकनीचा शोध लावला. अमेरिकेने त्यावेळी बिकनी अटोलमध्ये न्युक्लिअर मिसाईलची यशस्वी चाचणी करुन क्रांन्ती केलीच होती.
रुईला देखील आपला हा शोध क्रांन्ती करेल यावर विश्वास होता. म्हणूनच त्यान आपल्या या अविष्काराचं नाव ठेवलं बिकनी.
आत्ता दूसरा मॅटर असा होता की, हेच आवाहन स्वीकारुन जॅक हिम नावाच्या डिझायरने देखील असाच सन बाथ घेण्यासाठी टू पीसचा अविष्कार केला होता. दिसायला बिकनी सारखाच. फरक फक्त इतकाच होता की तो टू पीस कंबरेच्या वरती जात असे. त्यानं या डिझायनच नाव ॲटम ठेवलं होतं. कारण काय तर ॲटम हा सर्वात लहान कण. त्याचा हा अविष्कार देखील कपड्यातला सर्वात लहान प्रकार.
बाजारपेठेत बिकनी आणि ॲटम समोरासमोर आले.
आत्ता खर दुसरं महायुद्ध चालू झालं. आणि सदरच्या ठिकाणी रुई लेअर्द बादशाह ठरले. त्याने काय केलं ? तर बिकनीची यशस्वी जाहिरात तयार केली.
बिकनीच्या जाहिरातीसाठी त्यानं वेगवेगळ्या मॉडेल्सना पाचारण केलं. पण बिकनी पाहून सर्वांनीच ती घालण्यास नकार दिला. त्यानंतर लुईला सापडली त्याकाळची न्यूड आर्टिस्ट मिशेलाईन. मिशेलाईने बिकनी घालून फोटोशुट केलं. बघता बघता बिकनी हिट झाली आणि मिशेलाईन देखील हिट झाली.
अस सांगितलं जात की त्या काळात मिशेलाईन ला ५० हजारांहून अधिक पत्र आली होती.
पण माशी शिंकत होती ती बिकनीचा वापर करण्यात. याबद्दल टाईम्स मॅग्झीनमध्ये स्वीमसुट बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाची मुलाखत छापण्यात आली होती. तो म्हणतो, बिकनीत मुलींमध्ये अपेक्षीत असणारं सर्व प्रकारचं सौंदर्य दिसत होतं. पण त्यामध्ये मुलांना त्यांची आई दिसत नव्हती.
सोप्या भाषेत सांगायच झालं तर सौंदर्यांच्या भाषेमध्ये असणारा सिंम्पलपणा त्यात नव्हता. मादकता आणि बिकनी हे समीकरण ‘करण अर्जून’ टाईप झाल्यामुळे कोणतीच मुलगी उघडपणे बिकनी घालण्यास धजावत नव्हती.
नंतरच्या काळात बिकनीच्या मार्केटिंगची भाषा बदलण्यात आली. मादकपणा जावून स्त्री स्वातंत्र्याचं , मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची चर्चा केली जावू लागली. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य या विषयावर त्याकाळी सुद्धा असे डोकेबाज पुरुषांचे उद्योग चालू होते. महिलांनी देखील क्रांन्तीच पाऊल म्हणून बिकनीला आपल्या पावलांवर स्थान दिलं.
भारतात बिकनी आणण्याचं श्रेय शर्मिला टागोर यांना जात.
शर्मिला टागोर यांनी इन इव्हनिंग इन पॅरिस नावाच्या सिनेमात पहिल्यांदा बिकनी वापरली. साहजिक चर्चा झाली ती त्यांच्या क्रांन्तीकारी निर्णयाने. कारण बिकनीच मार्केटिंगच तस करण्यात आलं होतं. शर्मिला टागोरचा फोटो फिल्म फेअरच्या मॅग्झिनवरती छापला गेला.
त्यानंतरच्या काळात बिकनी परवीन बाबी ने घातली, झिनत अमान ने घातली, बॉबीत डिंपल कपाडीयाने घातली. खूप चर्चा झाली. अलीकडे दीपिकाने बिकनी घातली. बाकी सई ताम्हणकरने काही वर्षापूर्वी बिकीनीला महाराष्ट्रापुढचा गंभीर प्रश्न बनवलं होतं. सगळ्या मीडियात तेवढीच चर्चा होती.
आत्ता नटीला बिकनीत पाहणं लोकांना सवयीच झालं असावं पण या सर्व क्रांन्तीकारी प्रोसेस मध्ये त्या इंजनियरला मानाचा सलाम करायचं अनेकांकडून राहून जातं म्हणूनच हा बिकनी लेख.
ज्याने स्त्रियांना एवढी मोकळीक दिली त्याचं थोडं खुलेपणाने कौतुक करायला काय हरकत आहे?
हे ही वाच भिडू:
- आणि बिकिनी किलरने तिहार जेल फोडला !!
- सगळ्या मुंबईत लागलेले शर्मिला टागोरचे पोस्टर एका रात्रीत उतरवावे लागले होते…
- 1938 साली पिक्चरमध्ये स्विमसूट वापरायचं धाडस एका मराठी हिरोईनने दाखवलं होतं