वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय पण आता गुंतवणूकच मिळेना

बहुचर्चित वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब बनवण्याचा प्रोजेक्ट स्वतःच्या राज्यात यावा यासाठी, भारतातील अग्रगण्य उद्योगप्रधान राज्यांनी वेदांता कंपनीसमोर पायघड्या घातल्या होत्या. त्यात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक ही राज्य आघाडीवर होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा प्रोजेक्ट आणण्यासाठी कंपनीला बऱ्याच सवलती जाहीर केल्याचं सांगितलं जातं.

त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील हा प्रोजेक्ट राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. २६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीसोबत बैठक केली आणि हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला असल्याच्या बातम्या  माध्यमांमध्ये झळकल्या होत्या.

परंतु शेवटी वेदांता कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि हा प्रोजेक्ट गुजरातच्या ढोलेरा सिटीमध्ये सुरु होणार असल्याची घोषणा केली. 

या घोषणेबरोबरच महाराष्ट्रातील राजकारण तापलं, महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारकडून एक-दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. मात्र या वादात राज्याला मिळणार असलेली २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, नवीन सिलिकॉन व्हॅली, एक लाख प्रत्यक्ष नोकऱ्या आणि १ लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या या सर्वांचं स्वप्न भंगलं होतं.

पण हा मुद्दा आता चर्चेत येण्याचं कारण काय? 

तर जो सेमिकंडक्टर प्रोजेक्ट वाजत गाजत गुजरातला गेला आज त्याच प्रोजेक्टला गुंतवणूकदार मिळत नाहीये.

ही धक्कादायक बातमी खरी आहे. व्यवसायासंबंधी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांताचे मालक अनिल अग्रवाल यांनी परदेशातील अनेक गुंतवणूकदारांची भेट घेतलीय, परंतु त्यांना या प्रकल्पासाठी गुंतवणूकदार मिळत नाही आहे. अनिल अग्रवाल यांनी मागील ३ महिन्यापासून मिडल सिंगापूर, अमेरिका आणि मिडल ईस्टमधील देशातील अनेक गुंतवणूकदारांसोबत भेट घेतली. परंतु एकाही गुंतवणूकदाराने वेदांताच्या भारतातील प्लांटमध्ये गुंतवणूक करण्यास होकार दिला नाही असं सांगितलं जातंय. 

पण गुंतवणूकदार मिळत नसलेला हा प्रोजेक्ट साधासुधा नाही. तर भारतासह आंतराराष्ट्रीय राजकारणात महत्व असलेला हा प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेत देखील महत्वाचा प्रोजेक्ट मानला जातो. 

तरी देखील या प्रोजेक्टमध्ये आंतराराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदार गुंतवणूक करायला का पुढे येत नाहीयेत.

तर यासाठी वेदांत कंपनीशी रिलेटेड असलेली काही महत्वाची कारणं कारणीभूत मानली जात आहेत. 

१) वेदांता कंपनीला सेमीकंडक्टर चिप्स बनवण्याचा अनुभव नाही.

सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कंपनीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कंपनीने कधीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन केलेलं नाही. वेदांता कंपनी ही फक्त खाणकाम आणि वेगवगेळ्या धातूंच्या प्रोडक्शनचं काम करते. १९७९ मध्ये अनिल अग्रवाल यांनी कंपनीची स्थापना केली तेव्हा फक्त ॲल्युमिनिअम कंडक्टर बनवण्याचं काम ते करत होते.परंतु १९९० च्या दशकात सरकारने तोट्यात चालेल्या मायनिंग कंपन्या विकासाला सुरुवात केली तेव्हा वेदांता कंपनीने सरकारी खाणी खरेदी केल्या. 

आजच्या घडीला वेदांता कंपनी तांबा, झिंक, चांदी, पारा, ल्युमिनिअम, दगडी कोळसा, लोखंड खाणीतील कच्चा माल, लोखंडाचं शुद्धीकरण करणे असे काम करते. यासोबतच कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन करते. 

वेदांता कंपनीचा सर्व व्यवसाय हा खाणकाम आणि धातूंचं उत्पादन करण्यापुरतंच मर्यादित आहे. कंपनीने कधीही दुसऱ्या वस्तूंची किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन केलं नाही, त्यामुळे सेमीकंडक्टरच्या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यावर गुंतवणूकदार आश्वस्त नाहीत. 

२) कंपनीच्या गुंतवणुकीबद्दल उडालेला गोंधळ

जेव्हा वेदांता लिमिटेड आणि फॉक्सस्कॉन कंपनीने फेब्रुवारी महिन्यात सेमीकंडक्टर निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन कंपन्यांनी सेमीकंडक्टर बनवण्यासाठी जॉईंट व्हेंचर साइन केला होता. त्यामुळे १४ सप्टेंबर २०२२ रोजी वेदांत कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले होते.

मात्र १५ सप्टेंबरला कंपनीने स्पष्टीकरण दिल की, सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट हा वेदांता लिमिटेडकडून केला जाणार नाही तर वेदांताची उपकंपनी ‘व्होल्कन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ आणि ‘फॉक्सकॉन’ कडून केला जाणार आहे. 

या स्पष्टीकरणानंतर वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये ६.५ टक्क्यांची घसरण होऊन ३१४.१० रुपयांवरचे शेअर्स २८७ रुपयांवर आले. यामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल १० हजार कोटी रुपये बुडाले होते. 

या गोंधळानंतर बॉम्बे स्टोक एक्सचेंज आणि नॅशनल स्टोक एक्सचेंजने वेदांताकडून स्पष्टीकरण देखील मागलं होतं. या प्रसंगामुळे कंपनीची इमेज चांगलीच खराब झाली होती. गुंतवणूकदारांचा कंपनीवरचा विश्वास कमी झाला आणि त्यामुळेच आधीच हात पोळलेले गुंतवणूकदार आता कंपनीमध्ये गुंतवणूक करायला तयार नाहीत असं सांगितलं जातं. 

३) वेदांता कंपनी यापूर्वी अनेकदा वादात देखील सापडली आहे. 

भारतातील ॲल्युमिनिअम उत्पादनात ४० टक्के मालकी असलेल्या वेदांता कंपनीने १९९७ मध्ये तामिळनाडू राज्यातील तुतिकोरिन येथे ॲल्युमिनिअम निर्मितीचा प्लांट उभारला होता. या प्लांटमुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याच्या आरोपावरून या प्लांटला विरोध सुरु झाला. त्यानंतर इथे तांबा निर्मितीचा पण प्लांट उभारण्यात आला मात्र त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास सुरु  झाला.

२०१० मध्ये हाय कोर्टाने या प्लांटला बंद करण्याचे आदेश दिले होते परंतु २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने तो निर्णय बदलून प्लांट सुरु करण्याचे आदेश दिले. बदल्यात कंपनीला १०० कोटींचा दंड ठोठावला होता.  २०१८ मध्ये स्थानिकांनी या प्लांटचा विरोध केला, विरोध प्रदर्शन चालू असतांना सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे कंपनी वादात सापडली होती.

त्यानंतर ओडिशा जिल्ह्यातील नियमगिरी ॲल्युमिनिअम खाणीवरून देखील कंपनी वादात सापडली होती. 

ओडिशाच्या कलाहांडी जिल्ह्यातील नियमगिरी टेकड्यांवर ॲल्युमिनिअम आणि बॉक्साइटचं खाणकाम  करण्यासाठी वेदांता कंपनीने ५० हजार कोटींचा प्लांट उभारला होता. या प्लांटला आदिवासी लोकांनी विरोध सुरु केला होता तेव्हा सुरुवातीला एका आदिवासी व्यक्तीला मारपीट करून तलावात फेकण्यात आलं, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. 

तेव्हापासून या खाणीला होणारा विरोध कायम आहे, आसपासच्या अनेक गावांमधील ग्रामसभांनी या प्लांटला विरोध करण्याचे ठराव पारित केले आहेत. या खाणींमुळे स्थानिक आदिवासींच्या जमिनी बळकावणे आणि आदिवासींचे शोषण करण्याचे आरोप कंपनीवर लागलेले आहेत. या वादामुळे देखील वेदांताची प्रतिमा खराब झाली होती. 

४) भारतातील दिग्गज कंपनी टाटा देखील आगामी वर्षांत सेमिकंडक्टर बनवणार आहे.

अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार टाटा कंपनी देखील या व्यवसायात उतरणार आहे. यासाठी मिडल ईस्ट कंपन्या देखील टाटाच्या सोबत येण्याची शक्यता आहे. जर टाटा कंपनी या व्यवसायात उतरली तर सर्व मार्केट टाटांकडे जाण्याची शक्यता आहे. 

कारण आजवर टाटाचा ब्रंड हा विश्वासाचा मानला गेला आहे आणि टाटा कंपनीला इलेक्ट्रोनिक्स आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्याचा दीर्घ अनुभव देखील आहे. त्यामुळे गुंतवणूकदार वेदांता पेक्षा जास्त विश्वसनीय असलेल्या टाटा कंपनीला या व्यवसायात उतरण्याची वाट बघत आहेत असं सांगितलं जातं.

या कारणांमुळे गुंतवणूकदार वेदांता कंपनीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत असं सांगितलं जातं. त्यामुळे वेदांताचे मालक अनिल अग्रवाल यांनी परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ३ महिने प्रयत्न केले तरी देखील एकही गुंतणूकदार पुढे यायला तयार नसल्याचे दिसते.

५) रोहित पवारांचा दावा.

आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार वेदांता आणि फॉक्सकॉन या दोन्ही प्रकल्पांना अजुनही गुजरातेत जागाच मिळालेली नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे, हे प्रकल्प जर महाराष्ट्रात होणार असतील तरच गुंतवणू करू असं कंपन्यांचं म्हणणं असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

शिवाय, अशी परिस्थिती असेल तर, हे प्रकल्प पुन्हा आपल्याच राज्यात यावेत यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केलंय.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.