इंझमाम रुसून बसला आणि पाकिस्तानचं रडगाणं सगळ्या जगात गाजलं…

जगात कुठल्याच टीमचे होत नसतील इतके खतरनाक राडे पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे होत असतात. त्यांचेच दोन कार्यकर्ते कॅच कुणी घ्यायचा यावरुन भांडतात. त्यांचे प्लेअर्स मॅच झाली की इंग्लिश बोलताना गंडतात. थोडक्यात पाकिस्तानची मॅच झालीये आणि नंतर सगळं काही निवांत झालंय असं फार कमी वेळा होतं.

आत्ताच्या टीमचं तरी जाऊद्या जेव्हा इंझमाम उल हक पाकिस्तानच्या टीमचा कॅप्टन होता, तेव्हाचे त्यांचे किस्से लईच खतरनाक होते. 

एकतर स्वतः इंझमामच खतरनाक होता. कॅनडामध्ये झालेल्या एका मॅचमध्ये त्यानं भारतीय चाहत्याला प्रेक्षकांमध्ये घुसून हाणलं होतं, हा किस्सा पार इंटरनॅशनल मीडियामध्ये गाजला होता. कुठं शोधायला जाऊ नका बोल भिडूनं लिहून ठेवलाय.

रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले.

तर हा, हा किस्सा पण इंझमाम पाकिस्तानचा कॅप्टन असतानाचा, २००६ सालचा. पाकिस्तानची टीम तिकडं इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या दौऱ्यावर गेली होती. इंग्लंडचं गारेगार वातावरण, हिरवीगार मैदानं, टूर मॅच वैगरे सगळं निवांत कारभार होता. पाकिस्तानसाठी दौरा तसा एक नंबर सुरू होता, प्रॉब्लेम फक्त एकच होता की, गडी मॅच काही जिंकत नव्हते.

टेस्ट मॅचेसमध्ये दोन्ही टीम्स तशा तुल्यबळ होत्या. इंग्लंडकडे बॅटिंगला स्ट्रॉस, कुक, पीटरसन, कॉलिंगवूड, इयान बेल असली सेना, तर पाकिस्तानची बॅटिंग म्हणजे मोहम्मद हाफिज, युनूस खान, मोहम्मद युसूफ (याची तुलना लोकं सचिनशी करायची) आणि स्वतः इंझमाम होता.

बॅटिंग जितकी खतरनाक होती, त्याहून खुंखार बॉलिंग होती. पाकिस्तानकडे मोहम्मद असिफ, उमर गुल आणि दानिश कनेरिया, तिघंच असले तरी वाढीव होते. इंग्लंड मात्र हार्मिसन, हॉगर्ड, पानेसर, महमूद अशी सेना घेऊन उतरलं होतं.

टेस्ट मॅचेसला सुरुवात झाली, पहिली टेस्ट ड्रॉ. दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंड विजयी आणि तिसऱ्या टेस्टमध्येही पुन्हा इंग्लंडचाच विजय. पाकिस्तानी मीडिया आणि फॅन्स चांगलेच चवताळले. इंग्लंडचं होम ग्राऊंड असलं तरी असलं बेक्कार हरणं कुणाच्याही जिव्हारी लागणारंच होतं.

अशातच आली चौथी टेस्ट, सिरीज गेली असली तरी पाकिस्तानला लाज वाचवण्यासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं.

टेस्ट सुरू झाली ओव्हल मैदानावर, पाकिस्ताननं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय नेमका भारी ठरला. कारण त्यांच्या फास्ट बॉलिंगसमोर इंग्लंडची बॅटिंग सप्पय गंडली. ट्रेस्कॉथिक ६ रन्सवर आऊट झाला तर पीटरसननं पहिल्याच बॉलवर कल्टी खाल्ली. एक एक करत रांग लागली आणि विषय १७३ रन्सवर आटोपला.

पाकिस्तानला मॅच जिंकण्याची पूर्ण संधी होती. कारण त्यांच्या बॅट्समननं इंग्लिश बॉलर्सचा घाम काढला होता, हाफीज आणि अराफतनं जवळपास सेंच्युरी मारलीच होती. मोहम्मद युसूफनं आपला फॉर्म कायम राखत सेंच्युरी मारली. पाकिस्तानचा स्कोअर झाला ५०४.

आता फक्त तिसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा झटपट खोललं की मॅच त्यांच्या हातात होती. मात्र चौथ्या दिवशी मॅचमध्ये कुणालाही अपेक्षा नसलेला ट्विस्ट आला.

इंग्लंडची एक विकेट गेली होती, स्ट्रॉस आणि कुक किल्ला लढवत होते. त्यांची विकेट गेल्यावर पीटरसन आणि कॉलिंगवूडनं हाणामारी केली. पीटरसन शतकाला ४ रन्स बाकी असताना आऊट झाला आणि इंग्लंड जरा टेन्शनमध्ये आलं. मेन गडी टिपल्यामुळं पाकिस्तान आणखीनच जोशात आलं आणि तेवढ्यात झाला किस्सा.

अंपायर डॅरेल हेअरनं पाकिस्तानला ५ रन्सची पेनल्टी लावली, इंग्लंडच्या धावसंख्येत ५ रन्सची भर पडली आणि अंपायरनं अचानक बॉल चेंज करायचा असल्याचं सांगितलं. उमर गुल आणि मोहम्मद आसिफचा बॉल चांगलाच रिव्हर्स स्विंग होत होता, रिव्हर्स स्विंग मुळंच कुकची विकेट मिळाली होती आणि त्यातच अंपायरनं बॉल चेंज करायला सांगितलं. विशेष म्हणजे कुठला बॉल निवडायचा हे इंग्लिश प्लेअर्सला ठरवायला सांगण्यात आलं.

कारण अंपायर डॅरेलला संशय आला, पाकिस्ताननं बॉल टॅम्परिंग केलंय. बॉल रिव्हर्स स्विंग होत होता आणि त्यामुळंच डॅरेलनं पाकिस्ताननं छेडछाड केल्याच्या संशयावरुन बॉल बदलला, त्यानंतरही खेळ सुरू राहिला. पण खराब सूर्यप्रकाशामुळे टी-ब्रेकची घोषणा करण्यात आली.

टी-ब्रेकनंतर इंग्लिश प्लेअर्स आणि अंपायर्स मैदानात आले, मात्र पाकिस्तानी खेळाडू काही ड्रेसिंग रुमच्या बाहेर आले नाहीत. 

सामना अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर समजलं की, बॉल टॅम्परिंगचा आरोप केल्यामुळं कॅप्टन इंझमाम आणि पाकिस्तानच्या टीमनं पुन्हा खेळायला यायला नकार दिला होता. त्यामुळं बराच वेळ वाट पाहूनही रुसलेला इंझी काय मैदानावर उतरेना. 

अंपायर त्याची समजूत काढायला गेले, तेव्हा त्यांच्या तोंडावर दार लावण्यात आलं. आता साहजिकच अंपायर्सही खवळले आणि मैदानावर परत आल्यावर त्यांनी बेल्स खाली पडल्या. क्रिकेटच्या नियमानुसार अंपायर्सनं बेल्स खाली पाडल्या म्हणजे मॅच संपली. 

तरीही मॅटर काय थांबला नाही…

आता पाकिस्तानची टीम मैदानात आली आणि त्यांनी मॅच सुरू करण्याचा आग्रह धरला, मात्र अंपायर्स आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी पाकिस्ताननं इंग्लंडला मॅच बहाल केली, असं जाहीर केलं आणि पाकिस्ताननं सिरीज ३-० नं गमावली.

त्यानंतर संध्याकाळी पाकिस्ताननं आरोप केला की आमही मॅच पुढं सुरू ठेवायला तयार होतो, मात्र अंपायर्सनंच नकार दिला. यावरुन अंपायर्स खवळले आणि डॅरेल हेअरनं पाकिस्तानची मापं काढली. पुढं हा वाद आणखी चिघळला आणि आयसीसीनं हेअरला निलंबित केलं. अर्थात त्यासाठी पाकिस्ताननं दबाव आणला होता.

यामुळं या राड्यात इतर देशातल्या प्लेअर्सचीही एंट्री झाली, रिकी पॉन्टिंगनं डॅरेलला काढून टाकण्याच्या घटनेचा निषेध केला, इतर खेळाडूही त्याच्या पाठीशी उभे राहिले.

पण या सगळ्या मॅटरमध्ये एक गोम होती, ती म्हणजे…

पाकिस्ताननं बॉल टॅम्परिंग केलंय असा एकही पुरावा सापडला नाही. हे ना मैदानावरच्या अंपायरला सिद्ध करता आलं ना फोर्थ अंपायरला. त्यामुळं पाकिस्तान नेमकं दोषी होतं की नाही हे अस्पष्टच राहिलं.

या सगळ्यात मॅचचा रिझल्ट मात्र इंग्लंडच्या बाजूनं लागला, आजही क्रिकेटच्या इतिहासात ही बहाल केलेली एकमेव मॅच म्हणून ओळखली जाते. आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या दबावामुळं मॅचचा रिझल्ट ‘ड्रॉ’ असा चेंज केला होता, मात्र क्रिकेटचे नियम ठरवणाऱ्या एमसीसीनं हा निर्णय पुन्हा पाकिस्तान पराभूत असाच केला.

साहजिकच मॅच जिंकायची पूर्ण संधी असताना, इंझमाम ड्रेसिंग रुममध्ये रुसून बसला आणि त्यांचं हे रडगाणं पाकिस्तान आणि इंग्लंड पुरतंच नाही, तर सगळ्या जगात गाजलं. या मॅचबद्दलचे रिपोर्ट्स आजही चाळले, तर अनेक क्रीडालेखक ‘जेव्हा क्रिकेट हरलं..’ अशा शब्दातच इंझमामच्या त्या कृतीचा निषेध करतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.