iphone 13 लॉन्च अमेरिकेत झालायं, पण वाद थेट आर. डी. बर्मन यांच्याशी जोडला गेलाय…
अॅपल आयफोन 13 (Apple iphone 13) काल म्हणजे 14 सप्टेंबरला अमेरिकेत लॉंच झालाय. आपल्या लाईव्ह मेगा इव्हेंटमध्ये आयफोन 13, आयपॅड, अॅपल वॉचसह अॅपलने अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत. भारतात त्यावेळी बरीच रात्र झाली होती, पण तरी देखील भारतातील अनेक आयफोन प्रेमी हा मेगा इव्हेन्ट बघत होते.
इव्हेन्ट दरम्यान कंपनीने आयफोन 13 चा प्रोमो लॉन्च केला. पण जसा हा प्रोमो लॉन्च झाला तसा भारतात दंगा सुरु झाला. सोशल मीडियावर लोक अॅपलवर टीका करण्यासाठी तुटून पडलेत. या तुटून पडण्याचं कारण थेट जेष्ठ संगीतकार आर. डी. बर्मन या भारतीयांच्या हळव्या कोपऱ्याशी जोडलंय.
कारण लोकांच्या दाव्यानुसार प्रोमोमध्ये जे संगीत वाजत आहे ते आरडी बर्मन यांच्या ‘दम मारो दम’ यांच्या गाण्याचं संगीत आहे. जशी हि गोष्ट लोकांच्या लक्षात आली तसं भारतात आयफोन 13 ची चर्चा मागे पडली आणि आर. डी. बर्मन, दम मारो दम वर चर्चा सुरु झाली. अनेकांनी असे आरोप केले कि अॅपलने हे संगीत चोरलं आहे. तर अनेकांनी मात्र हे सगळे दावे खोडून काढलेत.
नेमकं काय आहे सगळं प्रकरण?
या सगळ्या दंग्याला समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला अॅपल आयफोन 13 हा प्रोमो बघायला हवा.
आता बघितला असेल तर पुन्हा एकदा दंग्याकडे वळू. या प्रोमोमध्ये एक डिलिव्हरी बॉय दाखवण्यात आला आहे. जो आयफोन 13 सहित ठिकठिकाणी सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी जातो. या सगळ्या दरम्यान पावसात भिजतो, त्याचा फोन पण भिजतो, अगदी फोन चिखलात पडतो. पण त्यानंतर देखील फोनला काहीही होतं नाही.
मात्र या सगळ्यामध्ये बॅकग्राऊंडला जे संगीत वाजत आहे त्यावर भारतातील लोकांनी आक्षेप घेतलाय.
क्रिशिकेश खैरनार या युवकाने आयफोन 13 च्या प्रोमो सहित म्हंटले आहे कि,
आयफोन 13 च्या प्रोमोबाबत 2 गोष्टी. एक तर कोणताही डिलिव्हरी बॉय कधी आयफोन 13 खरेदी करू शकतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात वाजत असलेलं गाणं हे दीपिका पदुकोणच्या ‘दम मारो दम’ सारखं ऐकू येत आहे.
Two Observations from iPhone 13 commercial.
1. Can a delivery boy afford an iPhone13 as shown in the ad ?
2. The bgm sounds similar to Deepika Padukone’s Dum Maro Dumhttps://t.co/qiiytheXDI
— Krishikesh Khairnar (@KrishKhairnar) September 14, 2021
तर मृणाल देसाई यांनी लिहिलं आहे कि,
मी शपथ घेऊन सांगते कि, आयफोन 13 च्या व्हिडीओमधील गाणं दम मारो दम सारखे वाटत आहे. असं फक्त मलाच वाटत आहे का?
I swear that sounded like dum maro dum in the iPhone 13 video … just me?
— Mrinal Desai (@mrinaldesai) September 14, 2021
खरंतर ‘दम मारो दम’ या गाण्याचं मूळ आहे ते 1971 मध्ये. चित्रपट होता हरे रामा हरे कृष्णा. हे गाणं गायलं होतं जेष्ठ गायिका आशा भोसले आणि संगीतकार होते आर. डी. बर्मन. पुढे 2011 मध्ये दम मारो दम या रिमिक्स गाण्यावर नृत्य केलं होतं. त्या चित्रपटाचे देखील नाव होते दम मारो दम. जस यासारखीच वाटणारी धून काल आयफोन 13 च्या प्रोमोमध्ये वाजली त्यानंतर ‘दम मारो दम’चे चाहते तुटून पडले आहेत.
तर आदित्य दरेकर यांनी दावा केला आहे कि,
हे प्रत्यक्षात दम मारो दम नाही तर फुटसीचे वर्क ऑल डे आहे. त्यामुळे भारतीय शांततेने झोपू शकतात.
Apparently, its not “Dum Maro Dum”its “Work All Day” by Footsie. Indians can finally go to sleep peacefully #AppleEvent pic.twitter.com/MafukwrZbZ
— Aditya Darekar (@AdityaOnMedium) September 14, 2021
अॅपलने याआधी देखील आर. डी. बर्मन यांच्या संगीताची चोरी केलीय?
आता हा सगळा वाद एका बाजूला असताना एका संशोधकाने अॅपलने याआधी देखील आर. डी. बर्मन यांच्या संगीताची चोरी केली असल्याच संशोधन केलयं. पवन नामक एकाने ट्विट करून म्हंटले कि फक्त ‘दम मारो दम’ नाही तर अॅपलने 2018 मध्ये आयफोन एक्सच्या प्रोमोमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’च्या संगीताचा वापर केला होता.
मात्र आता या वादात अजून ठोस काही मार्ग निघालेला नाही कि अॅपलने आर. डी. बर्मन कि फुटसी नेमक्या कोणाच्या संगीताचा वापर केला आहे, मात्र या प्रश्नाचं उत्तर लोकांना हवंय कि अॅपलने परवानगी काढली होती का? आणि नसेल तर अॅपलवर संगीत चोरीची केस होणार का?
हे हि वाच भिडू
- एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील अनेक वर्षांचा वाद पंचमदांनी एका गाण्यातून मिटवला होता
- जेव्हा एस. डी. बर्मन यांना जेलमध्ये डांबण्यात येतं..
- १९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.
खरंतर Footsie- Work all day हे गाणेच दम मारो दम चे रिमिक्स आहे, पहील्या २० सेकंदातच ह्या इंग्लिश गाण्यात “दम मारो दम” हे स्पष्टपणे ऐकायला मिळतं! हे गाणं Grime या Album मधील आहे, जो २०१५ साली आला होता.