मराठमोळा IPS ऑफिसर तेलंगणात ड्युटीबरोबर आदिवासी पाड्यात डॉक्टरकीची पण मोफत सेवा देतोय

राज्यावर सध्या लॉकडाऊनचं संकट घोंगावतयं. विकेंडला असलं तरी कधी पुर्ण होईल हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पण तसाचं इशारा दिला आहे. कारण ते म्हणाले तसं महाराष्ट्रात लसीकरण आणि टेस्टिंग वाढवलं आहे, आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली आहे पण मुळं प्रश्न आहे तो डॉक्टर आणि परिचारिकांचा.

रुग्ण वाढतचं राहिले तर प्रशिक्षीत डॉक्टरांना आणायचं कुठून असा मोठा प्रश्न सध्या आरोग्य व्यवस्थेसमोर आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या या समस्येचं उत्तर सापडतं,

तेलंगणातील मुलगु जिल्ह्यामधल्या एका आदिवासी पाड्यातल्या मराठमोळ्या अधिकाऱ्याकडून.

मुळचे पंढरपूरचे असलेले डॉ. संग्रामसिंह पाटील हे सध्या तिथले पोलिस अधिक्षक आहेत.

ते इथं काय करतात याच्या आधी ते पंढरपुरमधून इथं पर्यंत कसे पोहचले हे बघावं लागेल.

संग्रामसिंह यांनी सुरुवातील पंढरपूर, अकलूज आणि पुढे पुण्यात शिक्षण घेतलं. त्यानंतर २०११ साली कराड मधल्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून ते एमबीबीएस पास आऊट झाले. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांच्या डायलिसिस साठी हॉस्पिटलमध्ये दाखलं करावं लागलं होतं.

शिक्षण पुर्ण झालं होतं. पण या सगळ्या धावपळीमुळे पाटील यांनी कुठे जॉईन केलं नव्हतं. पण तेव्हा प्रॅक्टिस सोबतचं त्यांच्या एका मित्रानं त्यांना युपीएससीची आयडिया दिली. जरा विचार झाला आणि युपीएससकडे वळायचं फायनलं झालं. त्यासाठी दिल्ली देखील गाठली.

संग्रामसिंह यांनी परिक्षेची तयारी सुरु केली, आणि सोबतच दिल्लीच्या एका हॉस्पिटलंमध्ये  प्रॅक्टिस सुरु झाली. पण या नोकरी सोबतं तयारी करणं हे बरचं अवघड काम होतं. त्यामुळे हॉस्पिटल सोडून एक क्लास जॉईन केला. इथं ते मेडिकलशी संबंधित विषय शिकवून आपल्या अभ्यासाशी जोडून राहायचे आणि आपली तयारी पण करायचे.

पहिल्या दोन अटेंम्टमध्ये सिलेक्शन झालं नाही.

पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं. १५१ व्या रँकवर त्यांची आयपीएससाठी निवड झाली, आणि त्यांना तेलंगणा केडर मिळालं. सध्या ते तिथल्या मुलगु जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असून त्यांच्याकडे भुपलपल्ली या जिल्ह्यांची अतिरिक्त जबाबदारी आहे.

पण आयपीएस बनल्यानंतर देखील ते आपला रुग्णसेवेचा धर्म विसरले नाहीत.

संग्रामसिंह सध्या जिथं काम करतायत तो परिसर मुळात छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या नक्षलग्रस्त सीमांवर येतो. या भागात गोट्टी कोया समुदायातील आदिवासी पाड्यात १०० वस्त्या आहेत. या भागात ते नियमीत पेट्रोलिंगसाठी जात असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथल्या लोकांना अगदी मुलभूत सुविधा पण मिळालेल्या नाहीत.

तसचं त्या परिसरापासून शहराचं अंतर पण जास्त आहे आणि वाहतुकीचा देखील प्रश्न होता. त्यामुळे वेळेवर त्यांना उपचार देखील मिळाला नव्हता. या सगळ्या अडचणींना बघून त्यांनी पुन्हा आपला स्थेतस्कोप हातात घेतला आणि पोलिसाची ड्युटी बजावत असतानाचं रुग्णांवर उपचार पण सुरु केले.

पाटील यांनी तेव्हापासून ठरवलं की या भागामध्ये आपल्या टीमसोबत मिळून नियमीत स्वरुपात हेल्थ कँम्प लावायचे. त्यासाठी त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, वारांगलला मदत मागितली. सोबतचं जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्राचे इतर डॉक्टर पण सोबत जोडले गेले. आजही नियमीत स्वरुपात वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये कँम्प लावतात. यात पाटील आणि त्यांच्या टीम सोबत १५ ते २० इतर डॉक्टर देखील जातात.

डॉ. संग्रामसिंह पाटील बोल भिडूशी बोलताना सांगतात,

तिथं गेल्यावर रुग्णाची तपासणी होते, यात मगं अगदी महिलांच्या हिमोग्लोबिन पासून ते ब्लड चेकअप, आरटी-पीसीआर आणि मलेरियाच्या टेस्ट केल्या जातात. आणखक काही गरज वाटली तर त्यांना तात्काळ जिल्हा हॉस्पिटलला पाठवलं जातं.

२०२० मध्ये त्यांनी एकूण ९ कँम्प केले, ज्यात ५ हजार पेक्षा जास्त आदिवासीयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा पोहचल्या आहेत. जवळपास ७ लाख रुपयांचे औषध मोफत दिले आहेत. सोबतचं त्यांना काही अंथरुनाच साहित्य पण वाटलं आहे. आतापर्यंत या अभियानात जवळपास ८० डॉक्टरांनी भाग घेतला आहे.

एवढचं नाही तर ते इथल्या मुलांमध्ये देखील खेळाच्या स्पर्धा, धावण्याच्या शर्यती, कबड्डी अशा स्पर्धा आयोजित करतात. त्यात जवळपास ३००० मुलं भाग घेतात. आदिवासी आणि नक्षलग्रस्त असा भागात मुलांच्यात मिसळून राहिल्यामुळे त्यांचा पोलिसांवरचा विश्वास वाढण्यास देखील मदत होते.

अशाच प्रकारे मध्यंतरीच्या काळात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपलं कर्तव्य पार पाडण्यासोबतच पुन्हा रुग्ण सेवेत वाहून घेतलं होतं. त्या देखील आधी परिचारीका होत्या. त्यांना या कामाचा पुर्वानुभव पण होता.

राज्याच्या संकटाच्या काळात अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे जे नियमीत आरोग्य सेवक काम करत असतात त्यांना देखील नवीन उत्साह येतो.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.