त्यांच्या दोन वर्षाच्या काळात एकही पोलीस शहिद न होता ९५ नक्षलवादी शरण आले होते

IPS संदीप पाटील यांची गडचिरोली परिक्षेत्रपदी उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाल्याची बातमी आली. साधारणं गडचिरोली म्हणल्यानंतर शिक्षा असं सार्वजनिक मत असत. २०१४-१५ साली संदीप पाटील हे गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक होते. तेव्हा त्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली होती.

पून्हा गडचिरोली येथे बदली झाल्याने अनेकांनी सोशल मिडीयावर चांगल्या अधिकाऱ्याला पून्हा गडचिरोलीला का पाठवलं असा प्रश्न उपस्थित केला. मात्र या सर्व गोष्टींवर खुद्द संदीप पाटील यांनी खुलासा करत आपणच गडचिरोली मागून घेतल्याचं सांगितलं आहे.

२०१४ ते २०१५ अशी दोन वर्षे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून धडाकेबाज पोलीस अधीकारी संदीप पाटील यांनी जबाबदारी पार पाडली होती. २०१४ च्या विधानसभा आणि संपूर्ण २०१५ साली एकही पोलीस शहिद न होता ९५ नक्षलवादी शरण आले, तर २६ नक्षलवाद्यांना अटक केली.

IPS संदिप पाटील यांचे अनुभव त्यांनी अक्षरदान दिवाळी अंकासाठी लिहले होते. 

प्रशासनात काम करतांना ते मनापासून केलं पाहिजे. माणसाने संवेदनशीलपण जपलं पाहिजे. पंतप्रधानांनी सात एस सांगितले आहेत. संवाद, समन्वय, सकारात्मकता इ. हे माणसाने आयुष्यात नेहमी जपले पाहिजे. माणसाच्या आयुष्यात संयम, सुसंवाद असेल तर, बऱ्याचशा गोष्टींचे प्रश्न सुटतात. संवेदनशील असायला तुमची मनाने फार कन्सेप्शन क्लियारिटी असावी लागते.

पहिल्या दिवसापासून तुम्ही जर भ्रष्टाचार करत असाल तर, तुम्ही संवेदनशील राहू शकत नाहीत. ते सर्व तुमच्या कृतीत येणं अपेक्षित आहे. लग्न करतांना तुम्ही हुंडा घेतला तर, तुम्ही कसं संवेदनशील राहणार? लग्न हे पवित्र आणि प्राथमिक नातं आहे. जर तुम्ही लाखो रुपये घेऊन लग्न करणार असाल आणि बाहेर जाऊन मी असा आहे, तसा आहे, सांगत मिरवत असाल तर तुमच्या उक्तीत आणि कृतीत फरक आहे.

तुमचे प्रत्येक संस्कार तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे. समाज तुम्हाला न्याहळत असतो. तुमचे ज्युनिअर, सीनियर तुम्हाला पाहत असतात. काही गोष्टींमध्ये कॉम्प्रमाइज करत असाल तर, तुमच्यावर प्रेशर येतं.

प्रशासनात समाजसेवा करायला आलो असेल आणि आपलं मत स्पष्ट असलं की, आपल्याला काहीच अडचणी येत नाहीत. आपल्यासमोर खुप चांगले उदहारण आणि आदर्श असतात. आपण पॉझिटिव्ह असलो की, आपल्याला पॉझिटिव्हच लोकं भेटतात. काम करायला आपल्यासमोर खुप चांगले आदर्श आणि उदहारण असतात.

माझं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर, माझे आतापर्यंत झालेले पोस्टिंग मी पुढऱ्यांकडे जाऊन कधीच घेतले नाही. ज्या ठिकाणी आव्हान आहे, त्या ठिकाणी काम करायचं, हे माझं ठरलेलं आहे. जिथे आपल्याला काही तरी नविन करण्यासारखं आहे.

माझं पहिलं पोस्टिंग चंद्रपुरला प्रोबेशनर म्हणून झालं होतं. नंतर खामगावला ॲडिशनल एसपी म्हणून गेलो. त्यावेळी गजानन महाराज शताब्दी सोहळा होता. त्यावेळी मला भरपूर शिकायला मिळालं. आपण जबाबदारी घेतली की, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी स्वतःला ग्रो करत असतो. माझ्यावर कितीही जबाबदारी टाका. मला ते आवडतं. मी तू मन लावून पार पाडत असतो.

गडचिरोलीतील आव्हानांशी भिडतांना. 

गडचिरोलीत एक प्रकारचं युद्ध सुरु आहे आणि ते सर्व पातळ्यांवर सुरु आहे. लोकांना वाटतं की, ती पोलिस नक्षल लढाई आहे. पण ती लोकशाही विरुद्ध माओवाद अशी आहे. ते सर्व पद्धतीने आपल्या लोकशाहीवर आघात करतात. सर्व माध्यमातून लोकशाही फेल आहे हे दाखवतात. पण जनतेला आपल्या बाजुनं घ्यायला हवे, हे आमच्या लक्षात आलं. सर्व प्रश्न हे बंदुकीच्या गोळीने सुटत नाहीत.

लोकांची मनं जिंकणं, हे युद्ध जिंकल्यासारखं आहे. त्यासाठी प्रशासन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी अतिसंवेदनशील भागात सात पोलीस स्टेशन निर्माण केले. त्यामुळे आपल्या लोकांचा वावर तिथे वाढला. त्यामुळे नक्षल सोडून सरकार आहे, पोलीस आहेत, ही दूसरी बाजु लोकांना समजायला लागली. तिथं सर्व कामे पोलिसांनाच करावे लागतात. लोकांना प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना आत्मविश्वास दिला की, आम्ही खोट्या चकमकीत मारणार नाही. तुमचं पुनर्वसन करू. शासनाची तशी आत्मसमर्पण योजना आहे.

माझ्या दोन वर्षाच्या काळात ३०० पेक्षा जास्त आत्मसमर्पण झाले. माझं पहिल्यापासूनच स्पष्ट होतं की, कोणालाही खोट्या एनकाउंटरमध्ये मारायचं नाही. पोटणी या तिथल्या सर्वात धोकादायक भागात आम्ही पोटणी पोलीस स्टेशन उघडलं. तिथं सर्वात जास्त म्हणजे ३० लोकं आत्मसमर्पित झाले. उत्तर गडचिरोलीतील एक मोठा नेता धलम कमांडर त्याचं आत्मसमर्पण घडवून पुनर्वसन केलं. त्यामुळे लोकांना विश्वास आला की, आपलंही असचं पुनर्वसन करतील. अनेक लोकांनी आत्मसमर्पण केलं.

त्यांना १७४ भूखंड दिले आणि आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठीची देशातील पहिली कॉलनी गडचिरोलीत सुरु केली. त्याचं उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

तिथं आव्हानं खुप आहेत. काम करण्यासाठीही बरचं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण बरचं आहे. इकडे दारू पिऊन बाहेर पडलं तरी चालतं पण तिथे दारू पिऊन बाहेर पडलात की, नक्षलवादी शस्त्र घेऊन ठार मारतात. अशी घटना घडलेली आहे. त्यांना सस्पेंड करूनही काही उपयोग होत नाही. म्हणून आम्ही पोलीस मुख्यालयात व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलं. प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना तिथं भरती करायचो. दोन वर्षात पुण्यातील मुक्तांगण संस्थेच्या सहकार्याने १०० कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त केलं. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रशासनातील उत्कृष्ट कार्यासाठीचा पुरस्कार मिळाला.

२०१४ ची विधानसभा अविस्मरणीय अनुभव. 

58686649 2198520993588879 954261644916031488 n

माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक कामगिरी म्हटलं तर, २०१४ ची विधानसभा निवडणूक. नुकताच मी महिन्याभरापूर्वी तिथे रुजू झालो होतो. शिवाय २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जवान शहीद झाले होते. आणि ५१ ठिकाणी मतदान होऊ दिलं नव्हतं. नुकतचं ५ महिन्यापुर्वी लोकसभा निवडणूक झाली होती. तेव्हा २ जवान शहीद झाले होते. तर ८ गंभीर जखमी झाले होते. पण तेव्हा नक्षलवादी पूर्ण देशभर विखुरलेले असतात. उन्हाळ्यात जंगल पण कमी असतं. पण ऑक्टोंबरमध्ये घनदाट जंगल वाढलेलं. १० मिटरवरचं पण काही दिसत नाही. बाहेरच्या राज्यातील नक्षली पण एकवटतात.

लोकसभेमुळे जंगलातील सर्व रस्ते, पोलीस कुठून आणि कसे येणार, बूथ कुठे असणार, अशी खडान् खडा माहिती त्यांना असते. नियोजनासाठीही खुप कमी कालावधी मिळाला. आशा सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक यशस्वी पार पाडणं खुप आव्हानात्मक होतं. उत्तम टीमवर्क आणि कलेक्टर यांच्या सहकार्याने हे आव्हान यशस्वी करुन दाखवलं. २० वर्षातील ही अशी निवडणूक ठरली की, ज्यात आमचा एकही जवान शहीद झाला नाही. कुठेही पुनर्मतदान न होता ७५ टक्के मतदान झालं होतं. आमचे १२ हजार आणि बाहेरून मागवलेले ८ हजार कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करत होते.

ही विधानसभा पार पाडनं माझ्यासाठी यूनिक आणि आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. त्याकाळात कुठली अनुचित घटना घडली असती, तर माझं पूर्ण करीअर खराब होणार होतं. चांगलं काम केलं की तुमचं करीअर खुप वर जातं आणि वाईट काम केलं की, खुप खाली जातं. हा तिथला नियम आहे. कारण संपूर्ण देशाचं लक्ष तिथं असतं.

निवडणुकीच्या अगोदर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मला उभं केलं आणि म्हणाले,

“महाराष्ट्रा का इलेक्शन मतलब गडचिरोली का इलेक्शन. बाकी इधर कुछ नहीं होता. तुम्हारा इलेक्शन सेक्ससेसफूल होगा तो, महाराष्ट्रा का इलेक्शन सक्सेसफुल होगा.”

त्यांच्या या दोन वाक्याने माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव झाली होती.

२०१५ या संपूर्ण वर्षात आमचा एकही जवान शहीद झाला नाही. पंधरा वर्षानंतर आम्ही ही कामगिरी करू शकलो होती. जवान का शहीद होतात याचा आम्ही एक सर्व्हे केला होता. तर तिथं भुसुरुंगामध्ये सर्वात जास्त जवान शहीद होतात. एक भुसुरुंग झाला की, ८ जवान शहीद १० जवान शहीद होतात. असं लक्षात आलं. गडचिरोलीतील ६० पोस्टांवर बीडीडीएस आहेत. त्या सर्वांचं आम्ही ट्रेनिंग घेऊन ट्रेन केलं.

गस्तीवर, बाहेर पडलं की, पुढाच्या एका टिमने सतर्क राहून बॉम्ब, स्फोटके निकामी करायचं ठरवलं. रास्त्यांबरोबरच तिथे जंगलात सुरुंग लावलेले आणि झाडांवर तोफ लावलेले असतात. ट्रेनिंग आणि सतर्कतेमुळे आमचा एकही पोलीस शहीद झाला नाही. त्यांचे पूर्ण मनसुभे आम्ही उधळून लावले. ही खुप मोठी अचिव्हमेंट आम्ही पूर्ण केली.

गडचिरोलीत वाचनालये आणि पुस्तकदान.

गडचिरोलीत एकटा माणूस पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नाही. एकटा आलेला दिसला की, नक्षली त्याला खबऱ्या म्हणून ठार मारतात. शिवाय नक्षलवादी त्यांचं सर्व विद्रोही साहित्य, पुस्तके, पत्रके तिथे सर्वांपर्यंत पोहचवतात. तर आमचे नविन जॉईन झालेले पीएसआय तिथल्या मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं देतात. तिथल्या मुलांना, विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणादायी पुस्तकं, लोकशाहीवरील पुस्तके, महापुरुषांची पुस्तके वाचायला देणे आणि वाचनाबद्दल गोडी निर्माण करणं गरजेचं आहे.

28279371 559073447803178 5652053116918720080 n

या संदर्भात एकदा डीजीपी प्रवीण दीक्षित साहेब यांच्याशी दौऱ्यावर आले असतांना चर्चा झाली. आणि पोस्टजवळ किंवा पोस्टमध्ये वाचनालय सुरु करण्याचं ठरवलं. शनिवार-रविवार मुलांना बोलावून चहा-पाणी करायचं आणि एखाद पुस्तक वाचून चर्चा करायची, असं सुरुवातीला त्याच स्वरुप होतं. अतिसंवेदनशील भागातील बुर्गी पोलीस स्टेशनच्या पहिल्या वाचनालयाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं. छत्तीसगढच्या सीमेवर एवढ्या आत मुख्यमंत्री प्रथमच आले होते. तिथे आम्हाला पुस्तकांची कमतरता भासु लागली. या उपक्रमासाठी आम्ही मिळेल तिथून पुस्तकं घेत होतो. पुस्तकं भेट द्यायला सांगत होतो.

मग मी सातारा येथे आल्यावर लक्षात आलं की, तिकडे पुस्तके कमी पडताहेत. त्यामुळे लोकांना आवाहन केलं की, हार तुरे आणण्या ऐवजी पुस्तके भेट द्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि २ महिन्यात ८ हजार पुस्तके जमा झाली आहेत. १० हजार पुस्तके गडचिरोलीतील वाचनालयांना पाठवणार आहे. कोणाकडे जुनी-नवी कोणतीही पुस्तके असतील, तर सातारा पोलीस मुख्यालयात पाठवा. आपलं स्वागतच आहे.

गडचिरोलीच्या दुर्गम भागात इंटरनेट नाही. व्हाट्सअप, फेसबुक असं संवादचे साधनही नाही. तेथील युवकांना बाहेरचे विश्व कळले पाहिजे. आदिवासी मुलं पोलीस, आर्मीमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना संधी आणि सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. लोकांशी संवाद वाढावा म्हणून आम्ही अनेक उपक्रम सुरु केले. नक्षल कुटुंबांना टीव्ही वाटप केले. त्यांची मुलं गुन्हेगार नसतात. ती भरकटलेली असतात.

त्यांना परावृत्त करण्यासाठी शासनाचा ‘नवजीवन’ हा उपक्रम राबवला. गडचिरोलीतील संपूर्ण कामासाठी महाराष्ट्र शासनाचा विभागीय स्तरावरील प्रशासकीय पुरस्कार मिळाला. आशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि शिवाय काम करायला एक वेगळा हरुप येतो.

प्रशासनात काम करतांना राजकीय मंडळींचा दबाव येतो, असं मी मानणार नाही. लोकशाहीमध्ये वेगवेगळी अंग असतात. प्रशासन एक त्याचा भाग आहे. राजकीय नेत्यांच्या जनतेशी जास्त संपर्क येतो. लोकांचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी ते नेत्यांना भेटतात. ते प्रश्न घेऊन राजकीय मंडळी आम्हाला भेटतात. सूचना करतात. कार्यवाही करण्यासाठी मदत मागतात. खरं तर ते प्रशासनाचे पार्टनर आहेत. त्यांच्या सुचना वैगेरे आपली कार्यवाही चांगली, पॉझिटिव्ह होईल. त्यामुळे आपण त्या सूचना पाळतो. काम करतांना राजकीय दबाव मला तरी कधी जानवला नाही.

  –   IPS संदीप पाटील (शब्दांकन: मोतीराम पौळ, संपादक- अक्षरदान). 

संपादक मोतीराम पौळ यांच्या पुर्व परवानगीने प्रकाशित. 

हे ही वाच भिडू. 

4 Comments
 1. काशिनाथ शेलार says

  धाडसी,पराक्रमी,प्रामाणिक उच्यपदस्त पोलीस अधिकारी आदरणीय संदीप पाटील साहेब,आपले नक्सली भागातील काम देशात आदर्शवत आहेच पण आपण सातारा राजधानीत येऊन पहिल्यांदा अधीक्षक कार्यालय हे जनतेसाठी खुले केलंत. गुन्हेगारी हद्दपार केलीत पोलीस आणि जनता खऱ्या अर्थाने सुसंवाद आपल्या कार्यकाळात सुरू झाला. भीमा कोरेगाव प्रकरणात खऱ्या सुत्रधारणपर्यंत जाऊन भविष्यातील मोठी सामाजिक दुर्घटना आपण टाळलीत.आपल्याकडून खूप मोठं कार्य होवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
  जय हिंद

 2. स्वरूप भा. रामटेके says

  sir U R great !!
  आपल्या सारखे उत्तम प्रशासनिक अधिकारी
  आणि
  एक लोकाभिमूख नेता जर
  गढ़चिरोली
  ला प्राप्त झाला
  तर
  गढ़चिरोली जिल्हा हा
  प्रगति पथावर नक्कीच जाईल
  ही इच्छा आणि अपेक्षा आहे

  जय सेवा
  जय भीम
  स्वरूप भा. रामटेके
  संस्थापक अध्यक्ष
  किसान क्रांति !

 3. Sagar D dayare says

  खरंच सर तुमचा नेतृत्व करण्याची पद्धत खुप कमालीची आहे तुमचा अभ्यास आणि त्यातून केले नेतृत्व यामुळे आपल्या पोलीस बांधवांचे प्राण वाचलेच पण त्यापेक्षा जास्त लोकांनी कायद्याला शरण येणं ही खुप मोठी बाब आहे
  तुमचा , विश्वास नागरे पाटील सर आणि तुकाराम मुंढे सर यांचा कार्य खरंच प्रेरणादायी आहे आमच्यासाठी आणि तुम्हा लोकांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर असतो

 4. Subhash Gogawale says

  He is great personality person and my knowledge now proud to going more develop in Gadchiroli best of luck

Leave A Reply

Your email address will not be published.