३ रेव्ह पार्टी उद्ध्वस्त केल्या. नांगरे पाटलांच्या नावानेच ड्रग्ज माफिया थरथर कापायचे.

दोन दिवसांमागं शाहरुख खानचं उचापती लेकरु एका फाईव्ह स्टार क्रूझवर पार्टीसाठी गेलं होतं. आता हि पार्टी निघाली रेव्ह पार्टी. म्हणजे दारू पासून ते ड्रग्जच्या सगळ्या प्रकारचा ऊत आलेली ही पार्टी. देशविदेशातले अतिश्रीमंत तरुण तरुणी, सेलिब्रिटींचे पोरबाळं इथं गोळा झाली होती. पार्टी ऐन रंगात आली असताना, अचानक एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स क्राईम ब्युरोनं इथं छापा मारला.

या छाप्यात आर्यन खान आणि त्याची दोस्त मंडळी रंगेहाथ सापडली. समीर वानखेडे या दबंग अधिकाऱ्याने या स्टार किड्स ना उचललं. मागच्या सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासूनच समीर वानखेडे यांच नाव प्रकाशझोतात आलंय.

वानखेडे कुणालाही दयामाया दाखवत नाहीत. अत्यंत शिताफीने सापळा रचून ते ड्रग्ज पार्ट्यांचा भांडाफोड करतात. त्यांना मिळालेली खबर ही पक्की खबरच असते. त्यामुळे वानखेडेंपासून ड्रग्ज माफिया नेहमी सतर्क राहतात.

पण वानखेडे यायच्या आधी एक अधिकारी होते ज्यांच्या नुसत्या नावानेच ड्रग्ज माफिया थरथर कापायचे. त्यांचं नाव विश्वास नांगरे पाटील.

पोलीस अधिकारी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची कारकिर्द तशी स्फोटक, रंजक आणि तितकीच तरुणांना आकर्षण वाटणारी राहिली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा छडा लावला आहे.

गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांना थेट भिडणारी त्यांची वृत्ती जनतेसाठी आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली. पण ते प्रकाशझोतात आले रेव्ह पार्ट्यांच्या रेडमुळे. तब्बल तीन वेळा त्यांनी रेव्ह पार्टीवर छापा मारलाय आणि इतकंच नाही तर आयपीएलच्या स्टार खेळाडूंना देखील त्यात पकडलंय.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असतानाची ही गोष्ट.

४ मार्च २००७ च्या रात्री विश्वास नांगरे पाटील घरी टीव्ही पाहत बसले होते. अचानक एक फोन खणाणला. फोन होता डीसीपी सुनील फुलारी यांचा. त्यांनी पाटलांना सांगितलं की, सिंहगडाच्या पायथ्याशी एक रेव्ह पार्टी होणार आहे. तातडीने तिथं रेड मारता येते का बघा ?

त्यावेळी फुलारी हे पुणे शहराचे डीसीपी होते. आणि नांगरे पाटील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक. सिंहगडचा भाग पाटलांच्या हद्दीत येत होता.

आता रेड मारायची तर तोपर्यंत तरी नांगरे पाटलांना रेव्ह या शब्दाचाच अर्थच माहीत नव्हता. त्यांनी रेडला जाण्याआधी तो शब्द गुगलवर सर्च केला. पण त्यातून इतकं काही समजलं नाही. त्यावर सूर्यवंशी नावाचे एक इन्स्पेक्टर होते ज्यांनी ही माहिती फुलारी यांना दिली होती. त्यांच्याशी पाटलांनी बोलून घेतलं. नीट माहिती घेतली.

आता पाटलांनी रेड मारायची तयारी सुरु केली. लोकेशन होत, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेलं डोणजे गाव. पार्टी मोठी असल्याची माहिती मिळाल्यानं पाटलांनी किमान शंभर दीडशे अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं. पण सगळ्यांना घेऊन जाण्याआधी स्वतः विश्वास नांगरे पाटील तिथं पोहोचले. जेणेकरून त्यांना निश्चित अंदाज येईल.

त्यांनी तो पार्टीचा माहोल पाहिला.

विश्वास नांगरे पाटील सांगतात, तेच तिथं एकटे मिशीवाले होते. ती मुलं ड्रग्जचा नशेत त्या ट्रान्स म्युजिकवर अशाप्रकारे नाचत होती कि त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता.

पाटलांनी संपूर्ण परिस्थिती बघून नंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं. जिथं पार्टी घडत होती तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी बाण दाखवून विशिष्ट ठिकाण दाखवण्यात आलं होत. पोलीस माग काढत पार्टीत जाऊन पोहोचले.

पोलिसांनी त्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना अटक केली होती. यात २१ मुली होत्या. या २८७ लोकांच्या ब्लड आणि युरिनचं प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातल्या, २४९ जणांनी ड्रग्ज घेतल्याचं स्पष्ट झाले होत.

या कारवाईनंतरच नांगरे-पाटील यांना ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ म्हणून मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

त्यानंतर मुंबईत पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी एका रेव्ह पार्टीवर छापा मारला होता. यात बॉलिवूडच्या एका खलनायकाचा मुलगाही सापडला होता. मात्र, वैद्यकीय चाचणीनंतर या खलनायकाच्या मुलाला निर्दोष सोडण्यात आलं होतं.

पुढं आयपीएल सुरु असतानाच विश्वास नांगरे पाटलांनी एक रेड मारली होती. ही रेव्ह पार्टी जुहू मधल्या ओकवूड हॉटेलमध्ये सुरु होती. या पार्टीत आयपीएलमधील क्रिकेटपटू राहुल शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेन पार्नेल सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. ड्रग्जबाबत आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, असा दावा शर्मा पार्नेल यांनी केला होता.

या रेव्ह पार्टीत पोलिसांनी १०० जणांना ताब्यात घेतले होते. त्यात ४४ जणांनी कोकेन कनाबीज आणि एमपीडीसारख्या ड्रग्जचे सेवन केल्याचे स्पष्ट झालं होत. यावर विश्वास नांगरे पाटलांना टार्गेट करण्यात आलं. आमच्या नाईट लाईफवर हल्ला करणारा हा कोण ? अशा प्रकारच्या हेडिंग्स काही वृत्तपत्रात छापून आल्या होत्या.

पण नंतर या क्रिकेटपटूंचे रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले. आणि विश्वास नांगरे पाटलांची ओळख दबंग पोलीस अधिकारी म्हणून झाली.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.