असं पुस्तकांचं मार्केट भारतात असतं तर!

आपल्या आयुष्याची सुरुवातंच होते ते पुस्तकांपासून. कळायला लागलं की तेव्हापासून पुस्तकांशी आपला संबंध आलेला असतो. आयुष्यात कुणीही आपली साथ सोडली तरी ज्ञान ही एकमात्र गोष्ट आहे जी कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. म्हणूनंच आपल्याला ज्ञान देणाऱ्या या पुस्तकांना आपला खरा मित्र मानल्या जातं. बरेच जण पुस्तकी शिक्षण पूर्ण झालं की पुस्तकांची साथ सोडतात आणि बरीच अशीही असतात जी आयुष्यभर पुस्तकांना उराशी बाळगून धरतात.

जर पुस्तकांबद्दल अशीच आत्मीयता तुम्हालाही असेल तर पुढची माहिती वाचून तुम्ही थक्क व्हाल. आणि आयुष्यात एकदा तरी या जागेला भेट देण्याची इच्छा नक्कीच मनात येईल…

पुस्तकांच्या दुकाना, मोठ्या लायब्ररीज, तसंच पुस्तकांचा बाजार आपण बघितलेलाच आहे. या सगळ्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं विकत घेऊन वाचावी लागतात. लायब्ररीतून पुस्तक घेताना त्याची नोंद केली जाते आणि ठराविक वेळेनंतर ते पुस्तक तुम्हाला परत करावं लागतं. नाही केलं तर दंड भरावा लागतो. भारतात तर असंच आहे. पण भारताच्या बाहेर एक असं पुस्तकांचं मार्केट आहे जिथे असा कोणताही नियम नाहीये. शिवाय इथे पुस्तक रस्त्यावर खुली ठेवली जातात, अगदी रात्रीही! आणि तरी एकही पुस्तक गायब होत नाही.

पुस्तकाचं असं मार्केट आहे इराकमध्ये. बगदादमध्ये मुतानब्बी स्ट्रीटला हे भलंमोठं मार्केट आहे. या इराकी बुक स्ट्रीटला ‘बगदादच्या लिटरेचरचं हृदय आणि आत्मा’ असं संबोधलं जातं.

या बुक मार्केटमध्ये शेकडो पुस्तकं रस्त्यावर पसरलेली असतात. दररोज कित्येक लोक या बुक मार्केटला भेट द्यायला येतात. त्यांना आवडतील ती पुस्तकं स्वतः हाताने घेतात. पुस्तकं बघतात, विकत घेतात. तर काही जण पुस्तकं तिथेच वाचतात, काही घरी घेऊन जातात. वाचण्यासाठी पुस्तकं घरी घेऊन जाताना अनेक जण तशीच नेतात. खरेदी न करता. पण विशेष म्हणजे ती पुस्तकं प्रामाणिकपणे परतही आणली जातात.

अनेकदा रस्त्यावर पसरवलेल्या या पुस्तकांच्या ठेल्यांवर कोणताही व्यक्ती नसतो. रात्रीही ही पुस्तकं आहे तशीच मांडलेली असतात. पण तरीही पुस्तकं चोरी होत नाहीत. एखादं पुस्तक गायब झालं म्हणजे  पुस्तक त्याच्या जागेवर नसेल तर त्याठिकाणी पैसे तरी असतातंच. कोणीही पैसे न देता जात नाही. हेच या इराकी बुक स्ट्रीटचं सौंदर्य आहे.

इराक बुक मार्केटमधील लोकांचं इतकं बिनधास्त राहण्याचं कारण आहे तो त्यांचा एका उक्तीवर असलेला विश्वास. ती म्हणजे…

“वाचणारा कधीही चोरी करत नाही आणि चोर कधीही वाचत नाही”

बगदाद सारख्या हिंसेचं सावट असलेल्या देशात ज्ञानावर असलेला इतका विश्वास खरंच अचंबित करतो.

पण या मुतानब्बी स्ट्रीटचा इतिहास तितका सुंदर नाही. तो अगदी अशांत आहे.

हे बुक मार्केच तसं हजारो वर्ष जुनं आहे. पण मार्च २००७ मध्ये या स्ट्रीटवर कार बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत जवळपास २६ जणांचा मृत्यू झाला. सगळी दुकानं, पुस्तकं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलली. उपजीविकेचं एकमात्र साधन असलेल्या लोकांची अवस्था तर दयनीय झाली. पण पुस्तकांची कास धरणारे लोक इतक्यात हार मानतील हे अशक्यंच. धाडस आणि कोणत्याही गोष्टीमुळे न खचणं हा तर पुस्तकाचा ‘पहिला गुरुमंत्र’.

अनेकांचं सगळं गमावलं तरी ही लोकं पुन्हा उभी राहिली. बघता बघता वर्षभराच्या आत हे बुक मार्केट पुन्हा त्याच उत्साहात साहित्यिकांसाठी खूलं झालं. तेव्हापासून आजपर्यंत हा उत्साह कायम आहे. अनेक पर्यटक या स्ट्रीटला आवर्जून भेट देतात. इथल्या साहित्य संपदेचा आस्वाद घेतात. पण इथे आलेल्या पर्यटकांना अजून एक गोष्ट आकर्षित करते ती म्हणजे ‘मुतानब्बी स्ट्रीट कॅफे’. या कॅफेचं मुळ नाव आहे ‘शबंदरचा कॅफे’. ज्याचे मनेजर आहेत अल खशाली.

या स्ट्रीटवर झालेल्या बॉम्बस्फोटात अल खशाली यांनी त्यांची चार मुलं आणि एक नातू गमावला. पण तरीही त्यांनी हार न मानता या स्ट्रीटचं वैभव असलेला हा कॅफे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांची परंपरा कायम ठेवायची होती.

अल खशालींच्या पणजोबांनी या कॅफेची सुरुवात १९१७ मध्ये केली होती. पूर्वी हे साहित्यिक लोकांसाठी मेळाव्याचं ठिकाण होतं. इराकी कवी, नाटककर, तत्त्वज्ञ, विरोधक आणि अगदी राजकारणी याठिकाणी जमायचे आणि मनसोक्त ज्ञानाच्या देवाण-घेवाणीच्या मैफिली रंगवायचे. जुन्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवणारा हा कॅफे आजही अनेकांना भुरळ पडतो. 

इराकचं हे बुक मार्केट पुस्तक प्रेमाला चालना देतं तर इथले लोक जगण्याची प्रेरणा देतात. हे बुक मार्केट बगदादच्या तरुणाईच्या भवितव्यासाठी कार्यरत आहे. हिंसाचार म्हटलं की लगेच बगदाद असं नाव तोंडात येणाऱ्या बगदादचा हा चेहरा खरंच अचंबित करणारा आहे. बगदादचं हे बुक मार्केट मोठमोठ्या देशांना ‘तोंडात बोटं’ घालायला भाग पाडत आहे. ज्ञानाचा आव आणनं आणि खरंच ज्ञान असणं यात फरक असतो. या बुक मार्केटमधील लोकं ‘सुशिक्षित’ म्हणजे काय, हे खऱ्या अर्थाने सिद्ध करतात.

अशी ही कमाल जागा माहित झाल्यावर तीचं नाव अनेक पुस्तक प्रेमी आणि साहित्यिकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये सामील होणार नाही, हे अशक्यच!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.