इराणमध्ये एकापाठोपाठ एक होणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मृत्यूचं रहस्य काय आहे?

इराण म्हणजे जगातल्या शिया मुसलमानांची संस्कृती जपणारा एकमेव देश. सलग मोठी परंपरा, जगातील एक प्राचीन संस्कृती म्ह्णून इराण प्रसिद्ध आहे.

मराठीवर प्रचंड प्रभाव असलेली फारसी भाषा इथलीच. एकेकाळी सिंधूपासून युरोपपर्यंत पसरलेल्या इराणच्या साम्राज्याला कुणी दुसरा तोड नव्हता.

पण आज हा देश सगळ्या बाजुंनी शत्रूंनी घेरलेला आहे. तरीही त्यावर मात करत अमेरिका-इस्रायलला डायरेक्ट नडणारा इराण आता संकटात सापडला आहे.

इराण चर्चेत आला तो त्याच्या न्यूक्लियर कार्यक्रमांसाठी.

दुसऱ्या कोणत्याही गरीब आशियाई देशांनी अणुबॉम्ब विषयी काही बोललं की अमेरिका-इस्रायलला पोटशूळ उठतो.

भारताने अणुचाचणी केली तेव्हाही या लोकांनी भारताला वाळीत टाकलं होतं.

त्यात एका मुसलमान देशाकडं अण्वस्त्रे येणार म्हटल्यावर इस्रायलने आडकाठी घालायला सुरुवात केली.

आजच इराणचे सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ मोहसेन फक्रीझादेह यांचा खून झाला. भारतासाठी अब्दुल कलाम जसे होते ते स्थान या माणसाचं इराणी समाजात होतं.

इराणच्या अणू क्षेत्रातील तांत्रिक बाबींचा सगळं बोजा हा फक्रीझादेह यांनी एकट्याने उचलला होता.

अमाद AMAD प्रोजेक्ट या नावानं ओळखला जाणारा इराणचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच्या अंतर्गत इराणला अणुबॉम्ब घेऊन सुसज्ज बनवायचे अशी त्यांची कल्पना होती.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी फक्रीझादेह हाच माणूस याचा प्रमुख आहे असं भर सभेत सांगितलं होतं.

“फक्रीझादेह – या माणसाचं नाव लक्षात ठेवा” असं नेत्यान्याहू आपल्या सैनिकांशी बोलताना म्हणाले होते.

फक्रीझादेहयांच्यावर डोळा ठेवून असणारा नेत्यान्याहू एकटाच ज्यू नेता नाही.

त्यांच्याधीचा कट्टर राजकारणी व माजी पंतप्रधान म्हणजे एहूद ओल्मर्ट. इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला नेता म्हणून ओल्मर्ट याला ओळखलं जातं.

हजारो पॅलेस्टिनी मुस्लिमांची कत्तल करणाऱ्या क्रूरकर्मा एरियेल शॅरनच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असणारा माणूस.

त्यानेही फक्रीझादेह यांच्यावर अनेक वर्षे पाळत ठेवली होती. इराणने या माणसाला जगापासून लपवून ठेवलं होतं, तरीही ‘फक्रीझादेह हा माझा मित्र आहे. तो समोर आला तर त्याला मी ओळखू शकेन’, असं एहूद ओल्मर्ट म्हणाला होता. त्याचं कारणही त्यानं पुढच्या वाक्यात सांगितलं होतं –

“He does not have immunity, he did not have immunity, and I don’t think he will have immunity!” 

“फक्रीझादेहला आज ना उद्या माझ्या हातूनच मरायचं आहे आणि त्याचं मरण माझ्या हातात आहे…” असं एहूद ओल्मर्ट यातून सांगू बघत होता.

ते काल घडलंच. आज तेहरानच्या रस्त्यात त्याच्या शरीराचं रक्तमांस पसरलेलं आहे.

२०१० पासून २०१२ पर्यंत अशा अनेक शास्त्रज्ञांचे ओळीने खून झाले. प्रोफेसर मसूद अली मोहम्मदी हाही असाच एक माणूस. इराणच्या परमाणु विभागाची धुरा सांभाळणारा हा वरिष्ठ शास्त्रज्ञ.त्याच्याच काळात इराण इस्राएलला धडा शिकवेल असं बोललं जायचं.

१२ जानेवारी २०१० ला राजधानी तेहरान मध्ये बॉम्ब फोडून त्याची हत्या करण्यात आली.

हा स्फोट घऊन आणणारा माणूसच टाइम मॅगझिनच्या हाती सापडला. मजीद जमाली फाशीद याने आपलं सगळं ट्रेनिंग इस्राएलच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने केल्याचं कबूल केलं होतं.

यांच्यानंतर इराणची सगळी धुरा माजिद शरियारी यांच्यावर होती. इराणमध्ये या माणसाला एक सेलिब्रेटी स्टेटस होतं. त्याच्या गाडीत इस्राईलने बॉम्ब प्लांट केला. २९ नोव्हेंबर २०१० रोजी हा बॉम्ब फुटला.

शरियारी या स्फोटात जागीच ठार झाले. त्यांच्या सोबत असणारा एक माणूस आणि त्याची पत्नी हेही यात जखमी झाले होते.

या घटनेत इस्राईल सोबत अमेरिकेचा हात असल्याचे धागेदोरे माध्यमांच्या हाती सापडले होते. एरव्ही उठसूट कोणत्याही मुद्द्यावर बोलणाऱ्या युरोपियन युनियनने या वेळी ब्र शब्दही उच्चरला नाही.

आपल्या लाडक्या शास्त्रज्ञाला इराणी जनतेनं मोठ्या संख्येनं एकत्र येऊन निरोप दिला. त्याच्या स्मरणार्थ अनेक स्मारके देशात उभारण्यात आली. तेहरान शहराच्या न्यूक्लियर प्लांटला शरियारी यांचे नाव देण्यात आले आहे.

शरियारी यांच्यानंतर नव्या दमाचे शास्त्रज्ञ दारिश रांझेहीनेजाद यांनी हि जबादारी स्वीकारली.

आपणही आधीच्या दोघांप्रमाणे मारले जाऊ शकू याची पूर्ण कल्पना त्यांना होती. म्हणून आपल्या लहान मुलीसोबत प्रवास करणे त्यांनी कायमचे सोडून दिले.

हाय व्होल्टेजचे स्विच बनवून अणू गर्भातील रासायनिक क्रिया सुरु करण्याच्या कामात त्यांचे मोठे संशोधन होते.

२०११च्या जुलैमध्ये आपल्या बायकोसोबत असताना अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन त्यांना गोळ्या घातल्या. भर रस्त्यात त्यांचा खून करण्यात आला.

विज्ञानाची कास धरली म्हणून अशी कित्येक कुटुंबे इस्रायलने देशोधडीला लावली आहेत.

अनेक पाश्चात्त्य देशांनी यात इस्राएलचा हात असल्याचे मान्य केले आहे. स्वतः अमेरिकेच्या काही अहवालांमध्ये याचा उल्लेख आहे. पण एका गरीब मुसलमान देशासाठी पुढे यायला कुणीही धजावत नाही.

म्हणून हि साखळी सुरु राहिली.

मुस्तफा अहमदी रोशन या युवा वैज्ञानिकांबरोबरही असेच झाले. कमी वयात हा माणूस प्रचंड अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा शास्त्रज्ञ म्हणून नावाजला गेला होता. त्याच्याकडे या प्रोजेक्टची जबाबदारी येताच काहीच दिवसात त्याची मोटारसायकल बॉम्ब लावून उडवण्यात आली.

त्यांची चार वर्षांची मुलगी यातून योगायोगाने वाचली.

त्यांच्या कॉलेजात शिकणाऱ्या पोरांनी सरकारला पत्र पाठवलं. आपल्या शिक्षकांच्या नावे देशातील अणूभट्ट्यांना नावे द्यावीत अशी मागणी केली.

म्हणून सरकारने मुस्तफा अहमदी रोशन यांना ‘शहीद’ म्हणून दर्जा दिला. त्यांच्या नावाने देशात अनेक स्मारके उभारण्यात आली आहेत. 

Memorial of Iranian Murdered scientists

इस्रायलने या गोष्टींना मान्य केलं नाही पण आपण हे करत नाही असा नकारही त्यांनी दिलेला नाही. मोशे यालोन हा त्यांचा संरक्षणमंत्री म्हणाला होता  कि

“कितीही किंमत चुकवावी लागली तरी आम्ही इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही!”

दुसरीकडे इराणी जनता अजूनच पेटून उठली आहे. अमेरिकेच्या भीतीने इराणचे पेट्रोल स्वस्त असूनही ते घेण्यास कुणी तयार होत नाही… अगदी भारतसुद्धा!

ट्रम्प आणि सर्वच जग त्यांच्या विरोधात असताना त्यांनी स्वतःच्या जीवावर नवीन शोध लावले होते. आताही या सगळ्या विरोधाला मागे सारून इराणला अण्वस्त्रसज्ज बनवण्यासाठी तेथील जनतेने आपली कंबर कसली आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.