शाहिद आफ्रिदीबरोबर नडणारा पठाण निवृत्त झालाय!
क्रिकेटची सध्याची टीम इंडिया ही यंग टीम ओळखली जातेय. गेल्या २-३ वर्षात अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलीय.
गेल्या वर्षीच २०११ च्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंगने निवृत्ती जाहीर करून क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हा अनेकांनी ही मोठी दुःखदायक घटना असल्याचं म्हटलं होतं. तर युवराज सिंग वडिलांसह बऱ्याचजणांनी युवराजचं करिअर जाणीवपूर्वक संपवण्यात आलं असल्याचा आरोप ही केला होता.
तसेच २०१९ च्या वर्ल्ड कपमधील सेमीफायनल मध्ये हरल्यानंतर तेव्हापासून कर्णधार धोनी देखील परत मैदानावर दिसला नाही.
आत्ता २०२० चालू होवून अवघे चार दिवस झाले नाहीत तोच आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली. तो खेळाडू इरफान पठाण.
टीम इंडिया मधील अधिकतर खेळाडू हे अनेक संकटांवर मात करत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत स्टार बनलेले. इरफान पठाण देखील त्यातलाच एक. लहान असताना आपल्या मोठा भाऊ युसूफ सोबत मस्जिदमध्ये झाडू मारून ते आपल्या जीवनाचा गाडा ढकलत होते.
अंडर-१९ मधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलेलं. आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याच्या पुढच्याच त्यानं टीम इंडियात स्थान पटकावलं. त्याच्या बॉलिंग शैली आणि बॉल स्विंग करण्याच्या पद्धतीमुळे
त्याची तुलना महान बॉलर वासिम अक्रमशी केली जाऊ लागली होती
अगदी त्याच रीतीने त्यानं आपली कारकीर्द सुरु केली. बघता बघता अल्पावधीतच अनेक विक्रम त्यानं आपल्या नावावर केले.
२००६ मध्ये कराची येथे पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये त्यानं हॅट-ट्रिक घेतलेली. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचा हा विक्रम आजही कोणी मोडू शकलेलं नाही.
त्याच वर्षी वनडे मध्ये सर्वात वेगवान १०० विकेट्स घेणारा भारतीय बनला होता. त्याने ५९ मॅचमध्ये १०० विकेट्स पूर्ण केलेल्या. तसेच टेस्टमध्ये १०० विकेट्स घेण्यात तो दुसऱ्या स्थानावर होता. त्याने २८ टेस्टमध्ये १०० विकेट्स झटकावलेल्या. अनेक मॅचमध्ये अडचणी काळात बॅटिंग करून देखील त्याने भारताला विजय मिळवून दिलेला.
विशेषतः पाकिस्तानमध्ये त्याच्याबद्दल राग असायचा. त्यांच्याविरुद्ध तो हमखास खेळायचा. याच फ्रस्ट्रेशनमध्ये शाहिद आफ्रिदीने त्याच्यावर टीका केलेली,
“इरफान पठाण हा खरा पठाण नाहीच!”
त्याच्या या मुर्खपणावर भारतातचं नाही तर पाकिस्तानातही टीका झाली. पण इरफान काही बोलला नाही त्याने आपल्या खेळातून आफ्रिदीला उत्तर दिलं.
अशा या सर्वोत्तम ऑल राऊंडर पैकी एक असलेल्या इरफान काल सर्व प्रकारच्या फॉरमॅट मधून निवृत्ती स्वीकारली.
निवृत्ती जाहीर करताना इरफान भावुक झालेला. तो म्हणाला,
मी अधिकृतरीत्या क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करतोय. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मस्जिदमध्ये भावासोबत खेळणारा मी एक दिवस टीम इंडिया कडून खेळेल. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल.
त्यांच्यासोबत घालवलेला क्षणातून आयुष्यभराच्या आठवणी मिळतील. अनेकजण माझ्यासाठी मोठ्या भावासारखे होते.
लहानपणी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण केलं. हा माझ्यासाठी फार भावुक क्षण आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक क्षण असा येतो, जेव्हा आपली इच्छा नसताना देखील आपल्या आवडत्या गोष्टीचा निरोप घ्यावा लागतो.
आज मी पण त्या क्रिकेटचा निरोप घेतोय, ज्याबद्दल मी रात्र-दिवस विचार करत असायचो.
यात माझी साथ देणाऱ्या कुटुंबाचे, माझ्या कोचचे आणि सहकारी खेळाडूंचे मी आभार मानतो. सरते शेवटी सगळ्यात महत्वाचे माझे फॅन्स.
टीम इंडियाकडून मी शेवटचं २०१२ ला खेळलेलो. त्यांनंतरही मी अनेक प्रयत्न केले पण आता २०१९ संपून २०२० सुरु झालं. आजही सोशल मीडियावर फॅन्स कडून विषय निघतो,
‘पुन्हा ये, कमबॅक कर’.
त्यांचं मी सर्वात जास्त आभार मानेल, त्यांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. पण आता जाण्याची वेळ आलीय. आयुष्यातील एक नवा प्रवास सुरु करण्याची वेळ आलीय. मला सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार.
हे ही वाच भिडू