मुलाची औकात काढली म्हणून इरफानचे वडील मियाँदादला पाकिस्तानात जाऊन नडले होते.

अब्बा क्या करते हे ?

मियाँदाद का हार्मोनियम बजाते हें !

क्रिकेटच्या मैदानात भारताकडून सतत हारून हारून मन भरलं नसेल कि काय म्हणून पाकिस्तानचा कोच जावेद मियाँदाद याने इरफान पठाणला त्याच्या बॉलिंगवरून दोन शब्द ऐकवले होते. आणि मग मियाँदादला चार शब्द ऐकवायला थेट इरफान पठाणचे वडील पाकिस्तानात येऊन ठेपले होते. पूर्ण मॅटर बघू म्हणजे नक्की काय गडबड मियाँदादने केली होती.

२००४ सालच्या मैत्रीपूर्ण पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी बीसीसीआयने खेळाडूंना विचारणा केली की पाकिस्तानमध्ये खेळायला जायला सगळे तयार आहात का ? पण सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे ! गांगुलीने खेळाडूंची मिटिंग घेऊन हे प्रकरण सांगितलं तर यावर खेळाडू ठाम होते कि गेलं तर पाहिजेच कारण आपल्यात पाकिस्तानला हरवण्याची धमक आहे.

या मीटिंगमध्ये १८-१९ वर्षांचा इरफान पठाणसुद्धा होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करून आता पाकिस्तान दौऱ्यावर खेळायला जाण्याची संधी मिळणार म्हणून तो खुश होता. पाकिस्तानच्या दौऱ्यावर त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि फक्त भारतातलेच चाहते नाही तर पाकिस्तानातले चाहते सुद्धा त्याने कमावले.

त्यावेळी पाकिस्तानचा कोच असणाऱ्या जावेद मियाँदादला हे पचलं नसावं. त्याने इरफानच्या कौतुकावर विरजण घातलं आणि तो म्हणाला कि,

इरफान पठाणसारखे बॉलर पाकिस्तानच्या गल्ली गल्लीत आहेत…

इतकी तारीफ उगाच करणं त्याला मान्य नव्हतं. पण त्याने केलेलं हे विधान त्याला खतरनाक पद्धतीने गोत्यात आणणार होतं हे हि त्याला माहिती नव्हतं.

मियाँदादच्या या विधानानंतर वनडे सिरीज सुरु झाली. या वनडे सिरीजमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये इरफानला संधी मिळाली नाही मात्र तिसऱ्या वनडेत त्याने संधीच सोनं केलं आणि ३ बळी निवले. चौथ्या आणि पाचव्या मॅचमध्ये अनुक्रमे २ , ३ विकेट मिळवल्या. हा दौरा इरफानने गाजवला. इरफानमुळे भारताच्या सिरीज जिंकण्याला हातभार लागला.

३ सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि तीनही सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट इरफानने घेतल्या होत्या. बालाजीसोबतचा त्याचा सुंदर स्पेल आजही सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्या सिरीजमध्ये एकूण १२ विकेट इरफानने मिळवल्या होत्या. पाकिस्तानी बॅटिंग ऑर्डरला इरफानने बॉलच समजत नव्हते.

या सीरिजच्या शेवटच्या टेस्टमध्ये एक ट्विस्ट आला. हि मॅच पाहण्यासाठी खुद्द इरफान पठाणचे वडील मेहमूद खान पठाण पाकिस्तानात हजर होते. मॅच पाहणं हे खोटं कारण होतं. पेपरमध्ये जावेद मियाँदादने आपल्या मुलाची औकात काढली म्हणून ते मियाँदादची खरडपट्टी काढण्यासाठी खास आले होते. जावेद मियाँदादच्या वक्तव्याने ते अस्वस्थ आणि नाराज झाले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या आपल्या मुलाला जावेद मियाँदाद गली क्रिकेट खेळणारा मुलगा समजत होता यावर त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता.

भारताने सिरीज जिंकली पण इरफानचे वडील ऐकायला तयार नव्हते. त्यांनी इरफान पठाणला सांगितलं कि मला जावेद मियाँदादला भेटायचं आहे ,मला पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घेऊन चल. इरफानला काय अंदाज लावायचा त्याने लावला आणि उगाच तमाशा नको म्हणून तो वडिलांना म्हणाला कि

तुम्ही त्याला भेटावं असं मला जरुरीचं वाटत नाही.

पण योगायोगाने इरफानच्या वडिलांशी जावेद मियाँदादची गाठ पडली. इरफानच्या वडिलांना समोर बघून जावेद मियाँदादची ततफफ सुरु झाली, ज्याच्या मुलाबद्दल आपण बेफिकीरपणे बोललो तो चक्क समोर पाहून मियाँदादची भीतीने गाळण उडाली.

त्याने थेट मेहमूद खान पठाण याना हात जोडले आणि म्हणाला कि मी तुमच्या मुलाबद्दल काहीही बोललो नाही.

त्याची हि अवस्था बघून त्याला शिव्या घालण्यासाठी आलेले इरफानचे वडील म्हणाले कि,

मी काही तुमची खरडपट्टी काढायला आलेलो नाही, तू एक चांगला खेळाडू आहेस असं मला वाटलं होतं म्हणून तुला भेटायचं होतं.

त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिडेपणाच्या छटा असल्याचं इरफान सांगतो. त्याची अब्बूनी गोड बोलून जावेद मियाँदादची चांगलीच तासली होती. जावेद पण समजून गेला पण काही बोलू शकला नाही.

भारताने पाकिस्तान दौरा गाजवला होता. कसोटी २-१ ने आणि वनडे ३-२ ने जिंकून शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर मात्र जावेद मियाँदादने एकाही भारतीय खेळाडू विरुद्ध विधान केलं नाही. इरफानच्या वडिलांचा त्याने धसकाच घेतला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.