आज दोन वर्ष झाली इरफानला जावून…

आज इरफान खानला जावून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण काही गोष्टी तशाच असणं सुंदर असतं. इरफान कुठेतरी असेल अस वाटतं. हा लेख जितेंद्र घाटगे यांनी इरफानला हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केलेलं तेव्हा लिहलेला.

इरफानच्या स्मृतीदिनानिमित्त तोच लेख पुन्हा पब्लिश करत आहोत..

‘मला हवं ते सर्व मिळाले आहे. आयुष्यपासून कुठलीच वेगळी मागणी नाहीये. तरी पण मन भरल्यासारखं वाटत आहे. रोज नवीन दिवस उगवतो, मी मात्र तोच जुना. तेच जुने जग. तेच नेहमीचं एकरेषीय आयुष्य.

आयुष्याच्या ट्रेनची चैन ओढावी आपला प्रवास इथेच थांबवावा ह्या विचाराने मी काल पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. बंदूकची थंडगार नळी डोक्याला लावली अन बाहेर आकाशात उगवलेलं सुंदर इंद्रधनुष्य समोरच्या खिडकीतून दिसले.

मैंने सोचा, यार इसको देखके तो नही मरा जा सकता!

मी खिडकी बंद करायला उठलो अन परत जागेवर आलो तेव्हा स्वतःचा जीव घेण्याचा ‘तो’ क्षण निसटून गेला होता. त्यांनतर त्या दिवशी मरावं असं नाही वाटलं’. 

२००५ साली आलेल्या ‘रोग’ सिनेमात सतत आत्महत्येचे विचार डोक्यात घोळत असलेला नायक इन्स्पेक्टर उदय सिंह राठौड़ (इरफान खान) आपल्या उपचारासाठी मानसोपचार तज्ञाकडे आलेला असतो. उपचारासाठी औषध लिहून देताना डॉक्टर सांगतात की,

 ‘इसीको तो जिंदगी कहते है मेरे भाई, इतनी आसानी से पीछा नही छोड़ने वाली!’

नियती आणि योगायोग एखाद्यासोबत कशा प्रकारे आंधळी कोशिंबीर खेळेल याचा काय नियम. आपण फक्त डोळ्यावर पट्टी बांधून घुमत राहायचं. पाठीमागून आयुष्य धप्पा देईल त्या दिवसाची वाट पाहत. इरफानच्या आजाराबद्दल बातमी समजली होती तेव्हा लगेच मनात येऊन गेलं की त्या डॉक्टरच्या फिलॉसॉफीला प्रत्यक्ष आयुष्यात इरफान पेक्षा चांगलं कोण समजू शकेल.

बॉलीवूड मध्ये सुपरस्टार झालेल्या व्यक्तीने पूर्वी केलेल्या स्ट्रगल्सला अतिशयोक्ती झळाळी असते. म्हणजे एखादा कलाकार रेल्वे स्टेशनवर, फुटपाथवर उपाशीपोटी झोपून कसा यशस्वी झाला याचे किस्से रंगवून सांगितले जातात, चवीने ऐकले जातात.

त्यामुळे ‘स्ट्रगलर्स’ ह्या शब्दाची हिंदी प्रेक्षकांची व्याख्या तोकडी आहे. म्हणूनच की काय बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी सुद्धा मूठभर प्रेक्षकवर्ग वगळता आपण कुणाच्या खिजगणित देखील नाही ह्या विचाराने येणारं नैराश्य प्रेक्षकांना इतकं महत्वाचं वाटत नाही.

घरची आधीची परिस्थिती चांगली असल्याने एकदा स्वतःला इंडस्ट्रीत सिद्ध करून दाखवले तरी त्यांनी तो संघर्ष ‘उपाशीपोटी’ न केल्याने त्याची दखल घेतली जात नाही.

सैफ अली खान पासून अक्षय खन्ना पर्यंत अनेक कलाकार ह्या मानसिकतेला बळी पडले आहे. अनकन्वेशनल चेहरा अन देहबोली लाभलेल्या इरफान खान बद्दल बोलायचं तर त्याच्या विशिष्ट संवादफेकीमुळे हा माणूस कायम चरसच्या नशेत असतो असा समज अनेक वर्षे इंडस्ट्रीत होता.

साहबज़ादे इरफान अली खानचे वडील मूळचे जमीनदार आणि टायर व्यावसायिक असल्याने घरात बर्यापैकी सुबत्ता होती. वडिलांना व्यवसाय करण्यापेक्षा शिकारीचा जास्त नाद होता. लहानपणापासून वडिलांसोबत शिकारीला जाऊन सुद्धा छोटा इरफानला एकसुद्धा प्राण्याची शिकार नाही करता आली. तेव्हा शाकाहारी असल्याने नॉन व्हेज खाणे त्याला जमायचे नाही. अशा वेळी वडील चिडवायचे की,

‘क्या पठान के घर ब्राह्मण पैदा हुआ है!’

गेल्यावर्षी ईदच्या दरम्यान बकऱ्याची कुर्बानी देण्याविरोधात इरफान ने एक वक्तव्य केले होते. त्याने केलेल्या प्रश्नावर बराच गदारोळ माजला होता. त्याचे मूळ इरफान च्या बालपणात वडिलांसोबत शिकारीच्या आठवणीत दडले आहे. ‘दुसऱ्याचा जीव घेऊन तुम्ही पुण्य कसे कमावू शकता?’ असा सवाल विचारणारा दुसरा एक खान आणि हौसेसाठी काळवीट शिकार करणारा दुसरा खान एकाच बॉलीवूड मध्ये नांदतात हा विरोधाभास रंजक आहे.

शाहरुख-आमिर-सलमान सारख्या देखण्या चॉकलेट हिरोंकडे पाहून आपणही अभिनेता बनू शकतो ही प्रेरणा हल्ली अनेक नवख्या कलाकारांना मिळत असेल. इरफान सारखा सामान्य चेहरा लाभलेले असंख्य कलाकार पडद्यावर कुठल्या ऍक्टर्सना पाहून प्रेरीत होतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

सध्या आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म यातील दरी मिटवत चौफेर उधळणाऱ्या इरफानला पाहिल्यावर अनेक जण विश्वास ठेवणार नाही की आपला चेहरा सुद्धा जनता स्वीकारेल हा विश्वास, ज्याला अभिजन वर्ग नाक मुरडतो त्या ‘मिथुन चक्रवर्ती’ ला पाहून आला होता.

इरफान १०-१२ वर्षांचा असताना मिथुनचा ‘मृगया‘ प्रदर्शित झालेला. त्याच्या आणि आपल्या चेहऱ्यात कमालीचे साम्य आहे हे समजल्यावर त्याचा आत्मविश्वास बळावला. मृगयामध्ये असलेले मिथुनचे सर्व संवाद पाठ करून मित्रांना सतत ऐकवायचा.

इरफान मध्ये अभिनयाचे ‘किडे’ आधीपासूनच होते. कमीत कमी १० नाटकांचे पाठबळ असले तरच दिल्लीच्या NSD त प्रवेश मिळतो हे समजल्यावर त्याने चक्क खोटी लिस्ट सादर करून तिथे प्रवेश मिळवला. तिथून मुंबईला आल्यानंतरचा प्रवास मात्र सरळ नव्हता.

इरफानच्या अभिनय क्षमता, सिनेमा निवडीबाबत भूमिका ह्या गोष्टी त्याचे बॉलीवूडमध्ये पदार्पणाचे वर्ष आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत सुसंगत नसल्याने यश, प्रसिद्धी कसे हुलकावणी देत गेले हे पाहणे उत्सुकतेचे ठरावे. 70s आणि 80s च्या दशकात कलात्मक आणि समांतर सिनेमा वेगळी वाट चोखाळत असताना लोकप्रियतेच्या अत्युच्च टोकावर होता.

हे यश केवळ अवॉर्डस आणि समीक्षकांनी सिनेमाला गौरवण्याइतपत मर्यादित नव्हते.

श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर'(१९७४) ने तब्बल २५ आठवडे थिएटर मध्ये मुक्काम ठोकला होता. आक्रोश आणि अर्धसत्य सारखे सिनेमे तिकिटबारीवर अफाट गर्दी खेचत होते. 90s चं दशक सुरू होण्याअगोदर मात्र सुमार मसालापट चित्रपटांनी बॉलीवूड बरबटलेले होते. नेमके त्याच दरम्यान १९८८ साली ‘सलाम बॉम्बे’ द्वारा एका छोट्या भूमिकेत इरफानने पदार्पण केले.

त्या वर्षी आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ ने धुमाकूळ घातला होता. १९८९ च्या ‘मैंने प्यार किया’ पासून सलमान तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. मनोरंजनात एस्पेकीजम शोधणाऱ्या कालखंडात कलात्मक आणि समांतर सिनेमा रसातळाला गेला होता.

जे काही थोडेथोडके प्रयत्न व्हायचे केवळ प्रेक्षकांच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित राहिले. हाच कालखंड होता की त्यात ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह यांनी देखील व्यवसायिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे इरफान खान ने अभिनय केलेले कमला की मौत, दृष्टी, एक डॉक्टर की मौत हे उत्तम प्रायोगिक सिनेमे गल्लेभरू सिनेमाच्या लाटेत वाहून गेले.

Screen Shot 2018 03 18 at 10.20.22 PM
FILM – HAASIL

या दरम्यान भारत एक खोज, चाणक्य, बनेगी अपनी बात, चाणक्य या टीव्ही सिरियल्स च्या माध्यमातून त्याने काम चालू ठेवल्याने आपला संघर्ष सोडला नव्हता. परंतु परीक्षा घेणारा हा कालखंड छोटा नव्हता. टीव्ही सिरियल्स मध्ये काम करणं त्याला कंटाळवाणं वाटत होतं.

एकदा सिरीयलच्या शूटसाठी सेटवर गेला असताना दिग्दर्शकाने त्याच्या विशिष्ट लकबीच्या संवादफेकीवर टोमणा मारला, 

“यार ये फिर से आ गया, अब ये सिन को वापिस लंबा कर देगा।”

एका नाटकात निर्मात्यांना इरफानचे काम पसंद न आल्याने ठरलेल्या रकमेपेक्षा अर्धे पैसे हातात ठेवत सांगितले,

“तुम्हारा काम भी बस ठीक ही तो हुआ।”

एकवेळ ‘आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही तुला काही देऊ शकत नाही’, असे सांगितले असते तरी चालले असते. मात्र अभिनय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केल्यानं इरफान पुरता हादरला होता. प्रस्थापित खान मंडळींच्या सिनेमात आपल्याला व्हिलनच्या गँग मधला मारधाड करणाऱ्या गुंडांची तरी भूमिका मिळावी असं त्याला वाटायचं. मात्र नवख्या अभिनेत्यासारखं आपला फोटो अल्बम घेऊन निर्माता दिग्दर्शकांसोबत स्वतःची मार्केटिंग करणे त्याला जमत नव्हते.

बॉलिवूड मध्ये खऱ्या अर्थाने व्यावसायिक सिनेमा ‘रीडीफाईन’ करण्याचे काम एकविसाव्या शतकात सुरू झाले. उशीर तर झालेला होताच, पण स्वतःला सिद्ध करण्याची हीच संधी होती. २००१ साली ‘दि वॉरीयर’ ह्या ब्रिटिश सिनेमातून फिल्म सर्कल मध्ये इरफानने वाहवा मिळवली होती. तिगमांशू धुलियाच्या कल्ट फॉलोविंग लाभलेल्या ‘हासिल'(२००३) ने मात्र बॉलीवूड मध्ये सर्वदूर त्याची प्रशंसा झाली.

२००३ साली शाहरुख खान रोमान्स चा ‘बादशहा’ म्हणून अढळ स्थान पटकावून होता. आमिर खान मि. परफेक्शनिस्ट चं बिरुद मिळवण्याच्या तयारीत होता. सलमान-अजय-अक्षय आपल्या फॅन फॉलोविंगला टारगेट करत यशस्वी अभिनेते म्हणून नावारूपास आले होते.

इरफान बॉलीवूड मध्ये मुख्य भूमिकेत काम मिळवण्यासाठी मात्र पदार्पणानंतर तब्बल १५ वर्ष जावी लागली. त्याने स्वतः आधी सुरवात करून सुद्धा वयाने आणि अनुभवाने कमी असलेले स्टारपुत्र सुपरस्टार पदावर पोचले होते.

शेक्सपियरन ट्रेजेडी ‘मॅकबेथ’ वर आधारित मकबूल(२००३) मध्ये इरफानला मुख्य भूमिकेत संधी मिळाली.  इरफानला लाभलेला चेहरा हा ‘कॉमन मॅन’ चा चेहरा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकाला त्यासोबत पटकन कनेक्ट होता येते. म्हणूनच की काय ‘पान सिंग तोमर’ पाहून कुणी निर्लेप, निर्विकार मनाने बाहेर पडूच शकत नाही. ‘मुंबई मेरी जान’ मध्ये आपले दूध विक्रेता थॉमसला पाहून अस्वस्थ झाला नसेल असा प्रेक्षक विरळा. लंच बॉक्स, हिंदी मिडीयम, करीब करीब सिंगल यात त्याने मध्यमवयीन प्रेक्षकांना दाखवलेले प्रेमाचे रूप वेगळे आहे.

हिरवळीत हात मागे करत रोमान्स करणाऱ्या शाहरुख पेक्षा गिऱ्हाईकांना साड्या विकत स्वतःच्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा ‘हिंदी मिडीयम’ मधील इरफान सध्या प्रेक्षकांना जास्त जवळचा वाटतो यात नवल नाही.

व्यावसायिक सिनेमा प्रयोगशील होत असण्याच्या सध्याच्या कालखंडात इरफान सारखे अभिनेते स्टार ड्रीव्हन फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण करू पाहत असतानाच त्याच्या आजाराची बातमी येऊन धडकते हे धक्कादायक होतं. बॉलीवूड मध्ये बादशाह, एक्का, शहेंशाह आपली वर्चस्व राखून असताना आपली पूर्वाश्रमीची ‘साहबजादे’ ओळख मिटवून फक्त ‘इरफान’ होण्यासाठीचा प्रवास लवकर थांबतो की काय अशी भीती चाटून गेली होती.

Screen Shot 2018 03 18 at 10.25.41 PM
LIFE OF PIE

इरफानचे आपल्या आईसोबतचे संबंध इतरांपेक्षा थोडे वेगळे आहे. त्याच्या कामाची प्रत्यक्ष तोंडावर कधीच स्तुती न करणारी आई आणि इरफान मध्ये नेहमी तूतू-मैंमैं चालू असते. असं असलं तरी इरफानला तिने बऱ्याच वेळा अनेक दुःखी प्रसंगात सावरून नेलं आहे.

‘नेमसेक’ सिनेमाच्या प्रीमियर प्रसंगी इरफानने आपल्या आईला पिक्चर कसा वाटला ते विचारले. त्यावर आईने उलट विचारले की, ‘ह्या पिक्चरचं डायरेक्टर कोण आहे मला त्यांना जाब विचारायचा आहे. उसकी हिम्मत कैसे हुई मेरे बच्चे को फ़िल्म में भी मारने की!’ इरफानच्या दुर्लभ आजाराबाबत समजलं तेव्हा नियतीच्या क्रूरपणाबद्दल राग आल्याशिवाय राहत नाही.

प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा एक पीक पॉईंट असतो. हाय पॉईंट. त्याच्या सामर्थ्याची आपल्या मनात असणारी प्रतिमा कायमची कोरली जाते. पण रुजली जात नाही. बॉलीवूड मध्ये टिकून राहण्याची धडपड कुणाला चुकलेली नाही. उतरत्या काळात सगळ्यांचेच ओंगळवाणे रूप इथे पहायला मिळते. हि केविलवाणी धडपड ती प्रतिमा कायम टिकू देत नाही. इरफान खान मात्र ह्या अलिखित नियमाला अपवाद ठरेल असं कायम वाटत आलं आहे.

इरफान खान हे नाव डोळ्यासमोर येताच,

त्याचा अनोख्या स्टाईल मध्ये आवाज, प्रेक्षकांच्या आरपार काळजात घुसणारी भेदक नजर समोर अन ऐटीत प्रस्थपितांना फाट्यावर मारत जगण्याचा एटीट्यूड समोर येतो. परिकथेसारखं झटक्यात मिळणारे यश नाही की चने फुटाणे खाऊन दिवस काढले असल्या भाकडकथा लोकांना अचंबित करण्यासाठी नाही.

हा लेख इरफान खान पहिल्यांदा रुग्णालयात ॲडमीट झाला होता तेव्हा जितेंद्र घाटगे यांनी लिहला होता.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. जबरदस्त लेखनशैली… 👌

Leave A Reply

Your email address will not be published.