लाल सिंग चड्ढा पडला, रक्षाबंधन चालला नाही, बॉयकॉट कल्चरमुळे बॉलिवूड संपतंय का ?

दिवसातल्या कुठल्याही वेळी ट्विटर उघडून बघितलं की, ट्रेंडमध्ये हमखास एक तरी बॉयकॉटचा ट्रेंड दिसतो. म्हणजे कधी एखाद्या पिक्चरला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू असतो, कधी एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला आणि कधीकधी सगळ्या बॉलिवूडलाच. हे बॉयकॉटचं लोण तसं बाकीच्या मुद्द्यांवर पण घसरतं, पण तावडीत सापडतं ते बॉलिवूडच. 

बरं आठवड्याला एखाद्या पिक्चरविरोधात ट्रेंड आला, तरी पुढच्या आठवड्यात नवा पिक्चर तर फिक्स येतोय. आणि काहीतरी कारणामुळं पुन्हा त्या पिक्चरला बॉयकॉट करण्याचा ट्रेंडही येतोय. विषय इतका गोल गोल फिरतोय त्यामुळं एक प्रश्न पडला, या बॉयकॉट कल्चरमुळे बॉलिवूड संपतंय का ? प्रश्न एकच असला तरी उत्तरं मात्र अनेक आहेत.

सध्या ट्विटरवर लायगर पिक्चरविरुद्ध बॉयकॉटचा ट्रेंड सुरु आहे. साऊथमध्ये मेजर हवा करणारा विजय देवराकोंडा, चंकी पांडेची पोरगी अनन्या पांडे आणि बॉक्सिंग रिंगचा चॅम्पियन माईक टायसन असली स्टारकास्ट या पिक्चरमध्ये आहे, पण बॉयकॉटची कारणं आहेत, ती म्हणजे अनन्या पांडे नेपोटीझम म्हणून पुढं आलीये, या पिक्चरला करण जोहरनं पैसा लावलाय आणि विजय देवराकोंडा प्रेक्षकांशी उद्धट वागलाय.

ही कारणं चूक की बरोबर हा आपला मुद्दा नाही, आपला मुद्दा आहे की सोशल मीडियावर ट्रेंड चालल्यावर पिक्चर खरंच पडतो का ?

अगदी ताजं उदाहरण बघायचं म्हणलं तर आमिर खानचा लालसिंग चड्ढा हा पिक्चर. हा पिक्चर रिलीझ होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड अगदी जोरदार चालला होता. आमिर खानची जुनी वक्तव्य, त्याच्या परदेशी भेटी असे अनेक मुद्दे यामागे होते. बॉलिवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार या पिक्चरनं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ११.७० कोटी रुपये कमावले, तर आतापर्यंत लाल सिंग चड्ढाला फक्त ५२.२३ कोटी कमावता आले आहेत.

आमिर खानचे पिक्चर हजार हजार कोटी कमवत असताना, लाल सिंग चड्ढा मात्र फ्लॉप गेलाय. 

आता याला फक्त बॉयकॉट हे एकमेव कारण आहे का ? तर नाही. लाल सिंग चड्ढाची लोकांमध्येही म्हणावी तशी चर्चा झाली नाही. त्यामुळंही अनेक लोकांनी पिक्चर बघायला जाणं टाळलं, असंही सांगितलं जातंय.

हे झालं लाल सिंग चड्ढाचं, मग या बॉयकॉटचा ट्रेंड आलेल्या इतर पिक्चरचं काय झालं ? 

अक्षय कुमारचा रक्षाबंधन बॉयकॉट करण्याचा ट्रेंड झाला आणि पिक्चरनं फक्त ३९ कोटी कमावले. याआधी दीपिका पादुकोणचा छपाक बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालला होता, तेव्हा छपाकनं ३४ कोटी रुपयांचीच कमाई केली होती. आमिर खानच्या पीके विरुद्धही बॉयकॉटचा ट्रेंड आला होता, मात्र या पिक्चरनं भारतात ३४० कोटी कमावले होते, दीपिकाच्या पद्मावतनंही ३०० कोटींच्या पलीकडे कमाई केली होती. त्यामुळं बॉयकॉटचा ट्रेंड आला तरी पिक्चर शंभर टक्के पडतोच असं नाही.

आता येउयात आपल्या मेन प्रश्नाकडे, बॉयकॉट कल्चरमुळं बॉलिवूड संपतंय का ? 

तर हा बॉयकॉटचा ट्रेंड तसा लई जुना असला तरी सध्या मात्र एकदम पॉवरमध्ये सुरू आहे. डेलॉईट कंपनीनं प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये फिल्म इंडस्ट्रीनं जेवढी कमाई केली, त्यातला ४० टक्के वाटा बॉलिवूडचा होता, तमिळ इंडस्ट्रीनं १४ टक्के, तेलगू इंडस्ट्रीनं १० टक्के, इतर प्रादेशिक पिक्चर्सनं २३ टक्के आणि हॉलिवूडनं १३ टक्के कमाई केली होती. 

त्यामुळं लॉकडाऊनच्या आधीची आकडेवारी पाहिली, तर बॉलिवूड तसं तेजीत होतं. 

लॉकडाऊननंतर म्हणजे २०२१ मध्ये बघायचं झालं, तर वर्ल्ड वाईड ग्रॉसच्या आधारानं सगळ्यात जास्त चाललेला पिक्चर ठरला ३६५ कोटी मिळवणारा तेलुगू पिक्चर पुष्पा द राइज. बॉलिवूडमध्ये फक्त दोन पिक्चरला शंभर कोटींचा आकडा गाठता आला होता, २९४ कोटी मिळवणारा सूर्यवंशी आणि १९३ कोटी मिळवणारा 83. मात्र तामिळ आणि तेलुगूमधले पिक्चर जोरदार चालले होते. 

२०२२ बद्दल बोलायचं झालं, तर सगळ्यात जास्त चाललेला राजामौलीचा आरआरआर, जगभरात या तेलुगू पिक्चरनं तब्बल १२०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

दुसऱ्या बाजूला तमिळ इंडस्ट्रीमध्ये विक्रमनं ५०० कोटी कमावलेत, बॉलिवूडला मात्र काश्मीर फाईल्सच्या ३४० आणि भूलभुलैय्या २ च्या २६६ कोटी रुपयांवरच समाधान मानावं लागलं. 

थोडक्यात काय तर आकडे सांगतात की साऊथ इंडस्ट्रीनं बॉलिवूडला काहीसं मागे ढकललंय.

पण साऊथ इंडस्ट्रीचा प्रभाव एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये. राजामौलीच्याच बाहुबलीनं भारतीय चित्रपट सृष्टीचं मॉडेल बदललं, आधी काही मोजकेच साउथचे पिक्चर डब होऊन भारतभर रिलीझ व्हायचे, आता मात्र बहुतांश पिक्चर बॉलिवूडच्या तोडीस तोड प्रमोशन करुन देशभर गाजतात, देशाबाहेरही मोठी कमाई करतात. त्याच्याही पलीकडे सांगायचं झालं तर, आधी रजनीकांत, कमल हसन हे स्टार्स आपल्याला क्वचित बॉलिवूडमध्ये दिसायचे. आता त्यांच्यासोबतच नागा चैतन्या, विजय देवराकोंडा, रश्मीका मंदना, विजय सेथुपती असे तगडे अभिनेते बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिकांमध्ये दिसतायत. 

साहजिकच बॉलिवूडच्या बुडत्या मार्केटला साऊथचा आधार मिळतोय का, अशी चर्चा सुरू आहे. सोबतच रिमेकही काही थांबलेले नाहीत, अगदी लेटेस्ट अपडेट सांगयची झाली तर साऊथमध्ये गाजलेल्या रात्ससन या पिक्चरचा रिमेक अक्षय कुमार करतोय.

बॉलिवूड बॅकफूटवर गेल्याचं आणखी एक कारण सांगण्यात येतं ते म्हणजे, 

मसाला पिक्चर्सची कमी झालेली संख्या. साऊथवाले केजीएफ, पुष्पा, आरआरआर यांच्यासारखे सिंगल स्क्रीन थिएटरला पब्लिकला खुळं करणारे पिक्चर देतात आणि त्यांचे जय भीम, कर्णन, गार्गी सारखे आशयघन पिक्चरही चांगले चालतात. बॉलिवूड मात्र एखाद्या विषयाच्या मागं लागलं की ट्रॅक काय सोडत नाही.

 त्यामुळं लोकप्रियतेच्या बाबतीत साऊथवाले बाजी मारतात आणि भारतात आलेला एखादा क्रिकेटरही अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये ‘झुकेगा नही’ म्हणतो. 

सध्यातरी साऊथवाले बॉलिवूडपेक्षा एक पाऊल पुढं आहेत हि वस्तुस्थिती असली, तरी याला बॉयकॉट कल्चर हा एकमेव कारण नाही हेही तितकंच खरं. आता बॉलिवूडला परत उभारी घेता येणार का ? सलमान-शाहरुख आपली जादू चालवू शकणार का ? हे पुढच्या काही महिन्यात होणारं बॉक्स ऑफिस कलेक्शनच सांगेल…  

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.