सरकार फेसबूक – इंस्टा बंद करणार असं वाटतं असेल तर हा लेख तुझ्यासाठीचं आहे भिडू…

फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर हे तीन ऍप म्हणजे आधुनिक पिढीसाठी जीव कि प्राण. कारण एकचं व्हाट्सअपला बोलायचं असेल तर कसं नंबर लागतो. पण फेसबुक इंस्टाग्रामला तसा घोळ नसतो. इथं अगदी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या क्रशपासून ते थेट युगांडा, ऑस्ट्रेलिया अशा कोणत्याही पोराला-पोरीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता येती. फोलो करता येतं.

ट्विटरला तर काही लोडचं नाही. इथं गल्लीतल्या पुढाऱ्यापासून ते अगदी थेट भारताचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सगळ्यांशी कॉन्टक्टमध्ये राहतं येतं, ते कधी काय करतात याच्या अपडेट मिळतात. एकूणच सगळं कसं मजेत असतंय हे ऍप सोबतीला असले की.

पण आता पण आता हेच फेसबुक -इंस्टाग्राम बंद पडणार आहे का? असं आम्ही नाही तर खुद्द सोशल मीडियाचं म्हणतं आहे.   

सध्या याच चर्चांनी अख्या सोशल मीडियाला उधाण आलं आहे.

२५ फेब्रुवारी २०२१. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एक आदेश जारी केला. यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना ३ महिन्यांच्या आत काही निर्देशांचं पालन करण्यासाठीचे आदेश दिले. या आदेशांचे गॅझेट देखील प्रकाशित करण्यात आलं.

या आदेशांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आलेले निर्देश म्हणजे,  

  • तक्रारींसाठी विशेष अधिकारी, नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणे.
  • या सर्व अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र भारताच्याच हद्दीत असावं.
  •  आलेल्या तक्रारी २४ तासात नोंदवणे आणि पुढच्या १५ दिवसात या तक्रारींचं निवारण करणं आवश्यक
  • प्रत्येक महिन्याला एक अहवाल सादर करावा. त्यात कोणत्या तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली याची माहिती असावी
  • आक्षेपार्ह पोस्टवर सातत्यानं देखरेख करणं आवश्यक. सोबतच आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यापूर्वी कंटेंट तयार करणाऱ्याला, अपलोड करणाऱ्याला किंवा शेअर करणाऱ्याला माहिती द्यावी

सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीची तक्रार नेमकी कोणाकडे करायची आणि त्या समस्येचं समाधान कोण करून देणार हेच लोकांना माहित नाही. तर ट्विटर सारख्या कंपन्या स्वतःचे फॅक्ट चेकर नियुक्त करतात. ते कोण आहेत, फॅक्ट चेक करण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर करतात याची कसलीही माहिती होतं नाही. त्यामुळेच सरकारनं हे निर्देश दिले असल्याचं सांगण्यात येतं आहे.

कु ऍपने सगळे निर्देश स्वीकारले : 

आता पर्यंत केवळ koo या एकमेव सोशल साईटने सरकारच्या या निर्देशांचं पालन करतं नियमावली स्वीकारली आहे. koo हे अस्सल भारतीय आणि मेड इन इंडिया ऍप म्हणून ओळखलं जातं आहे. सोबतचं सरकारच्या अनेक मंत्रायलांची अधिकृत अकाउंट या ऍपवर आहेत.

फेसबुकचं स्पष्टीकरण :

या निर्देशांचे पालन करण्यासाठी काही कंपन्यांनी सुरुवातीपासूनच ६ महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र सरकारनं कोणतीही मुदतवाढ दिली नव्हती. पण त्यानंतर देखील या कंपन्यांनी सरकारला कोणताही उत्तर दिलं नव्हतं.

मात्र आज मुदत संपत असल्यानं फेसबुककडून याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट करण्यात आलं आहे. फेसबुकने म्हंटलं आहे कि, 

फेसबुक सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करणार आहे. पण त्याचबरोबर काही मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरु आहे. त्यासाठी आम्ही सरकारसमोर आमचं म्हणणं मांडणार आहोत,

“सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मात्र फेसबुक हे व्यासपीठ लोकांना स्वतंत्रपणे आणि सुरक्षितरित्या व्यक्त होण्यासाठी कटीबद्ध आहे” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

मग फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद होणार कि चालू राहणार?

तर आता मुख्य प्रश्न म्हणजे भारतात उद्यापासून खरंच फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद होणार आहे का?

तर नाही. २५ मे नंतर सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्वीसारखेच सुरु राहतील. मात्र एखाद्या यूजर्सनं केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही.

म्हणजे नेमकं काय होणार? तर भारतात सोशल मीडिया वेबसाईट्स एक इंटरमिडिएट म्हणून काम करतात. त्यामुळेच त्यांना भारत सरकारच्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अ‍ॅक्टच्या कलम ७९’ अंतर्गत यूजर्सच्या पोस्टसाठी कायदेशीररित्या जबाबदार धरण्याची तरतूद नव्हती.

मात्र आता जर या कंपन्यांनी भारत सरकारच्या या नियमांचं पालन केलं नाही तर उद्या म्हणजे २६ मे पासून त्यांना कायदेशीर रित्या जबाबदार न धरण्याची तरतूद रद्द होणार आहे.

त्यामुळे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल साईट्सवर कोणत्याही यूजर कडून काहीही आक्षेपार्ह लिहून करण्यात आलं, पोस्ट टाकण्यात आली तर त्यासाठी त्या यूजर सोबतच संबंधित सोशल मीडिया कंपनी देखील कारवाईसाठी पात्र असणार आहे.

भारतात सध्या व्हाट्सअपचे ५३ कोटी यूजर्स आहेत. तर फेसबुकचे ४० कोटी आणि ट्विटरचे  १ कोटीच्या आसपास युजर्स आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.