महाराष्ट्राचा तैमुर अर्थात छोटा पुढारी घनश्याम प्रचारात दिसत का नाहीए.. ?
बोल भिडूचे वाचक कधी काय विचारतील नेम नाही. सकाळी एकाचा मेल आला तो तैमुर कुठय. आम्ही म्हणलो, विचारा करिनावहिनींना. आम्हाला काय माहिती. तर म्हणे अहो महाराष्ट्राचा तैमुर वो. हे नाव नविन होतं. महाराष्ट्राचा तैमुर कोण?
तर समोरुन रिप्लाय आला आपला छोटा पुढारी घनश्याम दराडे.
अरे हो रे. घनश्याम सध्या कुठे दिसत नाही. प्रश्नाच उत्तर शोधत होतो तोच शेजारचा भिडू म्हणाला हा कोणय. मला नाही माहिती. मग म्हणलं आधी घनश्याम दराडे कोण आहे ते सांगाव आणि मग तो सध्या काय करतोय ते सांगाव.
साधारण दोन तीन वर्षापूर्वी त्याचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. गावातल्या चार टाळक्यानी एकत्र येऊन बेधडक राजकीय बोलणाऱ्या या पोराचा व्हिडीओ बनवला. बघता बघता उभ्या महाराष्ट्रात तो फेमस झाला.
लोकांना उत्सुकता होती येवढ हाफ चड्डीतलं बारक पोरग कसं काय राजकारणावर बोलत? हाय कोण हे बेन?
मग काही दिवसांनी टीव्ही चॅनलवाल्यांनी शोधून काढलं अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातला हा घनश्याम दराडे आहे. इयत्ता आठवी, बालपणी झालेल्या कुठल्याशा असाध्य रोगामुळे उंचीची वाढ खुंटलेली.
पण आपल्या साडेतीन फुट उंचीचा आणि शहाणपणाचा संबंध नाही हे त्यानं दाखवून दिल. पहिल्या व्हिडिओ मध्ये त्याची तळमळ खरी वाटत होती. गावकडच्या शेतकऱ्यांच्या वीजपाण्याच्या रस्त्याच्या समस्या पुण्यामुंबईत एसीत बसणाऱ्या समजणार नाहीत हे खरच होत.
कौतुकानं या अस्सल नगरी भाषेत बोलणाऱ्या छोट्या पुढार्याचा व्हिडिओ सगळ्यानी आपल्या whatsapp ग्रुप मध्ये पुढं ढकलला.
आणि त्यानंतर तो झी टीव्हीवर झळकला. अंगावर पुढाऱ्यांच्या सारखा वेश, हातात काकाचं नाहीतर मामाच्या साईजच घड्याळ, पायावर पाय टाकून बसून ऐटीत बोलण्याची स्टाईल. तेव्हाच अनेकांना वाटलं पोराचं गणित चुकत चाललं आहे. मुलाखत घेणारा अतिशहाणा या आठवीतल्या पोराला जेष्ठ पुढारीची मुलखात घेतल्यासारखं अहो जाहो करत होता. घनश्यामसुद्धा पण आपण जागतिक दर्जाचे तज्ञ असल्यासारखं मत देत होता.
त्याला राजकीय प्रचाराला पुढाऱ्यानी फिरवलं. त्याला ऐकायला लोक सभेत गर्दी करू लागली. तेरा चौदा वर्षाच पोरग कसं टकामका बोलतय याचं बायाबापड्याना भारी कौतुक वाटत होत. मिडिया चनलमध्ये बसलेल्या चाणक्यांना या घनश्यामच्या पब्लिसिटीचा वापर कसा करायचा हे लक्षात आलं.
त्याची बाईट घेण्यासाठी वार्ताहार वाट वाकडी करून त्याच्या गावी जाऊ लागले. नोटबंदी बरोबर का चूक हे मत तो टीव्हीवर सांगायला लागला. शेतकऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर करणारं भाषण टीव्हीवर ठोकायला लागला.
पुढे तर एकदा अण्णा हजारेंची राजकीय भेट घेतली. त्यांनी पण बिचारयानी तुझं बोलण लक्षपूर्वक ऐकून घेतलं. बोलता बोलताच घनश्यामचा फोन वाजला, टिपिकल युवा नेत्याप्रमाणे घनश्यामने अण्णाच्या समोर फोन उचलला.
जिओच्या जमान्यात मिळालेल्या त्याच्या व्हायरल पब्लिसिटीचा वापर कोण केला नाही ते विचारा. त्याच्या आयुष्यावर “मी येतोय छोटा पुढारी” नावाचा सिनेमा सुद्धा बनवण्यात आला.
गेल्या वर्षी त्याचा दहावीचा निकाल लागला.५१% मार्क मिळाले. गणितात ३५ आणि इंग्रजीत ३७ मार्क होते. मिडीयाने तेव्हा सुद्धा त्याची मुलाखत घेतली. तेव्हा हा गडी अंगात शेरवानी घालून गप्पा मारत होता.
”शाळेत जाताना रस्त्याची अडचण असल्याने पायी जावं लागतं होतं. जाताना वेळेचा अपव्यय होत होता. घरी अभ्यास करताना वीज जात असल्याने अडचणी आल्या. आजारी पडल्याने वेळ वाया गेला. अभ्यास करताना घरची कामं करुन अभ्यास केला. ‘मी येतोय’ या सिनेमाची निर्मिती आणि प्रमोशनमध्ये वेळ गेला”
असं सांगत आपण सर्वांच्या आशीर्वादाने उत्तीर्ण झाल्याचं घनश्यामने सांगितलं.
घनश्यामने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी पुढे जाऊन जिल्हाधिकारी व्हायचा निर्णय घेतला आहे. व्यवस्था परिवर्तन करायची आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून द्यायचा आहे. ते कसं विचारल तर तो ठासून सांगतो ,
“एकदा मला कलेक्टर होऊ दया आणि मग बघा मी काय काय करत ते.”
सध्या तो अकरावीत आहे. परवा सुद्धा अण्णा हजारेंच्या उपोषणाला त्याने हजेरी लावली. तिथे चॅनलनी त्याला अण्णाच्या उपोषणाबद्दल आपलं काय मत आहे हे विचारले. तेव्हा घनश्याम अण्णाना तुम्ही उपोषण मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे असे हात नाचवत सांगताना दिसला.
आत्ता घनश्याम कुठे असतो तर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर. तो राज्यभरात कुठेही जातो. अजित पवारांवर त्याच विशेष प्रेम आहे. मोठमोठ्या सभेत देखील त्याला बोलवलं जातं आणि तो भाषण ठोकत असतो. फक्त झालय काय तर सारख्या बातम्या लावणाऱ्या मिडीयाला देखील त्याचा कंटाळा आलाय त्यामुळे त्याच्यावरचा फोकस हालला आहे. पण काळजी करु नका. एखादा पंच हाणून तो परत प्रसिद्धीच्या झोतात येईलच.
हे ही वाच भिडू.
- पाच मिनिटात युवानेता व्हायचाय, आत्ताच वाचा.
- या पाच फोटोंनी गोव्याच्या राजकारणात फोटो राजकारणाला जन्म दिलाय.
- सरकार झुंडीचं राजकारण करतय का ?
“झारीतले शुक्राचार्य” हे विशेषण राजकारणांत कधीपासून आणि का वापरतात या बद्दल माहिती द्यावी .
धन्यवाद