भाजपवर नाराज असलेल्या वरूण गांधींचं काँग्रेसमध्ये जाणं नक्की झालंय ?

भाजपचे खासदार वरूण गांधी काँग्रेसमध्ये जाणार का ?अशी चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून चालू आहे. आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. याबद्दल राहुल गांधी याना देखील प्रश्न विचारण्यात आला. वरून गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना वरून गांधीबद्दलचा निर्णय काँग्रेस पक्षाअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे घेतील असं म्हणत त्यांनी या चर्चांना अजूनच बळ दिलं आहे.

त्याआधी वरूण गांधीच्या सध्याच्या राजकीय भूमिकेविषयी समजून घेण्याआधी त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणे आवश्यकआहे.

वरुण गांधी हे संजय गांधी यांचे पुत्र. संजय गांधींना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जायचं.

पण अचानक संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. काही वर्षांनी इंदिरा गांधींचीही हत्या झाली. यानंतर राजकारणात फारसा रस नसलेल्या राजीव गांधींना राजकारणात यावे लागले. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी भांडण काढत संजय यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी सासर सोडलं आणि  काँग्रेसदेखील सोडली. राजीव गांधी यांच्या जाण्यानंतर सोनिया गांधी या राजकारणात आल्या.

साल २००४, लोकसभा निवडणुकांचं वर्ष होतं. अमेरिकेतून शिकून आलेले राहुल गांधी राजकारणात येणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. काँग्रेस पक्षाचे भावी युवराज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं होतं.

राहुल गांधींना टक्कर द्यायची म्हणून प्रमोद महाजन यांनी संजय गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांना राजकारणात आणायचं ठरवलं.

वरुण गांधी राजकारणात आले.पण सोनिया किंवा राहुल गांधींच्या विरोधात राजकारण करणार नाही हे वरूण गांधींनी स्पष्ट केल होतं. प्रमोद महाजनांनी वरुण गांधींना भाजपात तर आणलं पण गांधी घराण्याच्या धाकट्या युवराजाला भाजपमध्ये घेणे योग्य कि अयोग्य यावरून पक्षात भांडणे सुरु झाली.केंद्रात सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांची आई मनेका गांधी यांना मंत्री करण्यात आले, परंतु वरुण गांधींना केंद्रात कोणतीही महत्त्वाची जबाबदारी भाजपने दिली नाही . ना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांची भूमिका ठरवण्यात आली नव्हती.

२०१७ मध्ये तर भाजप नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी वरून गांधींनी २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःला मुख्यामंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात यावं यासाठी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी देखील केली होती. मात्र भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला वरून गांधी हे त्यांना चॅलेंज करत असल्यासारखं वाटलं आणि त्यांनी त्यानंतर वरून गांधींना बाजूला केलं ते कायमचंच.

अगदी भाजपची ८० जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आहे. या यादीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांची नावंच नाहीत.

त्यामुळे शेवटी राजकीय भविष्यवार चिंता निर्माण झाल्यानंतर वरून गांधींनी अनेकदा पक्षविरोधात भूमिका घेण्यास सुरवात केली. याचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे दिल्लीतील शेतकरी आंदोलन. वरुण गांधी सातत्याने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलत आलेत. त्यांची आई मनेका गांधी देखील शेतकऱ्यांच्या हिताबद्दल सहानुभूती दाखवत असतात.

लखीमपुर खेरी हिंसाचारघटनेचा व्हिडिओ वरुण गांधी यांनी ट्वीट करत लिहिल होतं कि, या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांचे हेच ट्वीट त्यांच्या राजकीय कारकीर्दसाठी नुकसानदायक ठरू शकते असं बोललं जातंय. कारण त्यानंतरच हि कार्यकारणीची यादी जाहीर झाली आणि त्यात त्यांचं नाव नव्हतं. त्यानंतर आणखी एक म्हणजे त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या भाषणाचा व्हिडिओ देखील ट्विट केला होता.

वरुण गांधी यांनी अनेक वेळा बंडखोर वृत्ती दाखवली आहे.

२०१७ च्या निवडणुकीपूर्वी वरुण गांधी नाराज झाल्याच्या बातम्या येत होत्या, परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवून ते तिसऱ्यांदा संसदेत पोहोचले. वरुण गांधी गेली १२ वर्षांपासून सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत, परंतु मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात भाजपने त्यांना ना मंत्रिपद दिले, ना पक्षात इतर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा चालू आहे की, या सर्व कारणांमुळे वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. अलीकडेच वरुण गांधींनी देशातील शेतीच्या समस्येवर एक पुस्तकही लिहिले आहे. राजकीय तज्ञांचे असे मत आहे की, असं करून वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाण्याच्या  शक्यता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांचे चुलत भाऊ राहुल गांधी मोदी सरकारला घेरण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहेत.

वरुण गांधी हे प्रियंका गांधींच्या जवळचे मानले जातात.

असंही म्हटलं जात होतं कि, वरुण गांधींनी कॉंग्रेस मध्ये येण्याबद्दल प्रियंका गांधींशी चर्चा केली होती. त्यातच प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेशचा प्रभारी करण्यात आल्याने त्या वरून गांधींना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात असं सांगण्यात येत आहे.

वरुण गांधींना पक्षात सामील व्हायचे असेल तर काय अडचण आहे? जर प्रियांका गांधीनी त्यांना पक्षात आणायचंच ठरवलं तर कदाचित सोनिया गांधींचा आक्षेप असू शकतो. कारण सोनिया गांधी आणि मनेका गांधी यांचे सबंध फारसे चांगले नाहीत. आणि दुसरा आक्षेप हा राहूल गांधींचा असू शकतो. वरुण गांधी काही काळापासून राहुल गांधींना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु राहुल यांनी त्यांना अद्याप भेटायला वेळ दिला नाही. पण जर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मिळून ठरवलं तर ते वरुण गांधींना काँग्रेसवासी होण्यासाठी संमती देऊ शकतात…आता येत्या काळात काय घडणार वरून गांधी खरंच कॉंग्रेसमध्ये आलेच तर त्याचा फायदा त्यांना स्वतःला आणि कॉंग्रेस पक्षाला कितपत होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.