श्रावणात उपवास करताय पण त्यापुर्वी “हेमाद्री पंडित” यांची गोष्ट वाचा..!!!

श्रावण आला कि वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि उपास तापास चालू होतात. तसे घरामध्ये वर्षभरच कोणते ना कोणते व्रतवैकल्य चालू असतात. यात एकादशी, देवाधिकांच्या नावाने पाळले जाणारे वार, पौर्णिमा, आमावस्या, सणउत्सव आलेच..

परंतु महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या या व्रतवैकल्यांमागे हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग’ चिंतामणी या ग्रंथाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं..

या हेमाद्री पंडिताने लिहिलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथातील ‘व्रतखंड’ या भागात हजारो व्रतवैकल्यांबद्दल सांगितले आहे. त्याचाच प्रभाव महाराष्ट्रावर पडला आणि व्रतवैकल्यांचा प्रसार झाला असं मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे.

मात्र या हेमाद्री पंडिताबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल फारशी चर्चा केली जात नाही. त्यामुळे हेमाद्री पंडित व त्यांनी लिहिलेला चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथाबद्दल जाणून घेऊयात..

हेमाद्री पंडित..

हेमाद्री पंडितालाच हेमाडपंत म्हणून ओळखले जाते. या हेमाद्री पंडिताचा जन्म कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. असं हेमाडपंताचे चरित्र लिहिणारे केशव अप्पा पाध्ये यांनी लिहिलं आहे.

हेमाद्री लहान असतांनाच त्यांचे वडील कामदेव हे हेमाद्रीला महाराष्ट्रात घेऊन आले. त्यांनतर महाराष्ट्रात संगोपन झालेल्या हेमाद्रीने संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यांनतर महाराष्ट्र कर्नाटकसह आसपासच्या मोठ्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या यादव साम्राज्यात त्यांनी प्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली.  

देवगिरीच्या यादवांचा प्रधान..

देवगिरीच्या यादवांच्या दरबारातील महत्वाची व्यक्ती म्हणून हेमाडपंताचा उल्लेख आहे. यादव साम्राज्याचे शेवटचे दोन सार्वभौम राजे राजा महादेव यादव आणि राजा रामचंद्र यादव यांच्या काळात हेमाद्री पंडित हा यादवांचा प्रधान होता.

राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांच्या काळात यादव साम्राज्य आपल्या सर्वोच्च शिखरावर होते. त्याच काळात हेमाद्री पंडिताने प्रधान म्हणून अनेक कामं केली.

हेमाडपंताने राज्यकारभारावर मार्गदर्शन करणारी पुस्तकं लिहिली. तत्वज्ञानावर आधारित पुस्तकं लिहिली. चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि व्रतवैकल्यांवर लिहिलेला चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिला. उपचारासाठी आयुर्वेद रहस्यम पुस्तक लिहिले. तसेच महाराष्ट्रात सातशे वर्षांपासून आपली साक्ष देत असलेल्या हेमाडपंथी मंदिर शैलीचा निर्माता म्हणून हेमाडपंताचा उल्लेख केला जातो..

महानुभाव साहित्य आणि भागवत धर्माच्या साहित्यात असलेले मतभेद..

देवगिरीचे यादव आणि हेमाडपंत यांच्याबाबत महानुभाव साहित्यात आणि भागवत धर्माच्या साहित्यात मतभेद आढळतात.

महानुभाव साहित्यात देवगिरीचे शेवटचे राजे रामचंद्र यादव यांचा दृष्ट राजा म्हणून उल्लेख केला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या साहित्यात राजे महादेव यादव आणि राजे रामचंद्र यादव यांचा उल्लेख चांगला राजा असा केलाय. 

सोबतच महानुभाव साहित्यात यादव राजांसोबतच हेमाडपंताचा उल्लेख सुद्धा सनातनी आणि कर्मठ पंडित अशा पद्धतीने केलेला आढळतो. हेमाडपंताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात सांगितलेल्या व्रतवैकल्यांमुळे प्रजा कर्मकांडांच्या आहारी गेली असा मतप्रवाह आहे.

यासोबतच आणखी एक मतप्रवाह आहे तो म्हणजे, यादव राजा रामचंद्र हा अन्यायी आणि दृष्ट होता. त्याच्या अन्यायापासून लक्ष वळवून प्रजेला कर्मकांडांत अडकवण्यासाठी व्रतवैकल्यांची मांडणी करण्यात आली असावी असेही सांगितले जाते.

मात्र या मतप्रवाहांची सत्याअसत्यता तपासण्यासाठी ऐतिहासिक पुरावे आणि इतिहासतज्ज्ञ काय सांगतात हे महत्वाचे ठरते. 

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने यादवकालीन इतिहासाचे अभ्यासक प्रा. पद्माकर प्रभुणे यांच्याशी संपर्क साधला..

हेमाडपंत आणि यादव घराणे यांच्याबद्दल बोल भिडूशी बोलतांना प्रा. पद्माकर प्रभुणे सांगतात..

“यादवांचा आणि हेमाडपंताचा इतिहास हा अजूनही पुरेसा उलगडलेला नाही. हेमाडपंत आणि यादव राजे यांच्या बाबतीत महानुभाव साहित्य आणि भागवत धर्माच्या साहित्यात मतभिन्नता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये रामचंद्रांचा उल्लेख न्यायाने पृथ्वीचे रक्षण करणारा राजा असा उल्लेख आहे. त्याउलट महानुभाव साहित्यात रामचंद्रांचा राज्य करण्यास अव्यवस्थित राजा असा उल्लेख केला आहे.” असे प्रा. प्रभुणे सांगतात.

पुढे बोलतांना प्रा.प्रभुणे सांगतात कि, “रामचंद्रांची पत्नी कामाईसा ही महानुभाव पंथाची अनुयायी होती. त्यामुळे रामचंद्रांच्या मृत्युनंतर सिंघणदेव तिसरा याने कमाईसाला बळजबरी सती जायला भाग पाडले होते. म्हणून पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा उल्लेख स्मृतिस्थळामध्ये आढळतो.”

हे झालं यादवांचं मात्र हेमाडपंताबद्दल काय??

हेमाडपंतांबद्दल प्रचलित असलेल्या मतप्रवाहावर प्रा. प्रभुणे सांगतात कि, “हेमाडपंताच्या चतुर्वर्ग चिंतामणी मध्ये असलेल्या व्रतखंडात अनेक व्रतवैकल्यांची माहिती दिलीय. मात्र हा ग्रंथ फारसा प्रचलित झाल्याचे पुरावे आढळत नाहीत. त्यामुळे या ग्रंथाच्या प्रभावाने व्रतवैकल्यांचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही.”

पुढे बोलतांना प्रा. प्रभुणे सांगतात कि, “हेमाडपंताच्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिण्याआधी सुद्धा अनेक व्रतवैकल्ये समाजात पाळली जात होती. ही व्रतवैकल्यांची परंपरा फार जुनी आहे. हेमाडपंताने केवळ या व्रतांची पुस्तकी मांडणी केलीय. कारण लोकांकडून व्रतांसाठी इतर पोथींचा आणि स्मृतींचा आधार ज्या प्रकारे घेतला गेला तितका चतुर्वर्ग चिंतामणीचा घेतला गेल्याचे दिसत नाही.”

याबाबत महानुभाव साहित्यातील बाजू जाणून घेण्यासाठी बोल भिडूने महानुभाव साहित्याचे अभ्यासक प्रा. अविनाश आवलगावकर यांच्याशी संपर्क साधला..

याबद्दल बोल भिडूशी बोलतांना प्रा. अविनाश आवलगावकर सांगतात..

“हेमाद्री पंडिताने लिहिलेल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात दररोज कराव्या अशा व्रतवैकल्यांबद्दल उपासतापासांबद्द्ल लिहिले आहे. या ग्रंथामुळे कर्मकांडांचा आणखी मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. महानुभाव पंथ असल्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना मनात नसल्यामुळे  त्यांनी याचा स्वीकार केला नाही.” असं प्रा. आवलगावकर सांगतात.

पुढे बोलतांना प्रा. आवलगावकर सांगतात कि, “कामाईसा या नागदेव यांना गुरु मानायच्या. रामचंद्रांच्या मृत्युनंतर सती जावे लागू नये यासाठी त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सन्यास न मिळाल्याने रामचंद्रांच्या मृत्यूंनंतर त्यांना बळजबरी सती जावे लागले. आणि चतुर्वर्ग चिंतामणी अशा परंपरांना रुजवत होता त्यामुळे महानुभाव संप्रदायाने या ग्रंथाचा विरोध केला होता.” असं प्रा. आवलगावकर यांनी सांगितलं.

यादव घराणे, महानुभाव संप्रदाय आणि भागवत धर्म तीनही वैष्णवच..

यादवकाळात वेगवेगळे पंथ आणि परंपरा असल्या तरी वैष्णव पंथाचाच प्रभाव मोठा असल्याचे आढळते. यादव घराणे हे कृष्णाचे वारस म्हणवत असल्याने ते वैष्णव पंथीयच होते. 

त्यातील अपवादात्मक एक राजा अम्मनदेव हा शैव पंथाला मानणारा होता. मात्र त्याचा काळ फार छोटा, अगदी एका वर्षापेक्षा कमी असल्यामुळे शैव पंथाचा फारसा प्रभाव पडला असेलच याबाबत शंका उपस्थित होते. 

यादव घराण्याबरोबरच महानुभाव म्हणजेच पंचकृष्णी सांप्रदाय हा एकप्रकारे वैष्णव परंपराच दर्शवतो. तर भागवत धर्मात सुद्धा वैष्णव परंपराच आहे. त्यामुळे यातील पंथीय भेद अतिशय टोकाचे असतीलच असे स्पष्ट्पणे म्हणता येऊ शकत नाही.

हेमाडपंताच्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथाबद्दल दोनही भिन्न मतप्रवाह वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारावर तयार झाले आहेत. दोन्ही बाजूंचे पुरावे समकालीन असल्यामुळे निश्चितपणे एकाचं खरं आणि दुसऱ्याचं खोटं असा शिक्का मारला जाऊ शकत नाही. 

इतिहासाचा सारासार दृष्टीने विचार करून तसेच पुराव्यांच्या आधारे मांडल्या गेलेल्या तर्कसंगत इतिहासाला मान्य करणे हेच योग्य ठरेल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.