खरच बौद्ध भिक्खुंकडे चमत्कारिक शक्ती असते का ?

आपले भिडू लोक आम्हाला नवनवीन रंजक प्रश्न पाठवत आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला डोकं खाजवायला लागत आहे. या उत्तरांमधून आमच्या पण माहितीमध्ये बरीच मदत होत आहे.

आता हाच प्रश्न बघा ना ,

बौद्ध भिक्खु कड़े चमत्कारिक शक्ती असते का… जशी फिल्म्स मधे दखवतात.. “

रोज टीव्ही मध्ये, मुव्ही मध्ये अंगावर भाले टोचून घेणारे, पाण्यावरून चालणारे, उकळत्या तेलात बसणारे, डोक्यावर ड्रील मारून घेणारे असे  वेगवेगळे चमत्कार करणारे बौद्ध भिक्खू आपण बघत असतो आणि आपल्याला पण प्रश्न पडतो कि हे सगळे चमत्कार खरे असतील का ? पण आपण ते पाहतो आणि सोडून देतो. मात्र आपले  वाचक भिडू अक्षय सरतापे  यांनी हा प्रश्न विचारला आणि आम्ही त्याच्या मुळाशी जायचं ठरवलं.

 

या बौद्ध भिख्खूना शाओलीन मॉन्क असं म्हणतात. चला तर आधी जाणून घेऊ त्यांचा इतिहास.

भारतात इसवी सन पाचव्या शतकात एक ब्राम्हण राजकुमार बौद्ध भिक्खु बनला. बोधीधर्म त्याचं नाव. तर हा बोधीधर्म आपल्या गुरुच्या आदेशानुसार बौध्द धर्माच्या प्रसारासाठी चीन मध्ये गेला. तिथला राजा शिओवेनने त्याला राहण्यासाठी शिओलीन मठात जागा दिली. या पूर्वी तिथे बुद्धभद्र नावाचा भारतीय  भिक्खु  राहून गेला होता. त्याने तिथे आपल्या शिष्यांना काही कुस्तीचे प्रकार शिकवले होते.

बोधीधर्मने त्यांना भारतीय योग, कुस्ती आणि युद्धकला शिकवली. त्यानेच पूर्ण जगभरात गाजलेल्या चीनी मार्शल आर्टची सुरवात केली. भारतीय ध्यानाचा सुद्धा त्याने चीन मध्ये प्रसार केला. बोधीधर्माच्या काळातच चीन आणि जपान मध्ये बौद्ध धर्म पसरला आणि ध्यानावर आधारित या पंथाला चीनी अपभ्रंश होऊन झेन बुद्धिझम म्हणू लागले.

250px BodhidharmaYoshitoshi1887
बौद्धगुरु बोधीधर्म

महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसुत्र हे या पंथाचे मुख्यस्त्रोत आहेत.गुरुशिष्य परंपरा हा या पंथाचामुख्य पाया आहे. बोधीधर्मचे शिष्य जो मार्शल आर्ट शाओलीन मंदिरात करायचे त्याला शाओलीन कुंगफु असे ओळखले जाऊ लागले. आजही चीनच्या हेनान प्रांतात हा मठ उभा आहे.

सहाव्या शतकापासून ते आजवर या शाओलीन कुंगफु मध्ये अनेक सुधारणा घडून आल्या. कराटेपासून ते तायक्वान्डोपर्यंत चिनी जपानी अनेक मार्शल आर्टचे प्रकार यातून डेव्हलप झाले. याचं शाओलीन कुंग फु मधून शाओलीन सुपरह्युमन  मॉन्क तयार झाले आहेत.

आता ही ताकद या मॉन्ककडे कुठून येते हा प्रश्न फक्त अक्षयलाच नाही पडला तर तो प्रश्न जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठाचे मेडिकल स्कूलचे प्रोफेसर हर्बर्ट बेन्सन यांना सुद्धा पडला होता.

त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांची एक रिसर्च टीम बनवली आणि ते हिमालयात जाऊन जाऊन या भिक्षुंना भेटले. त्यांचा अभ्यास केला. त्यांची दिनचर्या त्यांचे शरीरधर्म अभ्यासले. त्यातून त्यांना वेगळीच माहिती समोर आली.

शाओलीन मॉन्क मधील शक्ती या काही कुठल्याही देवाचा आशीर्वाद अथवा धार्मिक चमत्कार नाही.

तर या शक्ती त्यांनी वर्षानुवर्षे केलेली योगसाधना, प्राणायाम, विपश्यना यामधून साधलेली असते. वर्षानुवर्षे ध्यानस्थ राहून स्वतःच्या शरीराची त्यांनी ओळख करून घेतलेली असते, यातूनच त्यांना आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात आलेल्या असतात. त्यांची क्षमता ते कुंगफूच्या आणि योगसाधनेच्या माध्यमातून वाढवलेली असते.

निसर्गाला अर्पण केलेल्या जीवनशैलीमुळे ही ताकद वाढलेली असते. कोणत्याही तापमानात कोणत्याही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याची त्यांची क्षमता बाकीच्याच्या पेक्षा जास्त असते. या भिक्खूमध्ये शरीर तर कठोर बनलेले असतेच त्यापेक्षाही मानसिकदृष्ट्या ते जास्त कठोर बनलेले असतात. प्रेम आणि शांतीचा प्रसार करणारे हे भिक्खू कोणत्याही जादूने नाही तर सरावाने सर्वसामान्य मानवी शरीराला सुपरह्युमन बनवतात .

बाकी शाओलीन मॉन्क बद्दल अनेक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर अनेकजण फेक व्हिडीओ सुद्धा बनवतात. प्रत्येकाच्या मनात अप्रूप निर्माण करणारे हे भिक्खू त्यांच्यावर चित्रपट बनत असले तर यात आश्चर्याचेही कारण नाही.

आज वरच्या विज्ञानाच्या संशोधनातून तरी बौद्ध भिक्खूच्याकडे कोणतीही चमत्कारिक शक्ती सापडली नाही. असली तर योगसाधनेची मानसिक कठोरतेची शक्ती असते. यातूनच ते हे वेगवेगळा चमत्कार करू शकतात. बाकी ओल्डमॉन्क रिचवून चमत्कार करणारे आपल्या आसपास देखील आढळतील.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.