खलिस्तान समर्थक सुवर्णमंदीराच्या गेटवर ; खलिस्तानवादी मुव्हमेंट पुन्हा डोकं वर काढतेय..?

आज सहा जून. आजपासून बरोबर वर्षांपूर्वी सुवर्ण मंदीर फुटीरतावाद्याच्याकडून मुक्त करण्यात आले होते. ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आले व आजच्याच दिवशी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा मृतदेह मिळाला होता.

अन् आज ३८ वर्षानंतर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी जर्नेलसिंग भिंद्रनवालेच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हातात भिंद्रनवालेचे पोस्टर अन् छायाचित्र होते.

बर हे पहिल्यांदा झालय का तर नाही, गेल्या महिन्याभरातली ही दुसरी घटना. मार्च महिन्यामध्ये हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भिंद्रनवालेचा फोटो आणि खलिस्तानी झेंडा असलेल्या गाडयांना राज्यात एंट्री करण्यास बंदी घातली.

कारण होतं पंजाबमधून येणाऱ्या भिंद्रनवाले समर्थकांमुळे  राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. याआधी काही शीख तरुणांनी हिमाचलचा काही भाग हा पंजाबचा भाग असल्याचं म्हणल्याने राज्यात तणावाची स्तिथी निर्माण झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा विरोध म्हणून ८ मे च्या दरम्यान हिमाचल प्रदेशच्या विधानसभेच्या भिंतीवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आलेत. त्याच बरोबर विधानसभेच्या भिंतींवर खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा लिहण्यात आल्यात. राज्यातल्या सर्वात सुरक्षित ठिकाणी हे कृत्य घडल्यानं चांगलीच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे इंटेलिजिन्स एजन्सीजनी याआधी अशी वॉर्निंग दिली होती.

सिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भिंद्रनवालाचा फोटो आणि खलिस्तानचा ध्वज शिमल्यात फडकवला जाईल अशी धमकी दिली आहे असा दावा या अलर्टमध्ये करण्यात आला होता.

मात्र तरीही राज्य सरकारच्या नावावर टिचू हे झेंडे फडकवण्यात आले होते.

याच गुरुपतवंत सिंग पन्नू  आणि त्याच्या शीख फॉर जस्टीस संघटनेनं  २९ एप्रिलला खलिस्तान दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर पंजाबच्या पटियालामध्ये दोन गटांत तुफान राडा झाला होता.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनांतही काही खलिस्ताबद्दल सहानभूती ठेवणारे ग्रुप  सहभागी असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर २६ जानेवारीला लाल किल्यावर जेव्हा शिखांचा धार्मिक फ्लॅग फडकवण्यात आला होता तेव्हाही हे कृत्य खलिस्तान्यांचंच असल्याचं म्हटलं गेलं होतं.

याचबरोबर १ जानेवारीला झालेला लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोट, शौर्य चक्र पुरस्कार विजेते कॉम्रेड बलविंदर सिंग संधू यांच्या हत्येमागेदेखील खलिस्तानी असल्याचे आरोप झाले होते. एवढंच नाही तर पंजाबमध्ये मागच्या दशकभरात झालेली हिंसक आंदोलनं, ड्रग ट्रॅफिकिंगच्या घटना किंवा पवित्र ग्रंथाच्या पावित्र्याचा भंग केला म्हणून झालेला हिंसाचार या सगळ्या घटनांमध्ये अनेकवेळा खलिस्तानी समर्थकांनी सहभाग घेतल्याचं पोलीस तपासात पुढं आलं होतं.

त्यामुळं ११८०-९०च्या दशकात पंजाबला रक्तरंजित करणाऱ्या खलिस्तानी चळवळ पुन्हा वर डोकं काढतेय का? अशी परिस्थिती निर्माण झालेय. 

खलिस्तानी चळवळ ही भारतातली सगळ्यात हिंसक  फुटीरतावादी चळवळ होती.  

१९८० ते १९९५ या दीड दशकाच्या कालावधीत ८०९० फुटीरतावादी ११,६९६ नागरिक आणि १७४६ सुरक्षा कर्मचारी असा २१,५३२ लोकांचा मृत्यू झाला होता. 

यामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंग  याच्या हत्यांचा देखील समावेश होता.१९९५ पर्यंत जरी खलिस्तानी बंडखोरांचा आणि अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असला तरी वैचारिकदृष्ट्या पंजाबच्या एका मोठ्या सेक्शनमध्ये या चळवळीबद्दल आपुलकी होती. 

शिखांचा एक स्वतंत्र देश असावा ही या चळवळीची प्रमुख मागणी असते आणि यासाठी सुरवातीपासून यासाठी हिंसक बंडखोरी होत आली आहे.

त्यात वेगळ्या राष्ट्राच्या मागणीला धार्मिक रंग देण्यात आल्यानं ही चळवळ अजूनच स्फोटक बनली होती. भिंद्रनवालेंसारख्या या चळवळीच्या नेत्यांनी अगदी शीख धर्मियांचं सर्वात पवित्र प्रार्थनास्थळ असणाऱ्या गोल्डन टेम्पल मधून अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या होत्या. पुढे ऑपरेशन ब्लू सारख्या आर्मी ऑपरेशनमुळे  भिंद्रनवालेंबरोबरच अनेक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला मात्र या लष्करी ऑपरेशन दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे मोठ्या प्रमाणात जनभावना दुखावल्या गेल्या आणि याचंच भांडवल करत ही चळवळ अजूनच फोफावली. भिंद्रानवाल्यासारख्या बंडखोरांना हिरोचा दर्जा देण्यात आला.

त्यात ही चळवळ भारतापुरतीच मर्यादित होती अशातला भाग नव्हता. जगभर पसरलेल्या शीख स्थलांतरितांमध्येसुद्धा या चळवळ पसरवण्यात आली होती. 

खलिस्तानच्या मागणीला अगदी सुरवातीपासूनच भारताबाहेर राहणाऱ्या शीख समुदायाच्या एका मोठ्या गटाने पाठिंबा दिला होता. 

कॅनडा, ब्रिटन ,अमेरिका या देशांमधून मोठ्या प्रमाणात फंडिंग करण्यात आलं होतंआणि या सर्वामध्ये सगळ्यात महत्वाचं कनेक्शन होतं ते म्हणजे पाकिस्तानचं.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, झुल्फिकार भुट्टो यांनी एकदा म्हटले होते की, पाकिस्तानचा बांगलादेशही भारतापासून काढला जाईल, परंतु तो पाकिस्तानच्या सीमेवर असेल. त्यांचं हे वक्तव्य खलिस्तानच्या संदर्भात होतं. 

खलिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देणं, त्यानं ट्रेनिंग आणि शस्त्रपुरवठा करणं, फंडींगची सोय करणं, फंडींगसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करी करणं अशा सर्व गोष्टी पाकिस्तानने केल्या आहेत.

देशविघातक कृत्यांची पार्श्वभूमी असणारी ही चळवळ आता पुनः पाय रोवू पाहतेय. हे असं का होतेय याची एक एक कारणं बघू.

भिंद्रनवाले आणि इतर अतिरेक्यांच्या स्मृती अजूनही लोकांच्या मनातून उतरून दिल्या गेल्या नाहीत.

खलिस्तानी बंडखोरी १९९२ मध्ये त्या झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आली होती. मात्र  तेव्हापासून  खलिस्तानी चळवळीचा सर्वात प्रमुख दहशतवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे उदत्तीकरण थांबले नाही.

भिंद्रनवालेचे टी-शर्ट, पोस्टर्स आणि इतर साहित्य काही भारतीय गुरुद्वारांच्या आसपास विकले जाते. अगदी सुवर्ण मंदिराच्या आवारात देखील. 

काही गुरुद्वारांमध्ये शीखांच्या अनेक ऐतिहासिक शहीदांमध्ये भिंद्रनवाले यांचा फोटो लावण्यात आलाय.त्याच्या या इमेजबरोबरच त्याचं वेगळ्या खलिस्तानच स्वप्नही लोकांच्या मनात बिंबवलं जातं. अनेक पंजाबी तरुणांच्या गाड्यांवरही भिंद्रनवालेचा फोटो तुंम्हाला पाहायला मिळेल.

खलिस्तानी नेते आणि संघटना

आज पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुढे नेण्यासाठी संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्या सारखा मोठा नेता नाहीये. मात्र भारताबाहेर असणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या संघटना ही चळवळ पुरुज्जीवीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.    

यातील सर्वात प्रमुख शीख संघटना म्हणजे अमेरिकेत स्थापन झालेली शिख्स फॉर जस्टिस. या संघटनेने भारतातून पंजाब वेगळा करण्यासाठी “रेफ्रेण्डम 2020” करण्याची घोषणा केली होती.

 ता रेफ्रेण्डमचा पहिला टप्पा यूकेमध्ये ३१ मार्च २०२१ रोजी इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीला सुरू करण्यात आला होता. आधी सांगितल्याप्रमाणे गुरपतवंत सिंग पन्नून या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान समर्थक कारवायांना चालना देणार्‍यांना बक्षिसे जाहीर करण्यासाठी आणि धमक्या देण्यासाठी तो ओळखले जातो. 

२६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकवल्याबद्दल आणि पंतप्रधान मोदींना पंजाबला येण्यापासून रोखण्यासाठी त्यानं बक्षीस जाहीर केलं होतं. 

खलिस्तानी आणि काश्मिरी दहशतवादी यांचे संबंध जुळण्यासाठी देखील हा पन्नू प्रयत्नशील असतो.वर्ल्ड शीख ऑरगनायझेशन जिच्या शाखा जगभर आहेत, त्याचबरोबर  नॅशनल शीख युथ फेडरेशन जी यूकेमध्ये सक्रिय आहे आणि खलिस्तान कौन्सिल जी अमेरिकेतून काम करते या संघटनाही वेगळ्या खलिस्तानसाठी  काम करतात.   

सोशल मीडियाचा वापर करून शीख डायस्पोरा आणि पंजाबमधील लोकांवर प्रभाव टाकणे, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना आर्थिकरसद पुरवणे आणि राजकीय पक्षांना गुप्तपणे निधी देऊन पंजाबमध्ये राजकीय प्रभाव पाडणे अशी कामे या संघटनांकडून केली जातात.

पंजाबमध्ये बंडखोरी करणाऱ्या दहशतवादी संघटना आता पाकिस्तानात गेल्यात. 

यामध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन, खलिस्तान लिबरेशन फोर्स, खलिस्तान कमांडो फोर्स आणि खलिस्तान जिंदाबाद फोर्स या संघटनांची नावं घेता येतील. यूएस, यूके, जर्मनी आणि कॅनडामध्ये त्यांचे उघड सदस्य आहेत. पंजाबमध्ये मात्र त्यांच्याकडे मोजकेच गुप्त सदस्य आहेत जे वेळोवेळी हिंसाचाराच्या घटनात पकडले देखील गेले आहेत.

पाकिस्तान कनेक्शन

कर्तारपूर कॉरिडॉर हा पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या यांची आयडिया आहे असे पाकिस्तानी राजनैतिक अधिकार्‍यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

कर्तारपूर कॉरिडॉर ओपन करून पाकिस्तान भारतातली खलिस्तान मुव्हमेंटला पुन्हा खतपाणी घालेल असं पाकिस्तानी राजकारण्यांनी म्हटलं होतं. आता पाकिस्तानी म्हणतायेत म्हणून विश्वास नाही मात्र पाकिस्तानने याआधी तसे प्रयत्न देखील केले आहेत.

सी क्रिस्टीन फेअर स्क्रोलच्या एक आर्टिकलमध्ये सांगतात. भारतीय शीख जेव्हा पाकिस्तानात येतात तेव्हा त्यांना प्रभावित करण्याचा पाकिस्तानने बराच काळ प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधील एक विद्यार्थी या नात्याने मी पाकिस्तानींनी शीख यात्रेकरूंना खलिस्तानी सामग्रीचचं वाटप करणे, यात्रेकरूंना त्यांना मिळालेले विविध खलिस्तानी साहित्य भारतात परत घेऊन जाण्यास सांगणे अशा गोष्टी करताना पहिले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची प्रमुख गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने खलिस्तानी कार्यासाठी शिखांची भरती करण्याचे प्रयत्नदेखील झाले आहेत.

अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पंजाबला पडलेला ड्रग्सचा वेढा.

पंजाब राज्य अंमली पदार्थांचे व्यसन आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे खूप प्रभावित झाले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने 2015 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये पंजाबमधील 28 दशलक्षांपैकी 200,000 पेक्षा जास्त व्यक्ती व्यसनाधीन आहेत. राज्यात पाकिस्तानने अमली पदार्थांचा पूर आणून नवीन प्रॉक्सी युद्ध सुरू केल्याचा आरोप केला जातो. यातून फंडींगची सोया होत असल्याने खलिस्तानी अतिरेकी देखील या ड्रॅग ट्रॅफिकिंगमध्ये सहभागी असतात.

FATF नं नाड्या आवळाल्यांनतर पाकिस्ताची दहशतवाद्यांबद्दलचं बदललेलं धोरण

 फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सनं सारखं निगराणीखाली ठेवल्यानं पाकिस्तानला आता लष्कर-ए- तोयबा सारख्या संघटनांना आता फंडिंग करता येत नाही. कारण या फंडींगचे धागेदोरे सापडले तर पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल आणि पाकिस्तनच्या अर्थव्यस्थचे अजूनच बारा वाजतेल. पण एवढं असूनही भारताविरोधी संघटनांना पाकिस्तानने रसद पुरवणे सोडलं नाहीये. पाकिस्तानने  लष्कर-ए- तोयबा सारख्या संघटनांचं फंडिंग खलिस्तानी अतेरिकी संघटनांकडे वळवलं आहे. त्यामुळं आता या संघटनांच्या हालचाली वाढल्या आहेत.

या सर्व कारणांमुळे अलीकडच्या काळात खलिस्तानी मुव्हमेंटच्या  कारवाया वाढलेल्या दिसतात . त्यामुळं ही चळवळ पुन्हा तग धरायच्या आधी तिचा बिमोड करणं हे सरकारपुढील प्रमुख आव्हान राहणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.