ही तर प्रणव मुखर्जींची पंतप्रधान होण्याची खेळी ?
कोण,कधी, काय बोलणार याला राजकारणात अन्यसाधारण महत्व आहे. याला शुद्ध भाषेत टायमिंग म्हणतात. ज्याला हे टायमिंग जमल तो राजकारणाच्या केंद्रबिंदूवर नेहमीच राहतो. गेल्या दोन चार महिन्यांमागे राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. त्याच काळात अख्खा महाराष्ट्र डोळे वटारून टिव्हीसमोर बसला होता.
आत्ता काहीतरी कडक वाक्य येईल आणि एक पोस्टतरी टाकता येईल या आशेत भल्याभल्यांचा हिरमोड झाला. कधी काय बोलणं हे जस टायमिंग आहे तसच कधी काय बोलायचं नाही हे देखील टायमिंग आहे. ते पवारांना उत्तम जमतं. त्या बाबतीत प्रणव मुखर्जी तसे एक फूट मागेच म्हणावे लागतील. प्रणव मुखर्जींनी संघाचं आमंत्रण स्वीकारलं आणि निम्मा भारत टिव्हीपुढे डोळे वटारून पुन्हा बसला. प्रणव मुखर्जीनी इंग्लीशमध्ये भाषण चालू केलं आणि निम्या भारताचा हिरमोड झाला. त्यानंतर प्रणव नेहरूंपासून चालू करत नेहरूच्या जवळ येवून थांबले तेव्हा देखील लोकांचा हिरमोड झाला. राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी यात कन्फ्यूज असणाऱ्यांनी मात्र हे भाषण शेवटपर्यन्त निट ऐकलं असावं.
भाषण झालं. फोटोशॉप झाले. चर्चा झटल्या पण या सगळ्यात प्रणव मुखर्जी अचानक एक्टिव्ह कसे झाले ? हा प्रश्न कॉंग्रेसच्या जेष्ठांना सतावू लागला. राजकिय विश्लेषकांनी प्रणव मुखर्जी कोणता डाव खेळत आहेत ते आपआपल्या पद्धतीने मांडलं. त्यातलीच एक शक्यता म्हणजे प्रणव मुखर्जी हे सर्व आपलं पंतप्रधानपदाच स्वप्न पुर्ण करण्यासाठी करत असल्याचा अंदाज राजकिय विश्लेषक मांडत आहेत.
तत्पुर्वी एक शंकानिरसन,
राष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती पंतप्रधान होवू शकते का ?
राष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती राजकारणात सक्रिय होत नाही. त्या पदावरुन कमी दर्जाच्या पदावर ती जावू शकत नाही हे सत्य असलं तरी राष्ट्रपती राहिलेली व्यक्ती पंतप्रधान होवूच शकत नाही असा कोणताही नियम नाही. ती एक प्रथा आहे. आणि प्रथा मोडण्यास हरकत नसते.
मुखर्जी पंतप्रधान पदासाठी सक्रिय होत आहेत का ?
गेल्या काळात ते बीजू जनता दलाचे नेते नविन पटनाईक यांच्या घरी जेवणाच्या आमंत्रणावरून गेले होते. त्याठिकाणी सिताराम येचूरी, लालकृष्ण अडवाणी, देवगौडा यांसारख्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती. या घटनेपासून प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय झाल्याच बोललं जात आहे. त्यातूनच कॉंग्रेस नेतृत्वाने सर्वच घटक पक्षांना एकत्र आणणारा नेता म्हणून प्रणव मुखर्जींच नाव घ्याव याबाबात वर्तमानपत्रांमधून चर्चा झटत आहेत. देशात वाढणारं धार्मिक असहिष्णूतेचं वातावरण हे समविचारी प्रादेशिक पक्षांना एक करण्यास पुरक असून त्यामध्ये महत्वाची भूमिका घेणारे कॉंग्रेसचे वैचारिक बेस असणारा नेते म्हणून त्यांना आपली ओळख अधिक घट्ट करायची आहे.
त्यातूनच मिळालेल्या या आमंत्रणाचं सोनं करायच्या हेतूनेच त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वापुढे त्यांचा दबाब दाखवून दिल्याचं बोललं जात आहे.