नाव नाही घेतलं पण राज ठाकरेंना अयोध्यावारी विरोधामागं भाजपच असल्याचं म्हणायचं होतं ?

राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. आजकाल राज ठाकरे ज्या सभा घेतात त्याचा मेन मुद्दा ठरलेला असतॊय. तसेच पुण्याच्या सभेचा पण एक मेन मुद्दा ठरला होता. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्याची घोषणा नुकतीच केली होती. उत्तरप्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध चालू केला आहे.

त्यामुळं राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौरा रद्द कारण्यामागं कोणती कारणं देता हे ऐकण्यासाठी आजची सभा महत्वपूर्ण होती.

राज ठाकरेंनी सुरवातही तशीच केली. सुरवातीला आधी सांगितल्याप्रमाणे पायाचं दुखणं वाढलं आहे आणि त्यामुळं शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मात्र त्यानंतर राज ठाकरे जे बोलले त्यातून फक्त पायाचं दुखणं हे एकंच कारण नसल्याचं पुढं आलं.

त्यांनी जी कारणं सांगितली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा रोल दिसत होता असं बोललं जातंय.

मात्र राज ठाकरेंनी कुठंही भाजपचं नाव घेतलं नाही. त्यामुळं नक्की कोणती ती कारणं होती आणि भाजपचा त्यात कसा रोल असल्याचं सांगितलं जातंय ते बघू .

ज्यांना माझा अयोध्या दौरा खुपत होता त्यांनी महाराष्ट्रातून रसद पुरवली.

ज्यांना ज्यांना अयोध्या वारी खुपली त्यात अनेक जण होते…  जरी मी हट्टाने जायचं ठरवलं असतं तर माझ्या सोबत हजारो कार्यकर्ते आले असते. ज्याप्रकारे अयोध्येत माहोल उभा केला जात होता त्यामुळं तिथं राडा झाला असता. आपल्या हजारो पोरांवर केसेस पडल्या असत्या. त्यांना  जेलमध्ये सडवलं गेलं असतं. पदाधिकाऱ्यांवर केसेस पडल्या असत्या. त्यामुळं मग ऐन निवडणुकीच्या वेळी इथं कोणी राहिलं नसतं. हा सगळा ट्रॅप होता. असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय की त्यांच्या बोलण्याचा रोख उत्तरप्रदेश सरकारकडं होता.

कारण मनसे कार्यकर्त्यांवर ज्या केसेस होत्या त्या उत्तरप्रदेश पोलिसांकडून टाकल्या गेल्या असत्या. राज ठाकरे जसं म्हणाले तसा कार्यकर्त्यांच्या मागे चौकीशीच ससेमिरा उत्तरप्रदेश पोलिसांकडून लावला गेला असता.

त्यामुळं हा सगळा ट्रॅप होता असं राज ठाकरे म्हणतायेत तेव्हा या सापळा रचण्यात  उत्तरप्रदेशमधील भाजपचं योगी आदित्यनाथ सरकार देखील सामील आहे का ?

असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

भाषणात पुढे राज ठाकरे म्हणाले एक कुठला खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का वो ? या अनेक गोष्टींना अनेक पापुन्द्रे आहेत. 

राज ठाकरे जो प्रश्न आज उपस्तिथ करतायेत तो प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उपस्तिथ केलं जात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने ब्रजभूषण सिंग यांना जाहीररीत्या समज दिलेली नाहीये. ब्रिजभूषण सिंग राज ठाकरेंना धमकीवजा इशारा देत आहेत. ज्यामुळं तणाव निर्माण होऊ शकतो. 

असं असतानाही  उत्तरप्रदेश सरकारनं अजूनपर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाही  केलेली नाहीये ना त्यांना समज देण्यात आली आहे. त्यात ब्रिजभूषण सिंग हे भाजपचे जुने नेते आहेत त्यांनी भाजपाची याआधी सहावेळा खासदारकी मिळवली आहे. त्यामुळं जर योगी आदित्यनाथ यांनी काही बोलले ते ब्रिजभूषण सिंग यांना ऐकणं भाग होतं. मात्र तसं होताना दिसत नाहीये.

राज ठाकरेंनी अजून एक प्रश्न उपस्तिथ केला तो म्हणजे या रेल्वेची परीक्षा देण्यास आलेल्या मुलांनां जी मारहाण केली होती त्याच्या टाइमिंगचा.

१०-१२ वर्षानंतर हा मुद्दा उपस्तिथ केला जात आहे असं राज ठाकरे म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हा राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्याकडे वळले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पाठोपाठ हिंदुत्वाच्या मतांमध्ये अजून एक वाटेकरी तयार झाला होता. भाजपाला शिवसेनेच्या हिंदुत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केल्याने टीका करणं शक्य होतं. मात्र राज ठाकरेंच्या बाबतीत तसं करता आलं नसतं. त्यामुळंच भाजपाला राज ठाकरेंचा इतिहास बाहेर काढणं फायदेशीर ठरू शकतंय असं राजकीय जाणकार सांगतायत.

उत्तर भारतीय मारहाण प्रकरणात राज ठाकरे यांनी उदाहरण दिलं ते गुजरातमधील भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांचं.

गुजरातमध्ये एका बलात्कारच्या प्रकरणात एका उत्तर भारतीयाचं नाव आलं होतं. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात हिंसक आंदोलन करण्यात केलं होतं. त्यानंतर हजारो कामगारांना गुजरात सोडून जावं लागलं होतं.  याआधी  काँग्रेसमध्ये आमदार असणारे अल्पेश ठाकोर आज  भाजपमध्ये आहेत.

याचाच धागा पकडत राज ठाकरे यांनी अल्पेश ठाकोर यांना माझ्यासारखी माफी मागावी लागली नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर यामागं सगळं राजकारण आहे आणि ते समजून घेण्याचं गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबले, आमचे लाऊडस्पीकर झोंबले त्यांचं हे काम आहे. 

आमच्या विरोधात सगळे एकत्र येतात अन्यथा भांडत असतात. असं राज ठाकरे भाषणात पुढं म्हणाले.ज्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात बोलायचं असतात तेव्हा राज ठाकरे नाव घेऊन टीका करतात. मात्र ह्यावेळी सगळे म्हणाले त्यात भारतीय जनता पार्टी देखील आहे असं जाणकार सांगतात. 

याच्या पुढे जाऊन राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्यानं मनसेचं हनुमान चालीसा आंदोलन हायजॅक करण्याच्या कृत्यावरही टीका केली. 

मातोश्री पुढं जाऊन हनुमान चालीसा वाचायला ती काय मशीद आहे असं राज ठाकरे म्हणाले. राणा दाम्पत्याच्या आंदोलनाला भाजपाने पूर्णपणे पाठिंबा दिला होता.

त्यामुळं राज ठाकरे यांच्या भाषणाचा रोख आणि त्यांच्या अयोध्या दौरा रद्द करण्यामागचं कारण भारतीय जनता पार्टीच होती मात्र काही कारणाने त्यांनी भाजपचं नाव घेतलं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपाची कोणती स्ट्रॅटेजी आहे याचा बोल भिडूने एक सविस्तर व्हिडिओ केला होता तो खालील लिंक वर जरूर बघा.

 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.