रामसेतू मानवनिर्मित आहे की नैसर्गिक यावर आजपर्यंत अनेक दावे करण्यात आले पण…

राममंदिराप्रमाणे रामाशी निगडित आणखी एक गोष्ट रामसेतू नेहमी चर्चेत येत असते. या चर्चांमध्ये रामसेतूच्या पौराणिक आणि वैज्ञानिक बाजूंवर वेगवगेळी मतं मांडली जातात. त्यामुळे रामसेतू नक्की काय आहे याचा तिढा तसाच राहतो.

काल २२ डिसेंबरला राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेत रामसेतुबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

यात ते म्हणाले की, 

“मागील सरकारांनी रामसेतूच्या मुद्द्याला महत्व दिलं नव्हतं. मी सरकारला विचारू इच्छितो की, आपला गौरवशाली इतिहास असलेल्या रामसेतूवर सरकारकडून वैज्ञानिक रिसर्च केलं जात आहे का ?”

कार्तिकेय शर्मा यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी उत्तर दिलं आहे. 

ते म्हणाले की, 

“रामसेतुबद्दल काही मर्यादा आहेत कारण या सेतूचा इतिहास तब्बल १८ हजार वर्ष जुना आहे. स्पेस टेकनॉलॉजिच्या मदतीने रामसेतूमध्ये दगडांचे काही अवशेष मिळाले आहेत. यात सातत्य दाखवणाऱ्या संरचना आहेत तसेच काही बेट आणि चुनखडीचे दगड देखील आहेत. परंतु ते रामसेतूच आहे असं स्पष्ट सांगता येत नाही, मात्र काही पुरावे आढळले आहेत त्यामुळे या प्रकरणावर संशोधन सुरु आहे.”

रामसेतूच आहे असं स्पष्ट सांगता येत नाही असं सरकारनेच म्हटल्यामुळे रामसेतू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पण ही चर्चा आजची नाही तर यापूर्वी पौराणिक आणि ब्रिटिश काळापासून रामसेतूवर चर्चा केली जात आहे. भारतातील धनुष्यकोंडी आणि श्रीलंकेच्या मन्नार बेटादरम्यान असलेल्या या सेतूला हिंदू धर्मीय रामसेतू म्हणतात तर मुस्लिम आणि ख्रिश्चन याला ॲडम ब्रिज म्हणतात. मात्र या तीनही धर्मातील लोकांच्या विरुद्ध वैज्ञानिकांचे स्वतःचे काही शास्त्रीय दावे आहेत. त्यामुळे रामसेतूबद्दलचा वाद नेहमी चर्चेत येत असतो.

हा सगळं गुंता उलगडण्यासाठी रामसेतू बद्दल केले जाणारे सर्व दावे काय आहेत ते समजून घ्यावे लागतील. 

यात सर्वात पहिला आणि महत्वाचा दावा आहे हिंदू धर्मियांचा… 

सर्वज्ञात असलेल्या रामायण या हिंदू पौराणिक महाकथेनुसार श्री रामांच्या आदेशानुसार वनरसेनेने या पुलाची निर्मिती केली असं सांगितलं जातं. रामायण कथेचा मूळ स्वरूप असलेल्या वाल्मिकी रामायणात या पुलाच्या निर्मितीचा प्रसंग सांगण्यात आला आहे. वाल्मिकी रामायणातील युद्धकांडामध्ये २२ व्या सर्गात रामसेतुबद्दल ३६ श्लोक सांगण्यात आले आहेत.

वाल्मिकी रामायणानुसार,

श्री रामांनी नलाच्या नेतृत्वाखाली वनरसेनेला सेतू बांधण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वानरसेना नारळ, ताड, आंबा, काथ्या, लिंब आणि अशोकाची झाडे तोडून समुद्रात टाकायली लागली. त्यानंतर बलवान वानरांनी बैलगाड्यांवर मोठाली दगडं वाहून आणली आणि त्यांना समुद्रात टाकण्यास सुरुवात केली.

हा सेतू एकूण १०० योजन लांबीचा होता त्यामुळे काही वानरांनी १०० योजना लांबीची एक दोरी केली आणि ती सरळ रेषेत धरली. तर पुलाचं बांधकाम व्यवस्थित व्हावं यासाठी काही वानर हातात काठ्या घेऊन उभे होते. पहिल्या दिवशी १४ योजन, दुसऱ्या दिवशी २० योजन, तिसऱ्या दिवशी २१ योजन, चौथ्या दिवशी २२ योजन आणि पाचव्या दिवशी २३ योजन अशा पद्धतीने पाच दिवसात १०० योजन लांब सेतूचं बांधकाम करण्यात आलं होतं.

हा सेतू स्त्रीच्या भांगाप्रमाणे एकदम सरळ रेषेत बांधण्यात आला होता. हा पथ आकाशातील छायापथसारखा शोभून दिसतो असं सांगण्यात आलं. 

यासोबतच रामायणाच्या वेगवगेळ्या आवृत्ती आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्ये देखील रामसेतूचा उल्लेख आढळतो.

तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये लंकाकांडात याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार वानर आणि अस्वल मोठमोठे पर्वत आणि झाडं उचलून आणायचे आणि नल व निलकडे द्यायचे. याच्या साहाय्याने दोघांनी सुंदर सेतू बनवला होता. तर स्कन्दपुराणात रामसेतूच्या किनाऱ्यावर असलेल्या धनुष्यकोंडी नावाच्या तीर्थस्थळाचा उल्लेख करण्यात आला आहे.

रामायण आणि स्कंद पुराणासोबतच अग्नी पुराण, ब्रह्म पुराण, विष्णू पुराण इत्यादी पुराणांमध्ये देखील रामसेतूचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

हिंदूंसोबतच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मियांच्या देखील या पुलासोबत काही धार्मिक मान्यता आहेत. 

इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्म अब्राहमीक धर्म असल्यामुळे दोन्ही धर्मात ॲडमला मानलं जातं. इस्लाम धर्मातील आख्यायिकांनुसार प्रेषित ॲडम जेव्हा स्वर्गातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी पृथ्वीवर पहिलं पाऊल श्रीलंकेतील एका टेकडीवर ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतात येण्यासाठी हा पूल बांधला होता. कुराणमध्ये ॲडमचा एकूण २५ वेळा उल्लेख करण्यात आला आहे आणि त्यांची उंची तब्बल ९० फूट होती असं सांगितलं जातं. 

परंतु या रामसेतूला ॲडम ब्रिज हे नाव एका इंग्रज अधिकाऱ्याने दिलं होतं असं देखील सांगितलं जातं. 

ब्रिटिश काळात अनेकदा या सेतूचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे, यात सेतूचा नकाशा देखील बनवण्यात आला आहे.

१७७४ च्या नेदरलँडच्या मालाबार बोपण मॅपमध्ये पहिल्यांदा भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूचा नकाशा बनवण्यात आला होता. याची एक आवृत्ती तंजावूरच्या भोसल्यांच्या सरस्वती महालात ठेवलेली आहे.

यानंतर १९०३ मध्ये ब्रिटिश अभ्यासक सी डी मॅकमिलन यांनी रामसेतूवर अभ्यास केला होता. ज्यात त्यांनी म्हटलंय की, १५ व्या शतकापर्यंत भारत आणि श्रीलंकेतील लोक या पुलावरून प्रवास करत होते. १४८० मध्ये आलेल्या वादळात हा पूल तुटला आणि पाण्यात बुडून गेला.

द गॅझेटियर ऑफ इंडियाच्या नोंदीनुसार भारत आणि श्रीलंकेदरम्यान अर्धी पाण्यात बुडालेली एक पट्टी आहे ज्याला ॲडम ब्रिज म्हणून ओळखलं जातं. तर जिऑलॉजिस्ट ऑस्कर पेट यांनी या सेतूला प्रवाळ खडकांचा ब्रिज म्हटलं होतं. 

रामसेतूच्या पौराणिक आणि आधुनिक काळात वेगवगेळ्या नोंदी सापडतात त्याप्रमाणेच वैज्ञानिकांनी देखील याबाबत ३ वेगवेगळ्या थिअरी सांगितल्या आहेत. 

१) कोरल रिफ थिअरी

या पुलावर अनेक ठिकाणी पाण्यावर तरंगणारे हलक्या वजनाचे काही दगड आढळले आहेत. या दगडांना कोरल रीफ्स म्हणतात जे समुद्रातील कॅल्शिअम कार्बोनेट पासून तयार होत असतात. सागरी जीव आणि वनस्पतींच्या अवशेषांमुळे याची निर्मिती होते त्यामुळे याची कार्बन डेटिंग करण्यात आली. कार्बन डेटिंगनुसार हा पूल ७ हजार ३०० वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं. या कोरल रीफ्सजवळ वाळू जमा झाल्यामुळे हा पूल तयार झाला असावा असं काही वैज्ञानिकांचं मत आहे.

२) प्लेट टेक्टॉनिकस थिअरी

लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील वेगवगेळ्या प्लेट्स तुटल्या आणि त्यातून वेगवगेळ्या खंडांची निर्मिती होत गेली. त्यात भारत आणि श्रीलंकेची देखील एक प्लेट होती. कालांतराने या प्लेटमध्ये देखील फूट पडली आणि भारत-श्रीलंका वेगळे झाले. यात भारतातील धनुषकोंडीची प्लेट आणि श्रीलंकेची तलाई मन्नारची एक प्लेट आहे अशा दोन प्लेट आहेत. हा भाग तुटतांना डाव्या बाजूने ४५ अंशाच्या कोनावर थांबला त्यामुळे या दोन टोकांमध्ये ही साखळी तयार झाली आहे.

३) लॉंगशोअर करंट आणि ड्राईफ थिअरी

या थिअरीनुसार रामसेतूच्या एका बाजूला मन्नारचं आखात आहे तर दुसऱ्या बाजूला पाल्कचा उपसागर आहे. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या लाटा स्वतःसोबत काही वाळू घेऊन येतात, या वाळूमुळे या रामसेतूची निर्मिती झाली असावी असं सांगितलं जातं.

या रामसेतूबद्दल वेगवगेळ्या पौराणिक आणि धार्मिक मान्यता तर आहेतच सोबतच वैज्ञानिकांचे दावे देखील वेगवगेळे आहेत. आजपर्यंत रामसेतूवर अनेकदा संशोधन करण्यात आलं आहे. 

परंतु हा सेतू नेमका मानव निर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे याचं उत्तर अजूनही निश्चितपणे सापडलेलं नाही.

२०१७ मध्ये डिस्कव्हरी चॅनेलवर एक कार्यक्रम दाखवला गेला होता, ज्यामध्ये प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अॅलन लेस्टर यांनी दावा केला होता की, हे शोल्स नैसर्गिक आहेत पण फक्त त्याचा वाळू असलेला भाग नैसर्गिक आहे. त्यावर असलेले दगड हे मानवाने रचलेले आहेत. हे असे दगड आहेत जे दुरून आणले गेले आहेत आणि वाळूच्या शोल्सच्या वरच्या बाजूला सेट केले गेले आहेत. 

त्यासाठी नासाने काढलेल्या सॅटेलाइट इमेजेसचा त्यांनी पुरावा दिला होता.  ज्याच्या आधारावर शास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिकांनी हा पूल मानवनिर्मित असल्याचं जाहीर केलं होतं. 

रामसेतुबद्दल जसे वेगवगेळे दवे आहेत तसाच याबद्दलचा राजकीय वाद देखील आहे.

२००५ मध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळात सेतू समुद्रम शिपिंग कॅनल प्रोजेक्ट नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. राम सेतूच्या जवळ समुद्र खूप उथळ आहे ज्यामुळं तिथून जहाजांची वाहतूक होऊ शकत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर जाणाऱ्या जहाजांना तसेच पश्चिमेकडून पूर्वेला येणाऱ्या जहाजांना श्रीलंकेला वळसा घालून जावं लागतं.  

म्हणून जहाजांच्या वाहतुकीसाठी सुयोग्य मार्ग तयार करण्यासाठी या शोल्समधील गाळ काढून त्या ठिकाणी एक जहाजांना जाण्यासाठी एक खोलगट मार्ग तयार करण्यात येणार होता. 

या प्रोजेक्टमध्ये रामेश्वरमला मोठं शिपिंग हब बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यामुळे बंगालच्या उपसागरापासून अरेबियाच्या मार्ग मोकळा होऊन भारताला एकूण ५० हजार कोटी रुपयांचा फायदा होण्याचा अंदाज होता.

पण भाजप, एआयएडीएमके, राष्ट्रीय जनता दल, जेडीएस अशा राजकीय पक्षांसह काही हिंदू संघटनांनी धार्मिक आधारावर या प्रकल्पाचा विरोध केला. शिवाय सेतुसमुद्रम प्रकल्पाविरोधात जेव्हा जनहित याचिका दाखल करण्यात आली होती तेव्हा रामसेतूचं संरक्षण व्हावं म्हणून त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचा मुद्दा सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला होता. 

धार्मिक आणि राजकीय संघटनसोबतच पर्यावरणवादी लोकांनी देखील या प्रोजेक्टला विरोध केला होता. 

यावर वैज्ञानिकांचं मत होतं की, या प्रोजेक्टसाठी टेक्टॉनीक प्लेटला धक्का लावणे अयोग्य आहे. टेक्टॉनीक प्लेटशी छेडछाड होऊन ती कमजोर झाली तर भूगर्भीय समस्या निर्माण होऊ शकतात.

तसेच पर्यावरणवाद्यांचं म्हणणं होतं की, या सेतूच्या भागामध्ये ३६ हजार वेगवगेळ्या प्रकारचे समुद्री जीव आणि वनस्पती आहेत. या प्रोजेक्टमुळे या जीवांच्या इकोसिस्टिमवर याचा परिणाम होईल आणि मान्सून चक्र बिघडेल.

परंतु यूपीए सरकारच्या काळात यावर काही संशोधन करण्यात आलं. त्याच अहवालाच्या आधारावर २००७ मध्ये यूपीए सरकारने हा सेतू मानवनिर्मित असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं. परंतु या दाव्यामुळे देशभरातील हिंदूंचा धार्मिक दबाव वाढायला लागला आणि सरकारने स्वतःचा दावा कोर्टातून मागे घेतला.

त्यानंतर २०२१ मध्ये भाजप सरकारने रामसेतूवर संशोधन करण्यासाठी सीएसआयआर एनआयएकडे याची जबाबदारी दिली होती. परंतु राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार रामसेतू मानवनिर्मित असल्याचे सांगता येत नाही.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.