शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले म्हणून बिथरलेल्या औरंगजेबाने काशी-मथुरेची मंदिरं पाडली..?

”छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता.”

असं सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकात म्हटले आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे महाराजांच्या आग्र्याहून सुटका झाल्याने अपमानीत झालेल्या औरंजेबाने केलेल्या कृत्यांमुळं मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची बीजं रोवली गेली.

आधीच आपल्या धर्मांध आणि हिंदुद्वेष्ट्या धोरणांसाठी कुख्यात असलेल्या औरंगजेबाने महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या होत्या.

त्याने हिंदूंची पवित्र मंदिरे पाडण्याचा सपाट लावला होता. यामध्ये सध्या चर्चेत असलेल्या काशीमधील विश्वनाथ मंदिर जिथं आता ज्ञानवापी मस्जिद उभी आहे आणि मथुरेतील श्रीकृष्णाभूमीवरचं केशवदेव मंदिर जिथं आज शाही इदगाह मशीद उभी आहे यांचाही समावेश होता का ?

असा प्रश्न पडतो कारण ऐतिहासिक पुरावे तर याच शक्यतेकडे बोट दाखवता. ते कोणते हेच सविस्तर पाहू.

पुरंदरच्या तहानंतर १६६६ मध्ये शिवाजी महाराजांना सम्राट औरंगजेबाकडून आग्रा येथील राजदरबारात येण्याचं आमंत्रण देणारं पत्र आलं होतं. 

मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी हमी घेतल्यानंतर शिवाजी महाराज औरंगजेबाची भेट घेण्यास गेले होते. मात्र तिथं गेल्यावर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली नाही. औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त जो दरबार भरला होता त्यामध्ये शिवाजी महाराजांना मुद्दामून मागच्या रांगेत उभा करण्यात आले होते.

१६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी पराभूत केलेल्या जसवंत सिंग या मुघल मनसाबदाराला कार्यक्रमात त्याच्यासमोर उभा राहिला होता .

यामुळंच संतापलेला जाणता राजा ताडकन तेथून बाहेर पडला. मात्र इथंच औरंगजेबाने दगाफटका केला. शिवाजी महाराज आणि लहानग्या संभाजी महाराजांना त्यानं नजरकैदेत ठेवलं. मात्र १६६६ च्या मे ,जून ,जुलै असे तीन महिने नजरकैदेत राहिले. 

पण त्यानंतर १९ ऑगस्ट १६६६ ला महाराज बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याच्या वेढ्यातून बाहेर पडले.

यामध्ये मिर्झाराजे जयसिंग यांनीदेखील मदत केल्याचा दावा करण्यात येतो.

जदुनाथ सरकार लिहितात:

” मिर्झाराजे जयसिंग यांनी हिंदू धर्मीयांच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर अशी शपथ घेऊन खात्री दिली की, भेटीदरम्यान शिवाजी महाराजांना कोणतीही इजा होणार नाही.”

आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांची सर्व देखरेख पाहणारा जयसिंग यांचा मुलगा रामसिंग यानेही महाराजांच्या सुरक्षेसाठी वचन दिले होते. त्यामुळंच मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना मदत केली अशा गोष्टी औरंगजेबाच्या कानावर घातल्या गेल्या त्यामुळं बादशहा अजूनच चिढला.

आग्र्याहून निघाल्यानंतर महाराज मथुरेतही थांबले होते. कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी ४७ दिवस मथुरेत असल्याचे पत्र सापडल्याचा दावा केला होता.

छत्रपती शिवरायांच्या मथुरेतुन ३ ऑक्टोबर १६६६ रोजी लिहिलेल्या एका पत्राचा ते यासाठी संदर्भ देतात.

या काळात शिवाजी महाराज यांना मथुरेतील ब्राह्मणांनी मोठी मदत केल्याचं सांगण्यात येतं. शिवाजी महाराज जेव्हा पुढे यायला निघाले तेव्हा त्यांनी ओळख लपवण्यासाठी संभाजी महाराजांना मथुरेतील ब्राह्मणाकडे ठेवलं होतं असं म्हणतात.

मिर्झाराजे जयसिंग यांनी आणि मथुरेतल्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांनी केलेली मदत औरंगजेबाला चांगलीच खुपल्याचं दिसतं.

इतिहासकार रिचर्ड ईटन यांनी त्यांच्या Temple desecration and Indo-Muslim states  या पेपरमध्ये लिहतात,

” १६६९ मध्ये बनारस मधील जमीनदारांनी बंड केले होते. यातील काहींनी बादशाहाचा प्रमुख शत्रू असलेल्या शिवाजी महाराजांना मदत केली राजकैद्येतून सुटण्यास मदत केली होती. त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की शिवाजी महाराज यांना जयसिंग यांनीही आग्र्याहून सुटका करून घेण्यास मदत केली होती. मिर्झाराजे जयसिंग हा राजा मानसिंग यांचा पणतू होता ज्यांनी बनारस मधलं विश्वनाथ मंदिर बांधलं होतं. याच पार्श्वभूमीवर बादशाहने सप्टेंबर १६६९ मध्ये विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश दिला”

असंच लॉजिक मथुरेतील श्रीकृष्णजन्मस्थान मंदिर पाडण्याचा मागेही असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळंच मंदिरं पाडण्यामागचं कारण धार्मिकतेपेक्षा राजकीय असल्याचाही दावा काही इतिहासकारांकडून केला जातो.

१६६९ मध्ये वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिल्यानंतर एकाच वर्षात औरंगजेबने मथुरेतलं मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिला होता.

या दोन्ही घटना शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका आणि त्यांनतर बिथरलेला औरंगजेब या पार्श्वभूमीवर घडल्या आहेत. कैदेतून शिवाजी महाराजांच्या सुटकेमुळे औरंगजेबाला आजीवन पश्चाताप झाला होता.

औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे,

“राज्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणे हा सरकारचा सर्वात मोठा आधारस्तंभ असतो. तर एका मिनिटाच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षे लज्जास्पद वागणूक मिळते. बघा कसं आमच्या  निष्काळजीपणाने शिवाजी गेल्यामुळं आता माझ्या दिवसाच्या शेवटपर्यंत या सर्व विचलित करणार्‍या मोहिमांमध्ये मला सामील व्हावं लागत आहे.”

याचा मराठ्यांकडून अपमानाचा बदला घेण्यासाठी औरंगजेब दख्खनला आला होता मात्र त्याला त्यात पूर्णपणे यश आलंच नाही आणि त्याची कबर दखानच्याच मातीत खोदली गेली.

त्यामुळं जदुनाथ सरकार म्हणतात तसं छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहुन सुटका हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइण्ट होता कारण आजही औरंगजेबाने त्या काळात केलेल्या कृत्यांमुळं आजही देशातलं वातावरण गढूळ होतंय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.