पाकिस्तानला हरवणाऱ्या ईशापुर रायफलच्या निर्माणाचं श्रेय जातं यशवंतराव चव्हाणांना
जसं जसं जग पुढे जातंय तसं तंत्रज्ञान विकसित होत चाललंय..त्यात शस्त्र देखील कसे मागे राहतील.
काळानुसार शस्त्रात देखील नवेनवे बदल होत आहेत आणि इतर देशांच्या मानाने भारतही यात मागे नाही. त्यात ब्रिटीशकालीन इतिहासाचा आढावा घेतला तेंव्हा भारतात शस्त्रांच्याबाबतीत नेमकी स्थिती आहे हे पाहणे महत्वाचे ठरते.
फार मागे जाण्यापेक्षा आपण आधुनिक इतिहासच पाहूया कि, १८व्या शतकात म्हणजेच ब्रिटीशकाळात भारतात शस्त्रे बनविण्याचे आणि दारूगोळ्याचे कारखाने सुरु झाले. आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा अजून विकास करण्यात आला. थोडक्यात सांगायचं झालं तर, अशा कारखान्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन इंडिअन ओएफबी म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाकडून केले जाते.
तर ब्रिटीश काळात झालेल्या शस्त्रनिर्मितीमध्ये भारतातल्या पश्चिम बंगालमधील ईशापूर येथे असलेल्या कारखान्याचं मोठं योगदान आहे.
१८ व्या शतकात जेंव्हा ब्रिटीश राजवटीला भारतात शस्त्रसाठ्याची आवशकता भासू लागली तेंव्हा त्यांनी भारतात गन पावडरचा कारखाना उभा करण्याचे ठरविले, मग यासाठी योग्य अशी जागा निवडण्याची वेळ आली तेंव्हा त्यांना पश्चिम बंगालमधील ईशापूर हि जागा योग्य वाटली. हा कारखाना स्थापन करण्यापूर्वी म्हणजेच १७१२ ते १७४४ या काळात याच जागेवर डच ऑस्टेंड कंपनीची गन पावडर फॅक्टरी कार्यरत होती.
आणि मग इंग्रजांनी १७७८ मध्ये स्थानिक राजा-महाराजांकडून ही जमीन ताब्यात घेतली आणि खूप वर्षांनी म्हणजेच १७८७ मध्ये येथे कारखाना उभा करण्याचे काम सुरु झालं.
या ईशापूरच्या कारखान्यात १७९१ ते १९०२ या काळात फक्त गन पावडरचेच उत्पादन व्हायचं. पण त्यानंतर या ईशापूर च्या कारखान्यात १९०४ पासून बंदुकांचेही उत्पादन घायला सुरु केलं.
आणि मग कारखान्याचं नामकरण ‘रायफल फॅक्टरी, ईशापूर’ असं करण्यात आलं.
दुसऱ्या महायुद्धानंतर १९५४ मध्ये ब्रिटिश सैन्याने वापरात आणलेली एफएन-एफएएल हि रायफल हि जगभरात ती इतकी फेमस झाली कि, नंतर तब्बल ९० देशांच्या सेनादलांनी हि रायफल वापरली होती आणि अजूनही वापरली जाते. भारताच्या आर्मीकडे देखील ह्याच रायफली वापरल्या जातात आणि भारतातल्या बऱ्याच राज्याच्या पोलीस डिपार्टमेंट कडे हीच रायफल वापरली जाते.
तर हे सांगण्याचा उद्देश हा कि, इतिहासापासून गाजत आलेल्या या रायफलीचे उत्पादन स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षांपासून भारतातल्या ईशापूर रायफल फॅक्टरीत होत असे.
लंडनमध्ये एक कारखाना आहे, ‘रॉयल स्मॉल आर्म फॅक्टरी ऑफ एनफिल्ड लॉक’ नावाचा. तिथे ईशापूरच्या कारखान्याला खूप वजन आहे, तिथे ईशापूर च्या कारखान्याला ‘एनफिल्ड ऑफ इंडिया’ असं म्हणलं जातं.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ईशापूरच्या कारखान्यात ब्रिटिश एसएमएलई किंवा एनफिल्ड ३०३ बोल्ट अॅक्शन रायफलचे खूप मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली.
पण १९६२ मध्ये झालेल्या भारत -चीन युद्धामध्ये ३०३ बोल्ट अॅक्शन या रायफल चीनच्या शस्त्रांच्या समोर कमकुवत वाटल्या, त्यामुळे आता भारतीय आर्मीला स्वयंचलित रायफलची गरज भासू लागली.
१९६२ च्या युद्धात झालेल्या पराभवानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदी बोलावून घेतलं.
हिमालयाच्या मदतीला सह्यादी धावून गेला.
यशवंतराव चव्हाणांनी सर्वप्रथम निर्णय घेतला की भारतीय सैन्यदलाचे अत्याधुनिकीकरण करायचे. जुनाट बंदुका रणगाडे संरक्षण साहित्य मोडकळीस आणून त्या जागी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनवायची तीही भारतातल्या कारखान्यात अस यशवंतरावांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने पावले पडू लागली.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न आर्मीच्या रायफल्सचा होता. संरक्षणदलाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यावर कळाल की तेंव्हा ब्रिटिश सैन्यात एल-१ ए-१ ही रायफल वापरात होत.
ब्रिटनमध्ये ही रायफल एल १ ए १ सेल्फ लोडिंग रायफल म्हणून ओळखली जायची, तिच्यामध्ये २० गोळ्या मावतात आणि त्यांचा ८०० मीटपर्यंत अचूक मारा करता यायचा, तिची एकच गोळी इतकी शक्तिशाली होती कि, ती झाडल्यावर चेंबरमध्ये मोठा स्फोट होतो इतकी ताकद त्या गोळीत होती.
ब्रिटीशची हि रायफल मुळात बेल्जियमच्या एफएन-एफएनएल या रायफलीवर आधारित होती, भारतानेही या रायफलची कॉपी करून त्यात काही गोष्टी विकसित करून त्याची देशी आवृत्ती ईशापूर येथे तयार केली.
तत्कालीन संरक्षणमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारामुळे हि रायफल भारतात विकसित झाली.
आणि मग १९६५ मध्ये भारत -पाकिस्तान युद्धात या रायफलीचा भारताला बराच फायदा झाला कारण ७.६२ मिमी व्यासाची ही रायफल सेमी-ऑटोमॅटिक पद्धतीने चालत असल्यामुळे तीने या युद्धात सैनिकांची मोहीम सोपी करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली.
युद्ध जिंकून आणण्याच्या रायफलीच्या कामगिरीबद्दल संसदेने देखील ईशापूर फॅक्टरीचा गौरव केला.
तसेच कारखान्याचे तत्कालीन जनरल मॅनेजर के. सी. बॅनर्जी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.
भारतातली हीच गाजलेली एसएलआर रायफल आजही अनेक राज्यांच्या पोलीस दलांत वापरली जाते.
हे ही वाच भिडू.
- अशा प्रकारे तांबटांचे ओझर मिग विमानांचे ओझर बनलं
- भिवंडी दंगलीवरून पत्रकारांवर खटले टाकले, तर यशवंतरावांनी थेट मुख्यमंत्र्याना खडसावलं
- फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.