रोजच दिसणाऱ्या गोष्टीकडं आम्ही समस्या म्हणून पाहिलं आणि उपाय सुचला

साखर कारखान्याला ऊस घालवायचा म्हणजे ट्रक, ट्रॅक्टर किंवा बैलगाडी वापरली जाते. शेतीतील यांत्रिकीकरण वाढले असले तरीही अनेक गोष्टींसाठी बैलांची मदत घेतली जाते. त्यातच ट्रॅक्टर चालक जवळील भाडे घेत नाही, ऊस कमी आहे, रस्ते नाहीत यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला ऊस बैलगाडीवरून कारखान्यावर घेऊन जावा लागतो.

मात्र, ऊसाच्या ओझ्यामुळे बैलांवर बराच ताण येतो. यामुळे अनेकवेळा रस्त्यात अपघात सुद्धा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच आणि वेळही जातो. शेवटी यावर शेतकऱ्यांच्या मुलांनीच उपाय शोधला आहे. बैलांच्या मानेवरील ओझं कमी करण्यासाठी बैलगाडीसाठी ‘रोलिंग’ तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बरीच मदत होणार आहे. 

इस्लामपूरच्या आरआयटी कॉलेज मधील इंजिनियरिंगच्या ५ विद्यार्थांनी हे रोलिंग तयार केले आहे. 

यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बैलगाडीत मोठा असा कुठला बदल सुद्धा करण्याची गरज लागणार नाही. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट देण्यात येतो. यात नवनवीन संकल्पना शोधून त्यावर काम करायचे असते. यात ४ ते ५ जणांची टिम तयार करण्यात येते. ६ महिन्यात हा सगळा प्रकल्प पूर्ण करावा लागतो.

आरआयटी कॉलेज मधील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपावले, आकाश गायकवाड, ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात आली होती. 

आरआयटी कॉलेज जवळ राजारामबापू सहकारी साखर कारखाना आहे. साखर कारखान्यात हंगामा दरम्यान रोज मोठ्या प्रमाणात बैलगाड्या ऊस घेऊन येत असायच्या. उसाच्या ओझ्यामुळे वाकलेले बैल, टर्न घेताना होणारे अपघात हे सगळं या विद्यार्थ्यांना दिसत होते. 

यामुळे हा विषय घेऊन प्रोजेक्ट करावा अशी संकल्पना सौरभ, आकाश, निखिल, ओमकार या विद्यार्थांना सुचली. त्यानुसार त्यांनी बैलांच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील याची माहिती घ्यायला सुरुवात केली.  ट्रॅक्टर, ट्रक सारख्या जड गोष्टी वाहून नेणाऱ्या वाहनात ओझं जास्त झालं तरीही अडचण येत नाही. 

यावेळी त्यांना समजले की, मोटारसायकलपासून सगळ्या वाहनांमध्ये धक्के पचविण्यासाठी शॉकॲब्झॉर्रबर असतात. 

राज्यात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. यात जवळपासच्या भागातून ऊसाची वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात येतो. मात्र बैलगाडीत वजन जास्त झाल्यावर, खड्यात गेल्यावर धक्के पचविण्यासाठी कुठलेच यंत्र नसते.

शेतात ऊस भरताना लावण्यात आलेली लाकडी फळी जमीनीत घुसते, कधी वजनामुळे ती मोडते.  बैलांवर जास्त ओझं येत, स्पीडब्रेकर, खड्यांमुळे पाय घसरणं, पाय मुरगळणे आणि कधी कधी पाय मोडणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे बैलाला दुखापत तर होतेच त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होते.

यामुळे बैलगाडीसाठी शॉकॲब्झॉर्रबर सारखी कुठली वस्तू तयार करता येईल का याचा शोध हे विद्यार्थी घेत होते. बैलगाडीला दोन्ही चाकांच्या मध्ये तिसरे चाक बसवले तर त्यामुळे बैलांवरचा भार कमी करता येईल हे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी एक टायर असलेले शॉकॲब्झॉर्रबर तयार केलं त्याला रोलिंग असे म्हटले जाते. या विद्यार्थांनी या रोलिंगला सारथी असे नाव दिले.

हे रोलिंग बैलगाडीच्या ‘जु’च्या मध्यभागी बसविण्यात आले आहे. 

हे शॉकॲब्झॉर्रबर बैलगाडीला पूर्ण संतुलन देते, हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त किंवा वर-खाली करता येऊ शकतो, तसेच हे रोलिंग ऊस भरताना खाली आणि शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो, अशाप्रकारे तयार करण्यात रोलिंगचे टेस्टिंग हे ऊस भरताना आणि रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आले आहे.

आता पर्यंत ३ बैलगाडींना हे रोलिंग बसविण्यात आले आहे. 

याबाबत बोलभिडुशी बोलतांना या प्रोजक्टमध्ये सहभागी असणाऱ्या अक्षय कदम याने सांगितले की,

 “या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्टचे पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे रोलिंग बसविण्यासाठी शेतकऱ्यांना १० हजार पेक्षा कमी खर्च येणार आहे. रोलिंगला सध्या रेसिंग कारचे टायर बसविण्यात आले आहे. त्यामुळे हे रोलिंग थोडेसे महाग आहे. पण यामुळे बैलांना आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.” 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.