आजकाल नाही तर १९७१ च्या युद्धापासून इस्रायल भारताला गुप्तपणे मदत करतंय..
२०१४ पासून भारत आणि इस्रायलच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला असं सगळीकडे म्हटलं जातं. त्यांचे पंतप्रधान नेत्यानहु म्हणजे आपल्या मोदीजींचे बेस्ट फ्रेंड समजले जातात. मोदीजी तिकडे गेले किंवा नेत्यानाहू भारतात आले तर मोठा इव्हेन्ट असतो. आपली जवळीक त्यांनी जगापासून कधी लपवली नाही. आणि हे प्रेम एकतर्फी नाही तर म्युच्युअल आहे. इस्रायल देखील मोदीजींच्या प्रेमात आकंठ बुडालाय.
खुलेआम ट्विटरवर फ्रेंडशिप डे ला ये दोस्ती हम नहीं तोडेंगे चा व्हिडीओ शेअर करण्यापर्यंत हे प्रकरण पोहचलं आहे.
पण भारताची आणि इस्रायलची मैत्री आजकाल बहरली नाही, त्याचा इतिहास खूप जुना आहे.
इस्रायलची निर्मिती देखील भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात झाली. पॅलेस्टाईनची फाळणी करून ज्यू लोकांचा वेगळा देश करण्यावर तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांचा विरोध होता. धार्मिक आधारावर कोणत्याही देशाची निर्मिती होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. भारताच्या फाळणीच्या जखमा ताज्या होत्या यामुळेच आपल्या देशाने इस्रायलच्या निर्मितीला पाठिंबा दिला नाही.
मात्र भारतातून हिंदू महासभेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर हिंदुत्ववादी नेते अगदी सुरवातीपासून इस्रायलच्या बाजूने बोलत होते. पुढे १९५० साली नेहरूंच्या सरकारने इस्रायलचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. मात्र इस्रायलला पाठिंबा देऊन अरब देशांना दुखवायचे नाही असे धोरण भारताचे होते. तेलापुरवठ्यासाठी आपल्याला या देशांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ही आपली मजबुरी होती.
पुढे इस्रायलला मुंबईमध्ये वाणिज्य दूतावास सुरु करण्याची परवानगी देण्यात आली मात्र अजूनही दिल्लीमध्ये परराष्ट्र दूतावास बनवण्याची परवानगी दिली नव्हती. पन्नासचे दशक आणि साठचे दशक भारत इस्रायल यांच्यात कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते.
मात्र या दोन्ही देशांची एकमेकाला मदत करण्याची सुरवात दोन महिला पंतप्रधानांपासून सुरु झाली. इंदिरा गांधी आणि गोल्ड मेयर.
गोष्ट आहे १९७१ सालची.
भारताला स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी फाळणीचा शाप देखील दिला होता. पंजाब,सिंध आणि बंगालचा मुस्लिम बहुल भागाचे पाकिस्तानमध्ये रूपांतर करण्यात आले होते. यातील बंगालचा भाग पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. या पूर्व पाकिस्तानचे मुख्य भूमीशी अगदी सुरवातीपासून खटके उडायचे. त्यांची संस्कृती वेगळी भाषा, आचार विचार सगळे वेगळे होते.
यातूनच तिथल्या तरुणांमध्ये बांगलादेशाचा विचार जोर धरू लागला. पाकिस्तानचे सरकार त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू लागली. चवताळलेल्या पाक सैन्याने सर्वसामान्य जनतेवरही अत्याचार सुरु केले.
पाक आर्मीच्या या आक्रमक पवित्र्याला घाबरून सीमाभागातून लाखो बांगलादेशी शेतकरी आपापले कुटुंब घेऊन भारताच्या आश्रयाला येऊ लागले.
भारताच्या खमक्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशाच्या नरसंहारावर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आवाज उठवला. पण तिथे कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. इंदिरा गांधींनी आम्हाला युद्धाचे पाऊल उचलावे लागणार असल्याचे संकेत दिले.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन यांचा भारतावर विशेषतः इंदिरा गांधीवर वैयक्तिक राग होता. पाकिस्तानला पक्षपाती अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी या युद्धात शस्रास्त्रे, रणनीती यापासून सगळी मदत पाकिस्तानला पाठवली. त्यांचे मित्र असलेल्या जॉर्डन व इराक या देशांनासुद्धा पाकिस्तानला लष्करी मदत धाडायला सांगितले.
तो शीतयुद्धाचा काळ होता. पाकिस्तान अमेरिकेच्या गटात होता.
भारत मात्र नेहरूंच्या काळापासून अलिप्ततावाद पोसत असल्यामुळे कोणत्याही एका गटात नव्हता. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी ओळखले की आपल्या मागे उभे राहू शकेल अशा मित्रांची गरज आहे. त्यांनी सोव्हिएत रशियाकडे मदत मागितली. तो देखील तयार झाला.
युद्धाची तयारी जोरात होती. भारताचे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी पंतप्रधानांना आर्मीसाठी मॉर्टर गन्स लागणार आहेत हे सांगितले. त्याकाळी मॉर्टर हे फक्त इस्रायलकडे उपलब्ध होते. पण भारताचे आणि इस्रायलचे राजनैतिक संबंध दुरावलेले होते आणि शिवाय इस्रायल हा अमेरिकेचा मित्र असल्यामुळे तो आपल्याला मदत करणार नाही याची इंदिरा गांधींना खात्री होती.
पण या कामाची जबाबदारी त्यांचे सल्ल्लागार असलेल्या पी.एन.हक्सर यांनी घेतली.
हक्सर यापूर्वी जेव्हा इंग्लंडमध्ये भारतीय दूतावासात अधिकारी होते तेव्हा त्यांची श्लोमो ज़बलुदोविक्ज़ नावाच्या एका ज्यू व्यक्तीशी ओळख झाली होती. तो एकेकाळी हिटलरच्या छळछावणीमधून सहीसलामत वाचून इस्रायलला स्थायिक झाला होता. हा श्लोमो आंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रास्त्रे विक्रीचा व्यवहार करायचा.
हक्सर यांनी त्याला मॉर्टर्स देण्याची गळ घातली. श्लोमो त्यासाठी तयार होता पण यासाठी इस्रायलसरकारच्या परवानगीची गरज होती. जे कि अवघड होतं.
तेव्हा पंतप्रधान होत्या गोल्ड मायर. त्या देखील इंदिरा गांधींच्या प्रमाणे कठोर प्रशासक होत्या. परराष्ट्रनीतीचे त्यांना अचूक भान होते. अखेर पी.एन.हक्सर स्वतः इस्रायलला गुप्त मिटिंग साठी गेले. गोल्ड मायर यांच्या कानावर ही मागणी घालण्यात आली.
या मदतीच्या बदल्यात मायर यांनी इंदिरा गांधींना काही अटी घातल्या होत्या. पण भारताने या अटी मेनी करण्यास नकार दिला. या मागची भूमिका हक्सर यांनी गोल्ड मायर यांना समजावून सांगितली. मायर अखेर पाकिस्तान विरोधात भारताला मदत करण्यास तयार झाल्या. पण हे सगळं गुप्त ठेवण्याचं ठरलं.
अमेरिकेपासून लपवून इस्रायलने भारताला मॉर्टर्स व इतर शस्त्रास्त्रांची मदत पाठवून देण्यात आली. सोबत भारतीय लष्कराला प्रशिक्षण देणारे काही अधिकारी देखील आले होते. पुढे जेव्हा युद्धाला तोंड फुटले तेव्हा या शस्त्रास्त्रांची भारताला प्रचंड मदत झाली.
१९७१च्या युद्धात पाकिस्तानला अमेरिकेचा खुला पाठिंबा असूनही भारताने धूळ चारली, त्यांच्या ९३ हजार जवानांना युद्धबंदी बनवलं, पाक सरकारला गुडघ्यावर आणलं. या विजयात इस्रायलने ऐनवेळी केलेली मदत देखील कारणीभूत ठरली.
आजही गोल्डा मायर यांनी हक्सर यांना पाठवलेले गुप्त पत्र आपल्याला पाहता येते. त्यात त्या म्हणाल्या होत्या,
“तुम्ही इस्रायल भेटीला आला होता तेव्हा माझ्याकडे एक मागणी केली होती, मला आनंद आहे की मी त्याची पूर्तता करू शकले. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी याची दखल घेतील व भविष्यात आपल्या दोन्ही देशातील संबंध सुधारतील अशी आम्हाला आशा आहे.”
या घटनेनंतर भारत व इस्रायल यांच्यातील गुप्त संबंध आकारास आले. पुढे १९९२ साली पंतप्रधान नरसिंह राव यांनी आजवरची कोंडी फोडून अधिकृत रित्या दोन्ही देशात राजनैतिक देवाणघेवाण सुरु झाली. आणि आता मोदीजींच्या काळात यावर कळस चढवण्यात आलाय.
हे ही वाच भिडू.
- नेहरू ते मोदी: भारताची इस्रायलविषयीची भूमिका कशी बदलली?
- इस्त्रायलची निर्मीती कशी झाली ?
- इस्त्रायलच्या पाठ्यपुस्तकात भारतीय सैन्याच्या शौर्याचे धडे आहेत, पण का ?
- हिटलर हरवण्यासाठी सैन्यात आलेल्या ज्यू माणसाने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं..