राजे एकत्र या नायतर भांडा पण एवढ ऐका…

आमच्या साताऱ्यात एक सोडून दोन दोन राजे आहेत. दोघेपण तसेच रांगडे, उमदे, नेतृत्वगुण असणारे. उदयनमहाराज त्यातल्या त्यात जरा जास्तच रांगडे. शिवेंद्रराजे पण यात ढिल्यात पडत नसतात. ते पण तसेच आहेत. या दोघांच्यात कधी वाद होतात, कधी दोघांच्या एका हाकेवर येणारे कार्यकर्ते सातारच्या कुठल्याही चौकात जमतात. राडा होतो. साध्या गाड्या जरी एका हायवेवर आल्या तर यांच्यात रेस चालू होते. कधीकधी हे दोन्ही राजे एकत्र येतात. कधी राडा होता तर कधी दोघांच्या प्रेमाच्या व्हिडीओ क्लिप पाहून दिवस ढकलले जातात.

राजे भांडले काय आणि एकत्र आले काय, सातारच्या लोकांना काहीच अडचण होत नसणार असच वाटतं कारण काय तर दोन दोन राजे काम करण्यासाठी असल्यावर एक चुटकीत काम होतं असणार. साताऱ्यात खरं रयतेच राज्य असणार. सातारा सुजलाम् सुफलाम् असणार.

पण खरच तस आहे का? राजे एकत्र आले, राजे भांडले अशा बातम्या लावणारी मिडीया कधी साताराच्या विकासाचा सातबारा मांडणार आहे का? 

साताऱ्यात उदयनराजेना कुणी पराभूत करू शकणार नाही असं अभिमानाने सांगितलं जातं. आणि सातारकर महाराजांच्या बाबतीत कधी विश्वासघात करणार नाहीत याची प्रत्येकाला खात्री असते. पण सातारकरांनी ज्या विश्वासाने चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवलीय त्याचं काय? अजूनपर्यंत छत्रपती संग्रहालय बांधून होत नाही त्याचं काय? साताऱ्यात जर शिवाजी महाराजांचा वारसा जपायला संग्रहालय होण्यात एवढा उशीर होत असेल तर काय बोलणार? साताऱ्यात एमआयडीसीची काय अवस्था आहे? एमआयडीसी नावाचा एक काय तरी प्रकार आहे तिथं कामाला जायची ईच्छा साताऱ्यातल्या पोरांची आजिबात नाही. 

चार पाच हजारात कोण आठ तास मारायला जाणार आहे?

महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसीत किती कंपन्या आल्या हे बाकीचे लोकं अभिमानाने सांगत असतील. पण आम्ही साताऱ्यातुन किती कंपन्या गायब झाल्या हे सांगु शकतो. एमआयडीसीला अशी अवकळा का आलीय याचा विचार कुणी करणार आहे का नाही? शिरवळ एमआयडीसी मागून पुढे निघून गेलीय हे तरी मान्य आहे का नाही? साताऱ्यातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही असं साताऱ्यातल्या माणसाला वाटतं हे खर दुर्दैव आहे.

आमच्या कडं ग्रेड सेपरेटरचं काम चालु आहे. एक साधा सोप्पा नियम आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा की जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं रस्त्यांची दुरुस्ती किंवा विकास काम करत असाल आणि जर यामुळे ट्राफीकला अडथळा निर्माण होणार असेल तर पर्यायी रस्त्यांची चांगली दुरुस्ती करुन द्यावी. पण ईथं आमच्याकडं राव रस्ताच हुडकावा लागतो.

पुणे, सांगली,कोल्हापुर कुठं पोचलंय आणि सातारा कुठं पोचतोय त्याकडे कुणी लक्ष द्यायचं?

मी जवळपास आठवर्षांपुर्वी सातारा सोडलाय सातारा सोडला तेव्हा जसा होता तसाच आजपण आहे. 

आमच्याकडे शाहुंच्या नावाने स्टेडीअम पण या स्टेडीअमची अवस्था काय आहे? आमच्यासाठी किती रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या? 

आमच्या राजांचा आम्हाला अभिमान आहे. पण जेंव्हा राज्यातले लोक म्हणतात की टोल नाक्यावरून भांडणारे नेते फक्त सातारचे तेंव्हा वाईट वाटतं. जेंव्हा सातारा सगळ्यात जास्त बहुमताने महाराजांना निवडून देतो तेंव्हा आपलं महाराजावर किती प्रेम आहे हेच दाखवून देत असतो. पण याच प्रेमाची साताऱ्याला पण अपेक्षा आहे. उदयनराजे विकासाच्या एकापेक्षा एक योजना साताऱ्यात आणतील, शिवेंद्रराजे विधानसभेत साताऱ्याचे प्रश्न मांडून सभागृह दणाणून सोडतील अशी आमची सतत अपेक्षा असते. आम्ही महाराजांच्या सभेत जेवढा जल्लोष करतो त्याच्या दहापट आमच्या प्रश्नावर आवाज उठवला तर आमच्या अंगात दहा हत्तीचं बळ येईल. 

आता महाराष्ट्रातून महाराजांच्या #dashing असण्याचे किस्से ऐकू येतात तसेच देशभर साताऱ्याच्या विकासाच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. महाराजांचं नाव आता विकासाशी जोडलं जावं हे आमचं स्वप्न आहे. कारण आमच्या शिवाजी महाराजांनी या देशाला सुराज्य म्हणजे काय असतं हे दाखवून दिलंय. आणि आमच्या महाराजांच्या वारसाकडून आम्हाला डीजे बद्दल नाही तर रोजगाराबद्दल, विकासाबद्दल कठोर भूमिका बघायचीय. पक्षातल्या किंवा पक्षांतर्गत विरोधकांना जसा दरारा वाटतो तसा भ्रष्टाचारी लोकांना पण वाटला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत असं महाराष्ट्राला वाटतं. पण आम्हाला आधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र यावेत असं वाटतं. कारण दोघांच्याव वादात कार्यकर्त्यांचं काय होतंय हे सगळ्या साताऱ्याला ठाऊक आहे. किती कार्यकर्ते तुरुंगात गेले, किती आपापसात भांडणात उध्वस्त झाले हे सगळ्यांना दिसतंय. या कार्यकर्त्यांना भांडणातून काहीच मिळणार नाही. पण राजावर निष्ठेपोटी ते बिचारे धावून येतात. भांडत असतात. पण त्यात ना त्यांचा फायदा आहे ना साताऱ्याचा. 

साताऱ्याचा फायदा असलाच तर दोन्ही राजांनी एकत्र येण्यात आहे. आणि नुसतच एकत्र येऊन जमणार नाही. आता वेळ आलीय साताऱ्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची. त्यातही तुम्हाला एकत्र येण जमणार नसेल तर भांडा पण ते विकासकामावर तरी भांडा. महाराजांच्या प्रेमापोटी कुणाला महाराजांची सत्ता नकोय. खुर्ची नकोय. पण म्हणून लोकांनी काय फक्त उन्हातान्हात झेंडे घेऊन फिरायचं. गटबाजी करायची? मारामारी करायची? लोकांना स्वच्छ सातारा नको? उद्योग नको? नॅशनल हायवे जवळ असूनही विकास लांब असल्यासारखा वाटतोय. 

प्रत्येक निवडणुकीत आम्ही तुम्हाला महाराजांचे वारस म्हणून मतदान करत आलोय. आता आमची इच्छा आहे की आम्ही तुम्हाला विकासपुरुष म्हणून मतदान करावं. एवढच सांगतो, राजे एवढ ऐकाच!

  •  ओंकार गिरी. (लेखक सध्या मुंबईस्थित इंडिया TV मध्ये व्हिडीओ जर्नेलिस्ट आहेत)

हे ही वाचा. 

2 Comments
  1. राजेंद्र चोरगे सातारा says

    सातारच्या क्रीडा संकुलाची काय अवस्था असे आपण म्हणाले आहात 2008 साली नवीन क्रीडा संकुल उभारले आहे , आणि ते आता सु स्थितीत आहे, राजेंद्र चोरगे सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.