रिक्षावाल्याला नोटीस आलीये, ३ कोटी रूपये इन्कम टॅक्स भरा

हा आकडा नीट वाचा- ३४७५४८९६. हा कुठला इंटरनॅशनल नंबर नाही, ना कुणाच्या रिझल्टची रँक. हा आकडा आहे, मथुरेतल्या एका रिक्षावाल्याच्या इन्कम टॅक्सचा.

३ कोटी ४७ लाख ५४ हजार ६९६ रुपये. आतापर्यंत पिक्चरमध्ये, देशाच्या बजेटमध्ये किंवा गणितात हा एवढा मोठा आकडा ऐकला होता. रिक्षावाल्याला एवढा टॅक्स भरावा लागतोय म्हणल्यावर आम्ही पण हँग झालो की!

नक्की मॅटर काय झालाय?

मथुरेत बाकलपुर नावाचा एक विभाग आहे. तिथल्या अमर कॉलनीत प्रतापसिंह नावाचे रिक्षाचालक राहतात. आता दिवसभर रिक्षा ओढून, प्रवाशांची ने-आण करून हजार रुपये मिळाले तरी डोक्यावरून पाणी. तिथं कोटीत इन्कम असण्याचा संबंध काय? पण तरी आयटी डिपार्टमेंटचा फोन आणि नोटीस आलीये म्हणल्यावर, प्रतापसिंह यांनी राजमार्ग पोलीस चौकीत आपल्याला फसवल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून हा मॅटर सांगितला आहे. त्यानुसार, प्रतापसिंह यांच्या बँकेनं त्यांना पॅन कार्ड जमा करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी त्यांनी बकलपूरमधल्या तेजप्रताप उपाध्याय यांच्या जनसुविधा केंद्रात पॅन कार्डसाठी अर्ज केला होता.

त्यानंतर, बकलपूरच्याच संजय सिंह यांच्या मोबाईल नंबरवरून प्रतापसिंहांना पॅन कार्डची रंगीत प्रत मिळाली. प्रतापसिंह यांना लिहिता-वाचता येत नसल्यानं पॅन कार्डची मूळ प्रत आणि रंगीत प्रत यातला फरक ओळखता आला नाही. आपलं पॅन कार्ड मिळवण्यासाठी त्यांना तीन महिने या ठिकाणावरून त्या ठिकाणावर असा प्रवास करावा लागला.

हा एवढा टॅक्स आलाच कसा?

सिंह यांना १९ ऑक्टोबरला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून फोन आला आणि त्यांनी टॅक्स भरायला सांगितलं. सिंह यांनी आपली परिस्थिती सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्टीकरण दिलं.

अधिकार्‍यांनी त्यांना सांगितलं की, कोणीतरी प्रतापसिंह यांची जागा घेत आणि त्यांच्या नावावर जीएसटी नंबर मिळवला. त्यावर २०१८-१९ या वर्षात ४३ कोटी ४४ लाख ३६ हजार २०१ रूपयांचा व्यवसाय केला. साहजिकच त्या आधारावर त्यांना ३ कोटीपेक्षा जास्त रकमेचा टॅक्स भरण्याची नोटीस आली. आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना एफआयआर दाखल करण्याचा सल्ला दिल्याचंही त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.

यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे?

या प्रकरणावर, पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज कुमार यांनी सांगितलं की, सिंह यांच्या तक्रारीच्या आधारावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही; मात्र पोलिस या प्रकरणाची निश्चितपणे चौकशी करतील.

आता प्रतापसिंह यांना ठगवणारा कार्यकर्ता सापडतोय का? इन्कम टॅक्स विभाग काय कारवाई करणार? हे काय सांगता येत नाही. वाचून झाल्यावर आपलं पॅन कार्ड आपल्याकडेच आहे ना हे चेक करायला विसरू नका!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.