गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला गोंधळ, सत्ताधारी जर विरोधकांची मुस्कटदाबी करत असतील तर ते सर्व प्रकार जनतेला टीव्हीवर पाहायला मिळतात. आपला नेता योग्य वागला कि चूक हे ठरवता येतं.

पण आपण तेच बघतो जे प्रसारमाध्यमे आपल्याला दाखवतात. आणि प्रसारमाध्यमे काय दाखवतात ? तर गोंधळ आणि चटपटीत असं काही घडलं की प्रसारमाध्यमे त्याला प्रसिद्धी देतात. पण यात दुर्लक्षित राहतं ते बऱ्याच आमदारांनी केलेलं अभ्यासपूर्ण भाषण, सूचना.

अशा आमदारांच उत्कृष्ट काम दुर्लक्षित राहू नये म्हणून दिला जातो तो ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार. आणि हे दोन पुरस्कार सुरू करण्याच श्रेय जातं दत्ताजी नलावडे यांना.

दत्ताजी नलावडे म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून म्हणजे १९६७ पासून ते सैनिक म्हणून पक्षात दाखल झाले. ते मोठे कबड्डीपटू होते. गोवा मुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या बाळासाहेबांकडे ते तरुण वयातच आकर्षित झाले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नापासून ते रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत ते प्रत्येक ठिकाणी आघाडीवर राहिले.

१९६८ साली त्यांनी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली. तिथून पुढे ते सतत निवडणूक जिंकत राहिले. सेनेच्या कठीण प्रसंगी देखील दत्ताजी नलावडे यांनी निवडणूक हरली नाही. त्यांना शिवसेनाप्रमुखानी मुंबईचा महापौर होण्याची देखील संधी दिली. तिथल्या कार्यकाळात देखील त्यांनी आपली छाप सोडली.

पुढे १९९८ साली महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना भाजप युतीच सरकार आलं तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. दत्ताजी नलावडे यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

त्यांनी याकाळातली आठवण विधिमंडळ स्मृतिचित्रे या पुस्तकात सांगितली आहे.

दत्ताजी सांगतात, पहिल्या सहा महिन्यांत माझ्या असे लक्षात आले की टोकावरचे बहुमत असल्याने विरोधक जरा जादाच आक्रमक आहेत. माझ्या स्वभावाला मुरड घालून मला अनेक वेळा कठोरपणे विरोधकांच्या अवैधानिक कृत्यांना थोपवावे लागले.

१९९८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते. श्रीकृष्ण अहवालाचा प्रश्न तापला होता. या प्रश्नावर विशेषतः समाजवादी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सभागृहात गोंधळ घालून त्यांनी विधानभवन दणाणून सोडलं. त्यावेळी परिस्थितीचे भान त्यांना देताना दत्ताजीना कडक भाषेत सुनवावे लागले होते.

ते समाजवादी आमदारांना म्हणाले,

तुम्ही काय म्हणता, ते तुम्हांला तरी कळले पाहिजे. असले वर्तन करण्याचा परिणाम सभागृहाबाहेर किती भयानक होईल याची आपणाला जाणीव असायला पाहिजे.

पहिल्या वर्षातच दत्ताजींच्या असे लक्षात आले की इलेक्ट्रॉनिक मीडियाला विधिमंडळाच्या आवारातही प्रवेश नव्हता. विविध चॅनेल्सचे प्रतिनिधी, कॅमेरामन विधिमंडळाच्या कंपाऊंडच्या बाहेर राहून वृत्तसंकलनाचे काम करीत असत. इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तर घराघरात पोहोचला होता, त्याला विधिमंडळाच्या कामकाजापासून दूर कसे ठेवता येईल ? म्हणून त्यांनी विधिमंडळाचे अधिकारी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांची एक बैठक घेतली आणि मीडियाला विधिमंडळाच्या आवारात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.

आता तेव्हाही आणि आजही गोंधळ आणि काहीतरी चटपटीत घडलं की प्रसारमाध्यमे त्याला ठळक प्रसिद्धी देतात. त्यात काही आमदारांचे अभ्यासपूर्ण भाषण, सूचना यांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच वर्षभरातील आमदारांचे उत्कृष्ट काम यासाठी उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण असे दोन पुरस्कार सुरू करण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त बसावी हा मागचा सुप्त हेतू होता.

याचा परिणाम आमदारांमध्ये हे पुरस्कार मिळवण्यासाठी चढाओढ लागली. आणि महाराष्ट्राच विधिमंडळ अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजयला लागलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.