सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा मोदींनी नाही तर यशवंतरावांनी पाडलाय

दिवाळीचा सण म्हंटल कि, पहाटे उठून अभ्यंगस्नानाची तयारी आपण करत असतो. पण तिकडे दूर जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर बंदूक हातात घेऊन अन् डोळ्यांत तेल घालून सैनिक दक्ष असतात. त्यांच्या लेकी सुनांच्या डोळ्यांत आपले नवरे सणासुदीला परतण्याची आस दिसत असते, रांगोळ्या-पणत्या, अंगणात आकाशदिवा सगळे काही असते. पण सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या आठवणीतच त्यांची दिवाळी साजरी होते.

किंबहुना प्रत्येक सैनिकाची सुद्धा दिवाळी अशाच आठवणी आणि आस या हिंदोळ्यावर झुलत साजरी होत असते.

अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढवावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. पण थोडं माग वळून पाहिलं तर समजत एकटेच नाहीत ज्यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केलीय.

१९६२ मध्ये एक अवलिया होता, ज्याने सैनिकांच मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली होती. हा अवलिया म्हणजे भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण. 

भारत आणि चीनमध्ये २० ऑक्टोबर १९६२ रोजी युद्ध सुरू झालं. जवळपास महिनाभर युद्ध सुरू होतं. या युद्धात चीनच्या तुलनेत भारताचं नुकसान मोठं होतं. भारताच्या १ हजार ३८३ जवानांना युद्धात वीरमरण आलं. भारताचे १ हजार ६९६ जवान बेपत्ता झाले. तर १ हजार ४७ जवान पकडले गेले. भारताचा जवळपास ४५ हजार चौरस किमी भाग चीनच्या ताब्यात गेला. 

सीमावादातून पेटलेले हे युद्ध जवळजवळ महिनाभर चालल होत. अचानक २० नोव्‍हेंबरला चीनच्या लष्कराने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली होती. चीन तेव्हाही शक्तिशालीच होते. ते पूर्ण तयारीने युद्ध भूमीत उतरले होते. त्‍या तुलनेत भारतीय जवानांकडे शस्त्रास्त्रे तर सोडा त्यांच्याकडे अंगावर घालण्यासाठी उबदार कपडेही नव्हेत. त्यात सरावाचा अभाव. 

परिणामी भारताला या युद्धात पराभव पत्‍करावा लागला होता. तेव्‍हा राजकारणी व सनदी अधिकारी हे जवानांच्या समस्या किंवा त्‍यांच्‍या ज्ञान- तंत्रज्ञानाचा फार विचार करत नसत. या अज्ञानामुळे ते राजकीय निर्णय घेताना जवानांना विचारात घेत नसत. त्यामुळेच या सीमावादाच्या युद्धात भारताला पराभव स्‍विकारावा लागला होता.

हि परिस्थिती भारतासाठी अपमानास्पद होती. 

त्यावेळची राजकीय परिस्थितीही अस्थिर होती. निर्णय क्षमतेचा अभाव जाणवत होता. चीनने कुरापती काढल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री श्रीकृष्ण मेनन यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता. नवे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येणार होती. 

तेव्हा पंतप्रधान असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले कऱ्हाडच्या सुपुत्राला संरक्षणमंत्री म्हणून बोलावले. हाकेला साथ देत चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून कामाला लागले. चीन करत असणारी आगेकुच आणि रोज मिळणारी वाईट बातमी या पार्श्वभूमीतच त्यांचा शपथविधी होणार असल्याने म्हणावं अस आनंदाच वातावरण नव्हतं. पराभवाची कारण मिमांसा शोधली. त्रुटींचा आढावा घेतला. अन् सैन्य दलाच्या पुनर्गठणानंतर सक्षम संरक्षणदल उभे करण्याचे काम केले. 

अशा वाईट काळात दिवाळी आली होती. सैनिकांना आपल्या घराकडची ओढ लागू नये, त्यांचं मनोबल वाढावं, आपल्यातलंच कोणीतरी आपल्या सोबत आहे असं त्यानं वाटावं म्हणून यशवंतरावांनी ती दिवाळी सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. 

आणि नंतर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पडतच गेला. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.