८१ वर्षांपूर्वी जेआरडी टाटांनी शिक्षणासाठी मदत केली तो विद्यार्थी पुढे राष्ट्रपती झाला
जमशेदजी नौशेरवानजी टाटा अर्थात जे एन टाटा यांनी स्थापन केलेला टाटा ग्रुप हा जगातील नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे. मिठापासून ते भल्या मोठ्या ट्रकपर्यंत निर्मिती करणारी, विज कंपनीपासून ते आशियातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी साठी प्रसिद्ध असलेला टाटा समूह आपल्या दान- धर्मासाठी ओळखला जातो. जमशेदजी टाटांपासून चालत आलेली हि परंपरा सध्याच्या रतन टाटा यांनी देखील चालवली आहे.
या परंपरेतील सर्वात मोठं नाव म्हणजे जे.आर.डी टाटा.
एअर इंडियाची स्थापना करणाऱ्या जे आर डी टाटा यांना स्वतःला इंजिनियर व्हायचं होतं मात्र त्यांना ते करणं जमलं नाही. त्यांचा शिक्षणाकडे विशेष ओढा होता. महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे टाटा उद्योगसमूह हा जनतेच्या ट्रस्ट प्रमाणे ते चालवायचे. विशेषतः शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याकडे त्यांचा प्रयत्न असायचा.
असेच एकदा त्यांची भेट केरळमधल्या एका हुशार होतकरू मुलाशी झाली. त्याच नाव कोच्चेरील रामन नारायण उर्फ के.आर. नारायण
त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर, 1920 रोजी केरळमधील पेरुमथॉनम उझावूर, त्रावणकोर या छोट्या गावात एका दलित कुटूंबात झाला. त्यांचे वडील एक आयुर्वेदिक वैद्य होते. नारायणन हे लहानपणापासून प्रचंड हुशार होते.
बऱ्याचदा फी दयायला पैसे नसल्यामुळे शाळेच्या खिडकीबाहेर उभं राहून ते क्लासेस अटेंण्ड करायचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असूनही त्यांनी आपलं शिक्षण मेहनतीने पूर्ण केलं.
त्रावणकोर विद्यापीठातून एमए ची डिग्री पूर्ण केली. पुढे शिकायची इच्छा होती पण घर चालावं म्हणून ते नोकरीला लागले. नारायणन यांनी 1944-45 मध्ये ‘द हिंदू’ आणि ‘द टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्रकार म्हणून देखील काम केले.
जेव्हा हुशार आणि तरूण नारायणन यांनी त्रावणकोर विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा त्यांच स्वप्न होत की नोकरी करून थोडे पैसे साठवायचे आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जायचे. पण कुटुंबाच्या आर्थिक ओढतानीमुळे हे तर स्वप्नच कधी पूर्ण होईल असं वाटत नव्हतं.
अशातच एक दिवस त्यांना टाटा हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात हे कळलं. मनाचा हिय्या करून त्यांनी थेट जे.आर.डी. टाटा यांना पत्र लिहिलं व आपली इंग्लंडला शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाण्याची इच्छा आहे व त्यासाठी मदत करावी ही विनंती केली.
टाटांनी त्यांची भेट घेतली. हा तरुण खरोखर गरजू आहे आणि दिलेल्या मदतीच्या जोरावर तो खरंच काही करून दाखवेल याची त्यांना खात्री पटली.
जेआरडी टाटा यांनी एन्डॉयमेंटला पत्र लिहून त्यांना १६ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली आणि १००० रूपये स्वतंत्रपणे कर्ज म्हणून घेऊन दिले. त्यांच्या मदतीनंतर के.आर. नारायणन इंग्लंडला गेले आणि जगप्रसिद्ध अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले.
या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये देखील नाव कमावलं. त्यांच्या प्रतिभेची लंडनमधल्या अर्थ शास्त्रींच्या वर्तुळात चर्चा होती. नारायणन यांनी लंडन मधील वास्तव्यात भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या इंडिया लीग या चळवळीत देखील काम केलं.
पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारतात आले आणि 1949 मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले.
पुढे त्यांची हुशारी व अभ्यास पाहून इंदिरा गांधी यांनी के.आर. नारायणन यांना राजकारणात आणलं. सलग तीन लोकसभा निवडणुकीत ओटप्पल (केरळ) ची जागा जिंकून ते लोकसभेत पोहोचले. कॉंग्रेसचे खासदार झाल्यानंतर त्यांचा राजीव गांधी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. मंत्री असताना त्यांनी नियोजन, परराष्ट्र व्यवहार व विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांचा कार्यभार सांभाळला.
आणि 1992 मध्ये ते भारताच्या उपराष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसले. 1997 मध्ये त्यांना देशाचे राष्ट्रपती करण्यात आले.
दलित कुटुंबातून आलेले पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आपली विद्वात्ता आणि भारतीय राजकारणाचा संविधानाचा सखोल अभ्यास यामुळे राष्ट्रपती पदाचा गौरव त्यांनी आणखी वाढवला.
के आर नारायणन यांनी अनेक पुस्तकं लिहिली, ज्यात ‘इंडिया अँड अमेरिका अॅसेस इन अंडरस्टँडिमग’, ‘इमेजेस अँड आणि इनसाइज’ आणि ‘नॉन अलायमेंट इन कंटेंम्परी इंटरनॅशनल रिलेशन्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले.
1998 मध्ये, त्यांना न्यूयॉर्कमधील द अपील ऑफ कॉन्सेन्स फाउंडेशनने ‘वर्ल्ड स्टेट्समॅन अवॉर्ड’ ने सन्मानित केले. अमेरिकेच्या टोलेडो युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ आणि ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉस’ हा पुरस्कार जाहीर केला. तसेच, त्यांना तुर्की विद्यापीठ आणि सॅन कार्लोस विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेटची पदवी दिली.
असा हा दिग्गज राष्ट्रपती , एक गरीब कुटूंबातून येऊन त्यांनी हे सगळं यश आपल्या आपल्या कर्तृत्वाव तर कमावलंच पण त्यांच्या या कार्यात जे आर डी टाटांनी सुरवातीला केलेली शिक्षणासाठीची मदत ही कळत नकळत पणे अतिशय महत्वाचे ठरली.
हे ही वाच भिडू.
- जेआरडी टाटांनी देखील भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला होता.
- टाटांच्या सक्सेस स्टोरीची सुरवात मुंबईत नाही तर नागपूर मध्ये झाली..
- राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्र्पतींचेही प्राण पणाला लागले होते..