२० वर्ष खोऱ्यानं कमावलं.. निवृत्तीनंतर पाटीनं दान करतायत जॅक मा.

१० सप्टेंबर २०१८ रोजी जगातील सर्वात मोठ्या इ-कॉमर्स वेससाईट ‘अलीबाबा’चे संस्थापक अध्यक्ष जॅक मा निवृत्त झाले. त्यादिवशी ते अवघे ५५ वर्षांचे होते आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आजच्या तारखेनुसार त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू साधारण ४२०.८ अरब डॉलर(३०,२८४ अरब रुपये) इतकी आहे.

उण्या-पुऱ्या २० वर्षापुर्वी त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून आणि कर्ज घेवून या कंपनीची स्थापना केली होती. जॅक यांचा ही कंपनी सुरु करण्याचा प्रवास कोणालाही थक्क करणारा असाच आहे.

अशी झाली होती सुरुवात….

शिक्षण घेताना चीनमध्ये पदवीला प्रवेश मिळण्यासाठी सामाईक परिक्षा द्यावी लागते. मात्र या परिक्षेत ते दोन वेळा नापास झाले. मात्र तिसऱ्या वर्षी पास झाले आणि १९८८ मध्ये इंग्रजी विषयात बॅचलर ऑफ आर्टस् ही पदवी मिळवली.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नोकरी केली. इथेच त्यांना शिक्षकी पेशाची आवड लागली. मात्र खर्च भागवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. पण ३० वेळा प्रयत्न करुनही प्रत्येक वेळी तो प्रयत्न फसला.

केएफसीमध्ये तर २४ जणांनी नोकरीसाठी अर्ज केला होता, त्यातल्या २३ ज्यांना नोकरी मिळाली, पण एकट्या जॅकला ही नोकरी नाकारली गेली.

अशी अपयशे पचवत असतानाच एका महामार्ग बनवण्याच्या कामानिमित्त जॅक मा १९९५ मध्ये अमेरिकेला गेले आणि तिथेच त्यांची ‘कॉम्प्युटर्स आणि इंटरनेटʼ शी ओळख झाली.

इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर जॅक मा यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि इंटरनेटशी संबंधित काही नवीन करण्याचा निश्चय केला. जॅक सांगतात की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा कि-बोर्डला स्पर्श केला तेव्हा मला असं वाटलं की, ही गोष्ट जग आणि चीनला बदलवू शकते’.

मग १९९५ च्या एप्रिलमध्ये जॅक आणि त्यांचा कॉम्पुटरचा शिक्षक असणारा मित्र ‘हे यिबिंग’ यांनी मिळून ‘चायना पेजेस’ च पाहिलं ऑफिस सुरु केलं.  १० मे १९९५ ला अमेरिकेमध्ये त्यांनी chinapages.com नावाने डोमेन घेतले. पुढे तीन वर्षातच चायना पेजेसने ५० लाख चायनीज युआन म्हणजे त्यावेळचे ८ लाख अमेरिकी डॉलर कमावले.

१९९८ मध्ये चीनच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन ट्रेड अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशनच्या, चीन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सेंटर या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. एक वर्षभर त्यांनी हे काम पाहिले.

सन १९९९ मध्ये हे काम सोडून ते आपल्या गावी परत आले.

अलीबाबाची स्थापना –

इंटरनेटच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांकडून वस्तू ऑनलाईन विकत घेणे आणि विकणे याचे महत्त्व त्यांनी ओळखले होते.

यासाठी त्यांनी मित्रांकडून ६० हजार डॉलर(४३ लाख रुपये)चे कर्ज घेतले. १७ आणखी लोकांना सोबत घेत चीनच्या झेजियांगच्या ह्यंगझूमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्ये अलीबाबाची सुरुवात केली.

सुरुवातीला बाहेरच्या गुंतवणूकदरांनी यामध्ये एकही छदाम दिला नाही. परंतु अलीबाबाच्या उज्वल भवितव्याबद्दल त्यांना खात्री होती. कदाचित म्हणूनच त्यांनी पहिली मिटींग रेकॉर्ड करुन ठेवली होती. पुढे सॉफ्ट बँकेकडून २० दशलक्ष डॉलर्स आणि गोल्डमन सच्सकडून ५ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक म्हणून मिळवले.

२१ वे शतक हा इंटरनेटचा जमाना ठरणार होता. आणि नेमकी त्याच पायरीवर अलीबाबाची सुरुवात झाली होती. त्यामुळे इंटरनेटच्या विस्तारासोबतच अलीबाबाने देखील वेगाने यश मिळवले. आधी चीनच्या बाहेर आशियाई देशांमध्ये अलीबाबाची सेवा चालू केली.

पुढे आशिया देशांच्या बाहेर जात जवळपास २४० देशांमध्ये आपले हातपाय पसरवले. पण खरा जम बसला तो चीनमध्येच. अॅमेझॉनने आपला व्यवसाय चीनमध्येही विस्तारित केला. परंतु, जॅक मा यांच्या अलिबाबाचा असा दबदबा निर्माण झाला होता की त्यासमोर ॲमेझॉनचा टिकाव लागला नाही. ॲमेझॉनने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.

अवघ्या दोन दशकातच त्यांची कंपनी जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणली जाऊ लागली. २०१४ मध्ये अलिबाबा ही २५ शतकोटी डॉलर्स घेऊन ‘न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज’मध्ये आयपीओ (IPO) ही सर्वांत मोठी आयपीओ म्हणून नोंदवली गेल्यानंतर अलीबाबा ही तांत्रिक क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी बनली.

एकेकाळी स्वतःच्या कंपनीसाठी गुंतवणूकदार मिळावेत म्हणून फिरणारे जॅक यांनी अलिएक्सप्रेस.काॅम, यूसी ब्राउझर, अलिपे, अलिबाबा क्लाउड, अलिबाबा पिक्चर्स, यूसी न्यूज या शिवाय चीन तसेच विदेशातील अनेक कंपन्यांनी अलिबाबा समुहामध्ये गुंतवणूक केलेली आहे. भारतात पेटीएम, स्नॅपडिल, बिग बास्केट, झाेमॅटो सारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली.

अशा पद्धतीने विविध मार्गाने अलीबाबने २० वर्षात अमाप पैसा कमावला. सध्या त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू साधारण ४२०.८ अरब डॉलर(३०, २८४ अरब रुपये) इतकी आहे.

अशा या यशाच्या टप्प्यावर असतानाच त्यांनी कंपनीतून अचानक ‘एक्झिट’ जाहीर केली. ‘तुम्ही तुमच्या विशीतील आयुष्य शिकण्यासाठी घालवा, तिशी-चाळीशीमध्ये धोके स्वीकारा आणि पन्नाशीनंतर ज्या गोष्टी उत्तम साधतात, त्या गोष्टींसाठी जगा,’ हा सल्ला ते नेहमी द्यायचे.

त्यानुसार जॅक मा यांनी रिटायरमेंटसाठी खास दिवस निवडला. १० सप्टेंबर २०१८ ला वयाची ५५ वर्ष पुर्ण केल्यानंतर वाढदिवसा दिवशीच त्यांनी निवृत्तीची घोषणा केली.

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, “खरतर हा शेवट नाही. ही एक नवी सुरुवात आहे. मी कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पण एक गोष्ट करू शकतो. मी लवकर निवृत्त होऊ शकतो आणि पुन्हा शिकवण्याकडे जाऊ शकतो. मला वाटते अलीबाबा या कंपनीचा सीईओपेक्षाही मी हे काम चांगलं करू शकतो.

यानुसार निवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचे ठरवले. कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर चीन आणि जगभरात शिक्षणाचा अधिक प्रसार करण्यासाठी २०१८ मध्ये त्यांनी जॅक मा चैरिटी फाउंडेशन सुरू केले.

सुरुवातीला या फाऊंडेशनने आफ्रिकेमधील नवीन उद्योगांमध्ये अर्थात स्टार्टअप्समध्ये प्रोत्साहनपर गुंतवणूक करण्यास सुरु केली आहे. प्रतिवर्षी १ दशलक्ष डॉलचर्सचा प्रत्येकी एक असे १० प्राईझ सुरु केले.

२०२०मध्ये पर्यावरणीय समस्यांवरील उपायांसाठी Prince William’s Earthshot प्राईझ सुरु केले. तर तिबेटमधील शिक्षणाच्या विकासासाठी १४.६ दशलक्ष डॉलर्स निधीची तरतुद केली गेली.

पुढे कोरोना काळामुळे शिक्षणाचे काम थांबले असताना त्यांनी या चैरिटीचा निधी कोरोनासाठी वापरण्याचे ठरवले. आणि त्यानुसार कोरोनव्हायरसशी लढण्यासाठी १४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास शंभर कोटी रुपये दान केले.

कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ हे पैसे खर्च करतील. जॅक मा फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, हा निधी चीनी सरकारच्या दोन संशोधन संस्थांना देण्यात आला आहे. याशिवाय हे पैसे उपचारांवरही खर्च केले जातील.

मार्च २०१९ मध्ये जॅक मा फाऊंडेशनने भारतासह सहा देशांमध्ये मेडिकलचे साहित्य दिले होते. यामध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार कोरोनाचे टेस्टिंग किट, १० लाख ७० हजार मास्क, पीपीई किट आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश होता.

२००९ मध्ये जॅक मा यांना The Nature Conservancy’s China program चे विश्वस्त म्हणून नियुक्त केले होते. २०१० याच ठिकाणी त्यांना संचालक करण्यात आले होते. आता ते याचे ही काम करत आहेत.

जॅक मा चीनमध्ये खूप मानतात. अगदी काही घरात त्यांच्या फोटोची पुजा करत असल्याचे देखील फोटो बाहेर येतात. ते केवळ पैसे वाटतात म्हणून नाही तर चीनमधील तरुणांनासाठी ते प्रेरणास्रोत आहेत.

तर बालकांमध्ये त्यांची ओळख शिक्षक म्हणून आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी चीनमध्ये राष्ट्रीय सुट्टी असते आणि याच दिवशी चीनमध्ये शिक्षक दिनही साजरा केला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.