३०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या जाधवगडाचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर आघाडीच्या काळात झालं होतं.

कालच्या वर्तमानपत्रात बातमी आली की राज्यमंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील २५ किल्ले खाजगी विकसकांना हेरिटेज हॉटेल,  वेडिंग डेस्टीनेशन, एंटरटेनमेंट इव्हेंट्स इत्यादी करता ६० ते ९० वर्षाच्या भाडेपट्टीवर चालवण्यासाठी देण्यास परवानगी दिली आहे. ही बातमी आली तसे फडणवीस सरकारवर टीकांचे सत्र सुरु झाले.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांना भाड्याने कसे देता येईल यावरून चालू असलेल्या टिकेला सरकारकडून स्पष्टीकरण आले की किल्ल्यांचे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ असे प्रकार करण्यात आले आहेत, ज्या किल्ल्यांचा इतिहास मोठा आहे असे किल्ले वर्ग १ मध्ये व कमी महत्वाचे किल्ले वर्ग २ व त्या खालोखाल वर्ग ३ मध्ये असून या योजनेमध्ये वर्ग १ च्या किल्ल्यांचा समावेश केला जाणार नाही. 

सोशल मिडीयावर काल दिवसभर याच विषयावर चर्चा रंगली. अशातच सरकारच्या बाजूनी बोलणाऱ्यांनी जाधवगडचा विषय समोर आणला. ३०० वर्ष इतिहास असलेल्या जाधवगडाचं रुपांतर २००७साली महाराष्ट्रातील पहिलं हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आलं, उद्घाटन तेव्हाचे कृषीमंत्री शरद पवार यांनी केलं होतं. मग तेव्हा किल्ल्याच्या इतिहासाची आस्था नव्हती का?  असा खडा सवाल विरोधकांना करण्यात येत होता.

काय आहे जाधवगडाचा इतिहास?

पुण्याहून सासवडला जाताना जाधववाडीनावाचे एक छोटेसे गाव आहे तिथेच आहे हा जाधव गड. सुमारे तीनशे वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज गादीवर आले तेव्हा मराठा साम्राज्याचे कोल्हापूर आणि सातारा संस्थान असे दोन छकले झाली. सातारामध्ये शाहू महाराजांच्या छत्राखाली जे सरदार गोळा झाले त्यात पिलाजीराव जाधवराव यांचा समावेश होता.

सासवड हे शाहू महाराजांचे प्रमुख ठाणे होते. त्यांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ सासवडमधूनचं राज्यकारभार सांभाळत होते. सासवडजवळच सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचं जाधववाडी गाव होतं. जाधवराव हे स्वराज्याचे आधारस्तंभ आणि शाहू महाराजांचे प्रमुख सरदार होते. त्यांची वंशावळ पाहता थेट जिजामातांचे पिता लखुजीराव जाधवांशी त्यांच नात सांगता येईल. सासवड परिसरात त्यांची जहागीर होती. या जहागिरीवर लक्ष राहावे यासाठी त्यांनी जाधववाडीमध्ये एका प्रचंड गढी बांधली होती, तोच हा जाधवगड.

जाधवगड एखाद्या छोट्याशा किल्ल्याप्रमाणेआहे, बाहेरून तटबंदी व भव्य दिंडी दरवाजा देखील आहे. आसपासच्या परिसरात ही देखणी वस्तू प्रचंड प्रसिद्ध आहे.  माजी मंत्री दादा जाधवराव (जनतादल) यांच्या मालकीच राहत घर.

२००५ साली या गढीला आग लागून प्रचंड नुकसान झाले. त्यावेळी पेपरमध्ये आलेली बातमी वाचून तेव्हा मुंबईमधील सुप्रसिध्द ऑर्किड या पंचतारांकित हॉटेलचे मालक व इडली ऑर्किड व मी या पुस्तकाचे लेखक विठ्ठल कामत यांनी जाधव कुटुंबाशी संपर्क केला आणि हेरिटेज हॉटेलची संकल्पना समजावून सांगितली.

सध्या जगभर हेरिटेज हॉटेल, हेरिटेज वेडिंग डेस्टीनेशन यांची टूम निघालेली आहे. युरोपात जुन्या गढ्या यादृष्टीने विकसित केल्या. त्यांची लोकप्रियता पाहता भारतातही राजस्थानमधील अनेक संस्थानिकांनी आपले राजवाडे हॉटेलमध्ये बदलून टाकले. जगभरातील अतिश्रीमंत लोक ऐतिहासिक काळातील राजेशाही थाट अनुभवण्यासाठी, त्याच ऐटीत आपलं लग्न करण्यासाठी प्रचंड पैसे मोजून या हेरिटेज हॉटेल मध्ये येतात.

विठ्ठल कामत यांनी जाधवगढीचे हेरिटेज हॉटेलमध्ये राहणायचा प्रस्ताव मांडला. जाधवराव कुटुंबीयांनी आपली संस्कृती, आपला इतिहास नव्या पिढीला समजेल या हेतूने आपलं राहतं घर विठ्ठल कामत यांना हॉटेलसाठी दिलं. या व्यवहारात शासनाचा कोणताही हस्तक्षेप असण्याच कारण नव्हतं. 

थोड्याच दिवसात या वाड्याचं एका अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं. २५ एकर परिसरात पसरलेल्या या हॉटेलमध्ये मराठेशाही वारसाचं जतन करण्यात आलं असून त्या काळातील राहणीमानाचा अनुभव घेता येतो. याशिवाय स्विमिंग टँक, स्पा अशा आधुनिक सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. याबरोबरच विठ्ठल कामत यांच्या संकल्पनेतून साकारलेल आई हे संग्रहालय देखील पर्यटकांना विशेष आकर्षित करून घेते.

काही वर्षापूर्वी याच जाधवगडच्या धरतीवर शासनाच्या ताब्यातील किल्ल्यांना हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्याचा विषय समोर आला होता तेव्हा एका वृत्तसंस्थेशी बोलताना  बाबाराजे जाधवराव, संस्थानिक तथा जाधवगड रिसॉर्टचे मालक यांनी सांगितलं की,

“राज्यातील किल्ल्यांचा पर्यटनासाठी वापर तसा करता येणार नाही, कारण या वास्तू पुरातन असून पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहेत. जाधवगड हे आमचे घर होते. ते आमच्या खासगी मालकीचे आहे. जाधव कुटुंबातील आमची १३ वी पिढी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा काय आहे, हे समजण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे. बरेच पर्यटक याकडे आकर्षित होतात. संस्कृती टिकावी तसेच ती वृद्घिंगत व्हावी, असे मला वाटते.”

विषय राहतो शरद पवारांनी या हॉटेलचं उद्घाटन केलं होतं का? तर जाधवगडच्या हॉटेलशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दलची माहिती सांगितली नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.