मोदींच्या विजयापेक्षा याचा विजय कॉंग्रेसला जास्त चटका लावणारा आहे.

बरोबर १५ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. कॉंग्रेसने आश्चर्यकारकरित्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला हरवून सत्ता मिळवली होती. सोनिया गांधी यांचे अध्यक्ष म्हणून कौतुक करण्यात आले होते. पण या यशाचा शिल्पकार कोणी तरी वेगळाच होता.

त्याचे नाव होते आंध्रप्रदेशचे वाय एस आर रेड्डी.

वाय एस आर रेड्डी म्हणजे कॉंग्रेसचा आंध्र मधला लोकनेता. तेव्हा आंध्र मध्ये चंद्राबाबू नायडू यांचं सरकार होतं. या सरकारने हैद्राबादचा आयटी सिटी मध्ये कायापालट केला होता. एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस प्रमाणे चंद्राबाबू सरकार चालवयाचे. विकास तर झाला पण सरकारचा आणि ग्रामीण जनतेचा कनेक्ट तुटला. याचाचं फायदा घेतला वायएसआर यांनी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यभर पदयात्रा काढली. याच पदयात्रे मुळे वाय एस आर रेड्डीनी जनतेला जिंकले. चंद्राबाबूच्या लपटॉप सरकारला विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकीत त्यांनी पराभूत केलं आणि ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 

48910615 2101868919833564 2875461861434720256 n

केंद्रात आंध्रप्रदेश मधून कॉंग्रेसचे २००४साली २९ आणि २००९ साली ३३ खासदार निवडून आले होते. कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण दुर्दैवाने २००९ साली वायएस आर रेड्डी यांचा अपघाती मृत्यू झाला. लाखो करोडो तेलगु जनतेला धक्का बसला होता. असं म्हणतात की या धक्क्यात अनेकांनी आत्महत्या केली. पण सर्वात मोठ्ठ नुकसान कॉंग्रेस पक्षाचे झाले होते.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यावे हा प्रश्न सोनिया गांधी यांच्या दरबारात मांडला गेला. वायएसआर यांचे खासदार चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांनी आपला दावा सांगितला. पण सोनियाजींच्या सल्लागारांनी त्यांना सल्ला दिला की जगनमोहन अजून अननुभवी आहेत त्यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे पक्षावर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपावर शिक्कामोर्तब करणे . त्यामुळे के.रोसय्या यांना खुर्चीवर बसवण्यात आले. जगनमोहन रेड्डी यांनी ही गोष्ट पर्सनली घेतली. लाखो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडला. वायएसआर कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.

ही आंध्रप्रदेश मध्ये कॉंग्रेसने केलेली आत्महत्या होती.

जगनमोहन रेड्डी यांच्यावर सुडाचे राजकारण करण्यात आले. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. पण जगनमोहन रेड्डीनी पक्ष सोडल्यामुळे झालेल्या नुकसानातून कॉंग्रेस बाहेर पडू शकली नाही.  आंध्रच्या राजकारणामधून कॉंग्रेस हळूहळू बाहेर फेकली जात होती. याच दबावातून त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या चंद्रशेखर राव यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आंध्रप्रदेशचे विभाजन केले. पण या खेळीतही कॉंग्रेस फसली. हातातून तेलंगणाही गेले आणि आंध्रप्रदेशही गेले. चंद्रशेखर राव यांनी वचन दिल्याप्रमाणे आपला पक्षा कॉंग्रेसमध्ये विलीन केला नाही.

२०१४ ची निवडणूक आली. मोदींची लाट होती. आंध्रमध्ये भाजपचा सहयोगी पक्ष असलेला तेलगु देसम पार्टीने कॉंग्रेसचा पराभव केला. विधानसभेतही चंद्राबाबू नायडू परत मुख्यमंत्रीपदी आले.

जगनमोहन रेड्डी काय करत होते?

नवा पक्ष काढलेले जगनमोहन रेड्डीनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबुना चांगली लढत दिली होती. आंध्र प्रदेशचं विभाजन होऊ नये म्हणून उपोषण करणारे जगनमोहन जनतेच्या लक्षात राहिले होते. त्यांनी चंद्राबाबूंच्या राज्यकारभाराविरुद्ध धुरळा उडवायला सुरवात केली. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी राज्यभर पदयात्रा काढली.

आंध्रप्रदेशचा कानाकोपरा जगनमोहन रेड्डी यांनी ढवळून काढला. लोकांच्या मनात वाय एस आर रेड्डीनी २००४ साली काढलेल्या पदयात्रेची आठवण आली. उनवाऱ्यात छोट्या छोट्या गावात फिरणाऱ्या जगनमोहन रेड्डीमध्ये त्याच्या वडिलांची प्रतिमा पाहिली जात होती. ग्रामीण जनता त्याच्या पाठीशी उभी राहू लागली. या त्यांच्या इमेजच्या मेक ओव्हर मागे होते मोदीना जिंकून देणारे प्रशांत किशोर.

47395126 2066582713362185 100099873600176128 n

जगनमोहन रेड्डी यांच्या या पद्यात्रांचा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धसका घेतला. मोदी सरकारने आंध्रला स्पेशल स्टेटचे आश्वासन दिले होते पण ते पूर्ण केले नाही या विषयावरून आंध्र मध्ये मोठा असंतोष होता. मोदीं विरोधाची स्पेस जगनमोहन घेउ नये म्हणून चंद्राबाबुनी भाजपची साथ सोडली.

आज २०१९ च्या लोकसभा आणि आंध्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. पूर्ण देशभर मोदींची लाट त्सुनामी बनली आहे. पण फक्त आंध्रप्रदेशमध्ये मोदींची जादू चालू शकली नाही. तिथे लाट होती जगनमोहन यांची. भाजपा, कॉंग्रेस, तेलगु देसम पार्टी या सगळ्यांशी एकत्र लढूनही हा नेता विजयी ठरला.

मतमोजणी पूर्ण झाल्यावर फायनल चित्र स्पष्ट होईल पण आतापर्यंत आंध्रमध्ये वायएसआर कॉंग्रेसचे २२ खासदार आणि विधानसभेत १७५ पैकी जवळपास १४९ आमदार आघाडीवर आहेत. जगनमोहन मुख्यमंत्री पदी बसणार हे नक्की आहे. आपल्या वडिलाप्रमाणे त्यांनी चंद्राबाबू नायडूना सत्तेतून बाहेर फेकलंय.

पण आज  चंद्राबाबुंपेक्षा सर्वात जास्त दुख्खी कॉंग्रेसवाले असतील. त्यांना केंद्रात नेहमी सत्तेत आणणाऱ्या आंध्रमध्ये औषधाला ही पक्ष उरलेला नाही. फक्त आंध्रचं नाही पूर्ण देशभर कॉंग्रेसकडे वायएसआर यांच्या सारख्या जनतेची नस पकडणाऱ्या नेत्याची कमी आहे. ती जागा जगनमोहन रेड्डी यांनी घेतली असती. मोदीना हरवता येऊ शकत हा आत्मविश्वास फक्त याच युवा नेत्याकडे आहे आणि त्याने ते खरं देखील करून दाखवलंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.