रक्तचंदन सोडा ओ, या वृक्षाचं लाकूड न मिळण्याचा फटका जगन्नाथ स्वामींच्या यात्रेला बसतोय

यावर्षी लाकूड असा शब्द जरी ऐकला तर पुष्पा चित्रपट सगळ्यांना आठवतोय. रक्तचंदन लाकडाची तस्करी करण्यावर हा संपूर्ण चित्रपट दाखवण्यात आला आहे. आता या लाकडाची तस्करी करण्याची गरज यासाठी भासते कारण रक्तचंदन हे असं झाड आहे जे दुर्मिळ होत चाललंय. म्हणून त्याचं संवर्धन करण्यासाठी त्याला तोडण्यास शासनाची मनाई आहे. मात्र यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असल्याने त्याची तस्करी केली जाते.

आता हे इथे आठवण्याचं कारण म्हणजे असंच अजून एक झाड आहे जे सध्या दुर्मिळ होत चाललं आहे. आणि याचा फटका जगन्नाथ स्वामींच्या यात्रेला बसतोय. झालंय असं की, जगन्नाथ स्वामींच रथ बनवण्यास जे विशेष लाकूड वापरलं जातं ते यंदा मिळालंच नाहीये. 

पुरीची जगन्नाथ यात्रा जगभरात प्रसिध्द आहे. ही यात्रा नऊ दिवस चालते आणि देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक या यात्रेला हजेरी लावतात. रथयात्रेचा हा सोहळा शेकडो वर्षांपासून साजरा केला जातो. 

या यात्रेचे रथ तयार करण्याची एक परंपरा आहे आणि त्यानुसार ते तयार केले जातात. पहिला रथ असतो जगन्नाथाचा, दुसरा सुभद्रेचा तर तिसरा असतो बलभद्र किंवा बलरामाचा. ३४ भागात हे रथ बनविले जातात आणि अनेक बाबतीत ते खास असतात. यातील एक खासियत म्हणजे रथ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं ‘लाकूड’.

या रथांसाठी जंगलातून लाकूड आणले जाते आणि ओडिसा सरकार हे लाकूड देते. वसंतपंचमी दिवशी हे लाकूड एकत्र आणले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. मग रामनवमीला ते कापले जातात. रथनिर्मितीची प्रक्रिया अक्षय तृतीयेपासून सुरु होते. स्थानिक मंदिरातील २०० कारागीर रथ तयार करण्यासाठी काम करतात. अगोदर मंदिरातील पुजारी कुऱ्हाडीचा लाकडाला स्पर्श करतात. लाकडाची साग्रसंगीत पूजा केली जाते. नंतर लाकडाचे लहानमोठे ४ हजार तुकडे केले जातात.

हे लाकूड ‘फासी’ आणि ‘धौरा’ या विशेष वृक्षांचे असते.

याच वृक्षांची नेमकी निवड का केली जाते, यामागेही मोठं कारण आहे. 

रथासाठी वापरण्यात येणाऱ्या झाडाचे खोड पेन्सिलसारखे सरळ असावे. ते ६ फूट रुंद आणि १२ ते १४ फूट उंच असावे. यापेक्षा कमी रुंदी असेल तर ते झाड वापरले जात नाही. हे सर्वगुण धौरा आणि फासी वृक्षांत असतात, म्हणून याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. धौरा हे झाड भारताव्यतिरिक्त नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका इथे आढळतं. तर फासीची झाडे महानदीच्या पूरग्रस्त भागात सहसा आढळतात. 

साधारण १८-२० फूट उंचीच्या या झाडाची पानं दाट असून देठाचा रंग पांढरा असतो, म्हणून त्याला धौरा म्हणतात. फासीच्या झाडाची रुंदी आणि उंचीही रथासाठी योग्य असते. 

या व्यतिरिक्त धौरा हे झाड अतिशय उपयुक्त असून यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जाळण्यासाठी सरपण म्हणून वापर होण्यासोबत, हे झाड भारतीय डिंकाचे मुख्य स्त्रोत आहे. यातून मिळणाऱ्या डिंकाला ‘घट्टि गम’ म्हणतात. हे कॅलिको प्रिंटिंगमध्ये वापरले जाते. एवढेच नाही तर त्याची पाने तसर रेशीम अळीलाही खायला दिली जातात, ज्यापासून उत्तम दर्जाचे रेशीम तयार केले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंतपंचमीला लाकडाची पूजा करण्यात आली मात्र यावेळी हे लाकूड जंगलातून आलेले नसून ते खासगी जमिनीतून घेतले आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या काही वर्षांत या वृक्षाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळेही यावेळी जगन्नाथ रथयात्रेसाठी उभारण्यात येणाऱ्या रथासाठी लाकूड उपलब्ध होऊ शकले नाही. 

यावर्षी ९९ टक्के धौरा आणि फासी लाकूड खाजगी जमीन मालकांकडून घेण्यात आले आहे. ते ओडिशातील नयागड आणि खोरदा जिल्ह्यातून कापले गेले.

जगन्नाथ रथाची चाकंं बनवण्यासाठी धौराच्या सुमारे ७२ लॉग किंवा देठांचा वापर केला जातो. मात्र वनविभागाच्या म्हणण्यानुसार, वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांत जंगलांना मोठा फटका बसला आहे. धौऱ्याच्या झाडाची रुंदी ६ फूट होण्यासाठी सुमारे ८० वर्षे लागतात, तर गेल्या दोन दशकांत हवामान बदलामुळे त्यांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. आता त्याची रुंदी गाठण्यासाठी सुमारे १०० वर्षे लागतील.

तर फासीच्या झाडाला परिपक्व होण्यासाठी सुमारे ५० ते ६० वर्षे लागतात. सध्या जंगलातील झाडे बाल्यावस्थेत असल्याने त्यांना तोडता येत नाही. याशिवाय, काही प्रौढ झाडं सोडणं देखील गरजेचं आहे कारण झाडं सापडण्यासाठी याचा उपयोग होतो.

म्हणून यंदा जगन्नाथ रथासाठी खासगी जागेतून झाडे घ्यावी लागली आहेत. वनविभाग यावर काम करत असून धौरा आणि फासीच्या झाडांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची लागवड आणि संगोपन केलं जात आहे. शिवाय फासी आणि धौर्‍यासारखी झाडे लावणे थोडे अवघड असल्याने सर्व खासगी जमीन मालकांना ते लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एक गोष्ट मात्र अशी की स्थानिकांनी आणि जगन्नाथ स्वामींच्या यात्रेसाठी कार्य करणाऱ्या सर्वांनी या गोष्टीचं महत्त्व जाणून घेत सरकारच्या निर्णयाला साथ दिली आहे. लाकूड उपलब्ध होण्याला महत्त्व देत त्यांनी जोमात रथयात्रेच्या तयारी सुरु केली आहे. म्हणून जगन्नाथ स्वामींच्या यात्रेत कोणताही खंड पडणार नाहीये.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.