छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनला कशी गेली ?

छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या ‘तीन तलवारी’ ज्ञात आहेत.

यातील एक तलवार आजच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असून, तिचे संवर्धन करण्याचे काम युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर यांनी केले आहे. ही तलवार शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आज एका काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवली आहे.

भवानी तलवारी विषयी तर महाराष्ट्रातील प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे आणि ‘भवानी’ च्या अस्तित्वाचा शोध अविरतपणे सर्वच संशोधक करत आहेत. शिवाजी महाराजांच्या आणखी एका तलवारीचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रात पाहायला मिळतो, तेही तिच्या नावासकट.

त्या तलवारीचे नाव आहे ‘जगदंबा तलवार’..

सध्या ही तलवार लंडन मध्ये आहे. ही तलवार २०२४ पर्यंत भारतात आणली जाणार आहे.  सास्कृंतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.

मात्र ही जगदंबा लंडनला गेली कशी? यामागेसुद्धा एक कहाणी आहे. ‘ऑक्टोबर 1875’ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला असता, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते.

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराणा म्हणून दिली. एक जुनी तलवार.. काहीशी नवीन काम करून, सुंदरपणे सजवून प्रिन्सला भेट देण्यात आली.

या चौथ्या शिवाजी महाराजांच्या अल्पवयाचा फायदा घेऊन प्रिन्सला ही भेट देण्यास प्रवृत्त करणारी व्यक्ती होती छत्रपतींचा दिवाण महादेव बर्वे.. या भारतभेटीदरम्यान ‘नजराणा’ म्हणून मिळालेल्या वस्तूंची एक यादी बनवण्यात आली आणि हा मौल्यवान वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉग पुढे ‘Catalogue of the collection of Indian arms and objects of art’ या नावाने प्रकाशित करण्यात आला.

या कॅटलॉगमध्ये चौथे शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून मराठा स्वराज्याची स्थापना करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांची’ होती, असे नमूद करून ठेवले आहे. या कॅटलॉग मध्ये तलवारीचे केलेले वर्णन आधी पाहूया.

Sabre – ” Mahratta ” straight, one-edged old European blade, with two grooves on each side, in one of which ” I. H. S. ” is stamped three times ; the raised steel supports at the hilt are damascened with gold in floral designs ; the guarded hilt is of iron with a broad knuckle-guard and a circular pommel, terminating in a spike and encrusted with heavy open-work floral decoration of gold, thickly set with large diamonds and rubies. Presented by H. H. the Maharaja of Kolapore as a relic of the Mahratta chief Sivaji, to whom it formerly belonged.

म्हणजेच, यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे, की सदर तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे. सध्या हि तलवार लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या तलवारीचा क्र. 201 असून कॅटलॉगमध्ये 2 वेळेस या तलवारीस ‘शिवाजी महाराजांची तलवार’ असे संबोधण्यात आले आहे.

तसेच, कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रामध्ये या तलवारीविषयी अजून बराच तपशील वाचायला मिळतो. यात तलवारीचे नाव ‘जगदंबा’ असे दिलेले असून तपशिलात

‘नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १० एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार’ अशी नोंद वाचायला मिळते.

या कागदपत्राचा उल्लेख कोडोलीकर यांच्या ‘शिवाजीच्या तलवारीची गोष्ट’ या पुस्तकात सविस्तरपणे दिलेला आहे. तसेच, इंद्रजित सावंत सरांच्या ‘शोध भवानी तलवारीचा’ या पुस्तकात जगदंबेविषयी अतिशय तपशीलवार माहिती प्रकाशित झालेली आहे.

म्हणजेच काय, तर लंडनच्या ‘रॉयल कलेक्शन’ मध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच असून तिचे पूर्वापार चालत आलेले नाव ‘जगदंबा’ आहे हे स्पष्ट होते.

या तलवारीची लांबी 121 सेंटीमीटर म्हणजेच जवळ जवळ 4 फूट भरते. तलवारीच्या रत्नजडित मुठीवर संपूर्णपणे सोन्याचे काम केले आहे. तलवार अतिशय सुंदर असून वजनाने फार कमी आहे. या तलवारीस भारतात परत आणण्यासाठी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली, पाठपुरावा केला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवप्रेमी ‘बॅ. ए. आर. अंतुले’ यांच्या काळात तर या तलवारीमुळे साऱ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. तलवार भारतात आणण्याची तयारीसुद्धा त्यांनी सुरू केली होती. पण दुर्दैवाने त्यांचे कष्ट फळाला आले नाहीत आणि तलवार मात्र आजतागायत भारतात परत येऊ शकली नाही. काही स्वार्थी लोकांच्या नादान विचारांमुळे आपल्या मातीतला, शौर्याचे प्रतीक असलेला जाज्वल्य ठेवा आज भारताबाहेर आहे. अशी ही कहाणी, छत्रपतींच्या ‘जगदंबा’ तलवारीची….

काही दिवसांपूर्वी आपण टिपू सुलतानच्या तलवारीची जी बातमी पाहिली त्यामध्ये टिपू सुलतानची तलवार परत आणण्यासाठी भारताच्या संस्कृती मंत्रालयाने करार केला आहे तो ग्लास्गो म्युझियमसोबत. जगदंबा तलवार इंग्लडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस इस्टेटमध्ये राणीच्या पर्सनल कलेक्शनमध्ये आहे. त्यामुळे इतर संग्रहालयांना लागू होणारे नियम इथं लागू होत नाहीत तसंच व्यक्तिगत संग्रहासाठी आंतराराष्ट्रीय कायदे प्रक्रियाही लागू होत नाही. म्हणून जगदंबा तलवार भारतात आणणं अवघड आहे.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.