त्या रात्री जगजीत सिंह यांनी गायलेली गझल प्रत्येकाच्या हृदयाला चीर पाडून गेली…

मानवी भावभावनांची वीण एका गजलेत बांधून ती प्रेक्षकांसमोर तितक्याच दमदारपणे आणि भावपूर्वक सादर करणे हे कुणाला जमलं असेल तर ते म्हणजे जगजीत सिंग.

जगजीत सिंग हे कायम आपल्या सोबत असतात पदोपदी. तहान लागल्यानंतर पाणी पिऊन तहान शमवू शकतो व जेव्हा आत्म्याची अतृप्तता जाणवू लागते तेव्हा जगजीत सिंगची गझल कामा येते. दिवसभर काम करून डोळ्यांची हालत जाम झालेली असते तेव्हा दूरवर रात्री एका ठिकाणाहून मंद आवाजात जगजीत सिंगची गजल ऐकू येते तेव्हा स्वर्गीय सुख आणि मनःशांती यांचा संगम होतो.

जगजीत सिंगचा आवाज म्हणजे एक स्वरसाधनाच होती. त्यांच्या आवाजात इतका गोडवा आणि शांतता होती की एखाद्या उसळणाऱ्या ज्वालामुखीला सुद्धा शांत करेल. जगजीत सिंगचा आवाज हा कानांमधून थेट हृदयाला साद घालतो. फार कमी लोकांना असा आवाज लाभतो जो मनाला शांती देतो, ज्याचं गाणं सुख म्हणजे नक्की काय असतं असं सांगतो. जगजीत सिंग यांचं वैशिष्ट्य म्हणजे 15 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत त्यांचा आवाज लोकांना आपला आतला आवाज वाटतो.

8 फेब्रुवारी 1941 रोजी जगजीत सिंग यांचा जन्म गंगानगर मध्ये झाला. जगजीत सिंग यांना लहानपणी संगीताचं वेड होतं. मेहदी हसन, गुलाम अली ,बेगम अख्तर अशा लोकांकडे तेव्हा गजल मोठ्या प्रमाणात रुजलेली होती. जगजीत सिंग यांना गजल क्षेत्रातील क्रांतिकारक का मानलं जातं कारण त्यांनी गजल ही सामान्य लोकांपर्यंत पोहचवली आणि तिथून पुढे जगजीत सिंग यांच्यामुळे सामान्य माणसाचा आवाज म्हणून गजल बहरत गेली.

गजल परंपरेत मोठ्या प्रमाणावर बदल हा जगजीत सिंग यांनी घडवून आणला. साज संगीत यांची परिमाण बदलत सामान्य माणसाच्या मनाला भिडेल अशा गजला त्यांनी संगीतबद्ध करून गायल्या. आनंद झाला असल्यावर जगजीत सिंग यांच्या गजलांच्या चाली मनाला सुखावह वाटतात तर दुःखाच्या वेळी जगजीत सिंग हे जगण्याची वास्तविकता सांगतात.

70- 80 च्या दशकात गजल गायकीला पर्याय म्हणून फक्त जगजीत सिंग यांचं नाव पुढे असायचं.

गजलसाम्राट म्हणून जगजीत सिंग यांना ओळखलं जातं. त्यांनी गालिबपासून ते कतील शिफाई, कैफि आजमी आणि शिव कुमार बटालवी यांच्या पंजाबी गाण्यांना, गजलांना आपला आवाज दिला. जगजीत सिंग यांनी जी जी गजल गायली ती अजरामर झाली ती गितकाराच्या शब्दांसारखी. होश वालो को खबर क्या….ही गजल आजही आशिक लोकांच्या डोळ्यात पाणी आणते. पण एक किस्सा असाच होता ज्यामुळे गझलसम्राट जगजीत सिंग स्टेजवरच रडायला लागले होते.

जगजीत सिंग एका मेहफिलीत उपस्थित होते तेव्हा त्यांना गजलची फर्माईश करण्यात आली. खरंतर जगजीत सिंग यांचा गजल गाण्याचा मूड नव्हता पण लोकांची आर्जवा बघून ते गजल गाऊ लागले आणि त्यात इतके गढून गेले की रडू लागले. ती गजल लिहिलेली होती मशहूर शायर कतील शफाई यांनी. त्याचे शब्द होते

दर्द से मेरा दामन भर दे या अल्लाह
फिर चाहे दीवाना कर दे या अल्लाह…

जशी गजल संपली तशी बातमी येऊन धडकली की जगजीत सिंग यांच्या एकुलत्या एक मुलाचं कार अपघातात निधन झालं आहे. ही बातमी ऐकून ते सुन्न झाले. अंत्यसंस्कार झाल्यावर लोकांना ते म्हणत होते, उस रात ऊपर वाले ने मेरी आवाज़ सुन ली और मेरा दामन दर्द से भर दिया…!

जगजीत सिंग यांचा आवाज आपल्यातला वाटणारा होता 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांची गाणी आजही तितकीच अजरामर आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.