जेह आणि तैमूरच्या बड्डेचे फोटो हातोहात खपतात मात्र त्यांचा आजोबा बड्डे कधीच साजरा करत नव्हता

“पतौडी रियासतीत मी वाढलो, घर म्हणजे एक मोठा राजवाडाच होता. त्या राजवाड्यात १५० खोल्या होत्या. आवारात मोठ्ठाली मैदानं, तबेले, मोटारींसाठी गॅरेज होती. एकावेळी किमान शंभर तरी चाकर तिथं राबत. सात-आठ लोक तर माझ्या एकट्याच्या सेवेत होते, ते फक्त माझं काम करत असत.”  ‘टायगर टेल’ या आत्मचरित्रात टायगर पतौडी आपल्या लाइफस्टाइल बद्दल सांगत होते.

आता टायगर पतौडी कोण हे तुमच्यापैकी काही जणांना आठवत नसेल तर सैफ अली खानचे पप्पा आणि तैमूर आणि जेहचा आजोबा  

नवाब असलेल्या टायगर पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन राहिले. पुढे त्यांचं अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्नही झालं. म्हणजे सगळे नवाबी थाट त्यांनी केले. 

मात्र वैयक्तिकआयुष्यात या नावाबाचा शोकांतिकांनी कायम पिच्छा पुरवला. 

मैदानातही आणि मैदानाबाहेरही. त्यातलाच एक असा प्रसंग होता की जो आयुष्यभर हा टायगर विसरू शकला नाही. वाढत्या वयात टायगरच्या आयुष्यात जगण्याचा अत्यंत स्वाभाविक भाग म्हणून क्रिकेट आलं. त्यांच्या घरात क्रिकेटची परंपरा होती. राजेशाही थाटात क्रिकेट खेळलं जायचं. टायगरचे वडील इफ्तिकार पतौडीही सुरवातीला इंग्लंड संघात खेळत. १९३२ साली त्यांनी इंग्लंड संघात पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात शतकही केलं. पुढे १९४७ साली म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर तेच भारतीय संघाचे कर्णधारही झाले. 

इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघातून खेळल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. मात्र लेकाच्या वाट्याला वडिलांचं जास्त गायडन्स आलं नाही.

टायगर लंडनमध्येच शिकला. क्रिकेटचे सुरुवातीचे धडे लंडनमध्येच गिरवले. त्याच्या वडिलांनीच विंचेस्टरमध्ये त्याचा दाखला केला होता. तिकडं ऍडमिशनमध्ये घेताना पण इफ्तिकार पतौडींचा वेगळाच स्वॅग. 

जेव्हा अर्जावर ‘अदर ऍप्टिट्यूड’चा असं टायगर पतौडी यांच्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तरादाखल त्यांनी लिहिलं होतं, ‘माय सन’. 

पोरानं पण पुढं बापाच्या नावाला साजेशचं काम केलं. मात्र पोराचं कर्तृत्व बापाला डोळ्यांनी पाहता आलं नाही.

टायगरचा ११ वा वाढदिवस होता. नवाबाच्या वाढदिवसाची तयारीही जोशात चालू होती. ५ जानेवारी १९५२चा तो दिवस. तिन्ही बहिणी आणि छोटा टायगर वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत होते, आनंदात होते. तेवढ्यात त्यांची अम्मा त्या खोलीत आली. थरथरत म्हणाली, “आपके अब्बा… नहीं रहे!” इफ्तिकार यांचा हृदयविकारानं इंतकाल झाला होता. पोलो मॅच खेळतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचा जीवनप्रवास संपला. 

या गोष्टीचा टायगरला मोठा धक्का बसला. त्यांच्या पत्नी शर्मिला टागोर सांगतात, “तो दिवस, त्यांनतर टायगरन कधीही त्याचा वाढदिवस साजरा केला नाही.” बरीच वर्षे हे असंच चाललं.

 मात्र सत्तरावा वाढदिवस घरचांच्या आग्रहास्तव त्यांनी साजरा केला. डोळ्याची दुखापत ते वडिलांचं कमी वयात निघून जाणं यांसारख्या धक्क्यातून  कायम त्या संकटांना पुरून उरला. धैर्यानं आणि जिद्दीनं त्यानं आल्या परिस्थितीचा सामना केला. वडील अकाली गेल्यानं बालपणात दु:खाचा डोंगर कोसळला पण तो हरला नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेवटी भारतासाठी खेळण्याचं स्वप्न त्यानं पूर्ण केलंच .

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.