दस का दम: भारताचे नवीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल १० भन्नाट गोष्टी

काहीच दिवसांपूर्वी भारताला नवीन राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू मिळाल्या आहेत. त्यानंतर लगेच १० ऑगस्टला उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण होणार म्हणून उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये NDA चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. लवकरच ते भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.

म्हणूनच भारताच्या नवीन उपराष्ट्रपतींबद्दल १० इंटरेस्टिंग गोष्टी…

१. राजस्थानच्या झुंझुनू गावात जन्मलेल्या जगदीप धनखडांचं शिक्षण आणि करियर अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांतून झालं. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण सैनिकी शाळेत झालं. बारावीनंतर धनखड यांची आयआयटी आणि एनडीएसाठीही निवड झाली पण तिकडे न जाता त्यांनी सायन्समध्ये पदवी घेतली आणि ती देखील फिजिक्समध्ये.  

पदवीनंतर त्यांनी देशातील सर्वात मोठी नागरी सेवा परीक्षाही उत्तीर्ण केली. मात्र जेव्हा करियर करायचा विचार आला तेव्हा आयएएस होण्याऐवजी त्यांनी लॉ फिल्ड निवडली.

जगदीप धनखड यांनी १९७९ मध्ये राजस्थानच्या बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून काम सुरु केलं. १९९० येईपर्यंत राजस्थानच्या उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर भारताच्या विविध उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी खटले चालवले. सोबतच ते उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्षही होते.

२. राजकीय पार्श्वभूमी बघता त्यांची सुरुवात राष्ट्रीय लोक दलाचे नेते देवीलाल यांच्यापासून झाली. धनखड भारताचे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचं अनुसरण करायचे. जेव्हा देवीलाल व्ही.पी. सिंग सरकारमधून बाहेर पडले आणि १९९० मध्ये चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील अल्पसंख्याक सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले तेव्हा धनखड देखील त्यांच्यासोबत गेले.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड यांचं तिकीट कापल्याने ते पक्षातून बाहेर पडले. पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर २००३ दरम्यान राजस्थानच्या राजकारणात अशोक गहलोत जेव्हा वरती येऊ लागले तेव्हा धनकड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

३. खरंतर धनखड यांना राजकारणात यायचंच नव्हतं. पण त्यांच्या मित्रांनी हट्ट केला आणि ‘एकदा प्रयत्न तर करून बघ’ असं त्यांना म्हणाले. मित्रांच्या हट्टापायी धनखड १९८८-८९ मध्ये निवडणूक लढले आणि डायरेक्ट खासदार होत ‘कायदा राज्यमंत्री’ झाले. त्यांच्या शिक्षणामुळे आणि वकिलीच्या अनुभवामुळे त्यांची निवड करण्यात आली होती, असं धनखड यांचे धाकटे बंधू रणदीप माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

४. धनखड यांचं सुदेश धनखड यांच्याशी १९७९ मध्ये लग्न झालं. त्या दोघांना दोन मुलं होती. मुलाचं नाव दीपक आणि मुलीचं नाव कामना ठेवण्यात आलं होतं. पण १९९४ मध्ये दीपक १४ वर्षांचा असताना ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला. जगदीप यांचा मुलावर अत्यंत जीव असल्याने ते पूर्णपणे तुटून गेले होते. मात्र त्यांनी या घटनेतून सावरत समाज कार्यात स्वतःला झोकून दिलं.

५. धनखड फाडफाड इंग्रजी बोलणारे गावातील पहिले व्यक्ती होते. गावातील प्रत्येकाने इंग्रजी बोलावं अशी त्यांची इच्छा असल्याने त्यांनी मुलांसाठी मोफत स्पोकन इंग्लिशचे वर्ग सुरु केले. सोबतच  ग्रंथालय देखील उभारले. प्रत्येक पुस्तक तिथे उपलब्ध व्हावे, म्हणून ते प्रयत्नशील असतात असं गावकरी सांगतात. ग्रंथालयासोबत त्यांनी संगणक प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केले. 

६. महिलांनी स्वावलंबी व्हावं म्हणून त्यांनी २००८ मध्ये मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र उघडलं. तिथं गेल्या १५ वर्षांत आतापर्यंत २५०० हून अधिक महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आलं असून ट्रेनिंगच्या कालावधीत महिलांना कापड किंवा इतर वस्तू घेण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी दैनिक भास्करला दिली.

७. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यात नेहमीच वाद राहिले. ममता बॅनर्जी यांनी धनखड यांच्यावर ‘भाजपचा एजंट’ असा अनेकदा आरोप केला आहे, तर बंगाल भाजप त्यांच्याकडे ‘घटनात्मक नियमांचे पुरस्कर्ते’ म्हणून पाहत आलंय.

मात्र खरंतर धनखड ममता बॅनर्जी यांचे चाहते आहेत. 

व्हीपी सिंग सरकारच्या काळात जेव्हा ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या तेव्हा त्यांना भेटायला जाण्यासाठी सीपीआयएमने धनखड यांना मनाई केली होती, तरी ते कुणाचंही न ऐकता ममता बॅनर्जींना भेटायला गेले होते, असं तृणमूलचे प्रदेश सचिव आणि प्रवक्ते कुणाल घोष यांनी माध्यमांना सांगितलं होतं. 

८. धनखड यांची राजकीय सुरुवात त्यांच्या कायद्याच्या अनुभवामुळे झाली. आता जेव्हा त्यांना उपराष्ट्रपती म्हणून तिकीट देण्याचं ठरलं तेव्हा देखील त्यांचा कायदेविषयक आणि प्रशासकीय अनुभव बघता निवड करण्यात आली असल्याचं संगितलं गेलं. भाजपनं त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं वर्णन ‘किसान पुत्र’ असं केलं होतं. 

९.  उपराष्ट्रपतीपदी झालेले धनखड भैरोसिंह शेखावत यांच्यानंतर राजस्थानमधील दुसरे नेते आहेत. भैरोसिंह शेखावत भाजपचे उमेदवार म्हणून या पदावर निवडून गेले तर आता धनखड देखील भाजपचे उमेदवार म्हणूनच उपराष्ट्रपती पदावर निवडून गेले आहेत. 

भैरोसिंह शेखावत देखील पेशाने वकील होते तर धनखड देखील वकील आहेत. 

१०. उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली असली तरी ते अत्यंत डाऊन टू अर्थ असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या एका निकटवर्तीयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार…

“धनखड भलेही सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील, मंत्री आणि बंगालचे राज्यपाल असतील, पण आजही ते दररोज पहाटे ५ वाजता उठतात. त्यानंतर योग आणि व्यायाम करतात. अंघोळ करून ठाकूरजी यांची पूजा करतात. आजही ते नाश्त्याला रात्रीची शिळी पोळी खातात.”

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.