जळगावची जैन ही आज आफ्रिकेतील सर्वात मोठी इरिगेशन कंपनी आहे.

गोष्ट असेल स्वातंत्र्यापूर्वीची. जळगाव मध्ये शिकायला आलेला एक मुलगा त्याला घरची आठवण येत असल्यामुळं गावी जायचं होतं. खेडोपाडी गाड्या बसेस याचं प्रस्थ अजून वाढायचं होतं. जळगाव सारख्या गावात तर सायकल हेच मुख्य साधन होतं. त्या पोराकडे स्वःतची सायकल घेण्याची ऐपत तर नव्हतीच पण भाड्याने सायकल घ्यायची झाली तर दुकानदार ओळख विचारत होते.

खेड्यातून आलेल्या त्या मुलाकडे ते ही नव्हतं. फक्त कोणाची ओळख नसल्यामुळे त्या दिवशी तो मुलगा १५ किलोमीटर चालत आपल्या घरी गेला. पण त्याच दिवशी त्याने मनाशी जिद्द पक्की केली,

एक दिवस आपली अशी ओळख बनवायची की अख्ख्या जगात जळगाव आपल्या नावाने ओळखलं जाईल. 

त्या मुलाचं नाव भवरलाल जैन. 

जळगाव जिल्ह्यात अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेलं वाकोद हे गाव. सुमारे शंभर भर वर्षांपूर्वी दुष्काळामुळे राजस्थान मधून स्थलान्तरित झालेलं एक कुटुंब म्हणजे जैन. शेती आणि शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या या कुटुंबात भवरलाल यांचा जन्म झाला.

त्यांचं प्राथमिक शिक्षण गावीच झालं होतं. माध्यमिक शिक्षणाच्या निमित्ताने जळगावला आले. लहानपणापासून हुशार होते, अभ्यासात चांगली गती होती. एलएलबी करण्यासाठी मुंबईला आले. तिथे त्यांचे काका होते, त्यांच्या घरी राहून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं.

ते उत्तम गुण मिळवून एलएलबी झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धापरीक्षा देखील दिल्या. त्यात पास झाले.

नोकरी जॉईन करण्यापूर्वी एकदा आईचा सल्ला घ्यायचा म्हणून वाकोदला आले. त्यांची आई म्हणजे गौराबाई. त्या काही शिकलेल्या नव्हत्या पण व्यवहार ज्ञान प्रचंड होतं. आपल्या लेकाला तिने नोकरी करण्यापेक्षा शेती आणि शेतीला उपयोगी पडेल असा व्यवसाय कर म्हणून सल्ला दिला.

भवरलाल जैन आपल्या आईच्या शब्दाबाहेर नव्हते.

त्यांनी आईने दिलेल्या सात हजार रुपये भांडवलावर केरोसीनची एजन्सी बुक केली. सुरवातीला हातगाडीवरून घरोघरी जाऊन केरोसिनची विक्री केली. हा केरोसिनचा धंदा चांगला चालतच होता पण त्याच बरोबर खेडेगावात शेतकऱ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात याची जाणीव झाली. यातूनच त्यांनी शेतीपयोगी सामग्री पुरवण्याच्या व्यवसायात प्रवेश केला.

यातूनच स्थापना झाली जैन ग्रुपची.

१९७९ साली भवरलाल यांनी केळीची भुकटी तयार करणारा सहकारी कारखाना विकत घेतला व त्या यंत्राचा उपयोग करून पपईच्या चिकापासून पेपेनच्या उत्पादन घेण्यास सुरुवात केली. हळूहळू इतर शेती विषयक व्यवसायातही त्यांनी पाय रोवले.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न होता पाण्याचा.

निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत येतो. जमीन उत्तम प्रतीची असूनही अनेकांना पावसाची वाट बघत पीक घ्यावं लागतं. आपल्याही शेतात बारमाही पाणी खेळावं, दुबार बागायती पीक आपल्याही शेतात तरारून यावं असच प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं. पण लहरी पावसामुळे ते शक्य होत नव्हतं.

भवरलाल जैन यांनी या पाण्याच्या प्रश्नाला भिडायचं ठरवलं.

त्याकाळी शेताला पाणीपुरवठा करणारे पाईप आरसीसी किंवा लोखंडी असायचे. हे पाईप प्रत्येक शेतकऱ्याला परवडायचे असं नाही. चौकस नजर असणाऱ्या भवरलाल जैन यांच्या लक्षात आलं की या महागड्या लोखंडी पाईपला पीव्हीसी पाईप चांगला व कार्यक्षम पर्याय ठरू शकतात. यातूनच त्यांनी १९८० साली पीव्हीसी पाईप बनवण्याचा कारखाना सुरु केला.

सतत नावीन्याच्या शोधात असणारे भवरलाल जैन विदेशात जाऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचे.

यातूनच एकदा त्यांनी अमेरिकेतील फ्रेस्नो येथे १९८४  साली हे ठिबक सिंचन हे तंत्रज्ञान पाहिले. ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला होता.

भवरलाल भाऊ यांनी या प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट दिली, अभ्यास केला, तंत्रज्ञानाची पारख केली आणि आपल्या भारत भूमीला हे वरदान ठरेल अशी खूणगाठ मनाशी पक्की केली.

भारतात परत येताना सोबत ठिबकची पुस्तके, माहितीपत्रके, नमुने (नळ्या, तोट्या इ.) यांची शिदोरी घेऊन आलेत. उद्योग समूहातील तांत्रिक सहकार्‍यांना याचा सखोल अभ्यास करायला लावला आणि १९८६ साली ऑस्ट्रेलियन कंपनी सोबत करार करून हे तंत्रज्ञान भारताच्या शेतीत प्रत्यक्ष उतरविले.

फक्त हे ठिबक सिंचन आणलाच नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी हे ठिबक वापरण्याबद्दल प्रवृत्त केलं. जैन इरिगेशनच्या या ठिबक मुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती झाली. ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानामुळे पिकाच्या उत्पादकतेत ४०% ते ५०% नी वाढ झाली.

फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगभरात ठिबक सिंचनात भवरलाल जैन यांचं नाव जाऊन पोहचलं. आज आठ देशांमध्ये जैन इरिगेशनचे सोळा कारखाने कार्यरत आहेत तर १२३ देशांमध्ये त्यांची उत्पादने विकली जातात.

विशेषतः आफ्रिका खंडात त्यांचा मोठा पसारा वाढला आहे. तिथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जैन इरिगेशन पाईप्स हमखास पाहायला मिळतात. रवांडासारखा देश जैन इरिगेशन सोबत हजारो कोटींचे करार करतो. संपूर्ण आफ्रिका खंडात सर्वात मोठ्या शेतीपयोगी कंपनी म्हणून जळगावच्या जैन इरिगेशनचे नाव घेतले जाते.

ठिबक सिंचनानंतर शेतकऱ्यांसाठी भंवरलाल जैन यांनी जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगशाळा उभारली. तसेच त्यांनी ऊती संवर्धनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले. केळीच्या रोपांचे ऊती संवर्धन लोकप्रिय करण्यासोबतचळिंब व कांद्याच्या रोपांच्या ऊती संवर्धनाची संकल्पना जैन यांनी रुजवली. 

पुढे जैन यांनी जळगाव येथे अन्न प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये त्यांनी भाजीपाला व कांदा, लसूण, आले आदींचे निर्जलीकरण करण्यात यश मिळवले. भारतात जळगाव व वडोदरा येथे तर अमेरिकेत बोर्डमॅन व ब्रिटनमध्ये सिलफोर्ड येथे त्यांचे कारखाने आहेत. या प्रकल्पात १,७५,००० टन कांद्यावर निर्जलीकरणाची प्रक्रिया होते. त्यांनी कांद्यासारख्या पिकाला बाजारभावाची हमी मिळवून देण्याचे कामही केले.

भारतात कांद्याच्या संदर्भात करार शेतीची संकल्पना रुजवणे, यात जैन यांचा मोलाचा वाटा आहे.

भवरलाल यांनी शेती व शेतीच्या संदर्भात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी जैन हायटेक अ‍ॅग्री इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पुढे हे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याचे व शिकण्याचे केंद्र झाले. जैन यांनी पाण्याचे संवर्धन करून अनुत्पादक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी क्षारयुक्त चोपण व जिरायती जमिनीही लागवडीखाली आणल्या. पीक लागवडीच्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जैविक तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा स्थापन केल्या. 

जैन उच्च तंत्रज्ञान कृषी प्रशिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांनी सहभागी झाले.

ठिबक सिंचन पासून ते सोलर पर्यंत आज जैन इरिगेशनच नाव सर्वत्र गाजतंय. जळगाव येथे एकाच छत्राखाली असलेले शेतीचे हे वैभव पाहण्यासठी दर वर्षी २० हजार शेतकरी येथे भेट देतात. 

एकीकडे शेतीवर आधारित उद्योग किंवा प्रकल्प उभारणीस बहुतांश धोका मानत असताना भवरलाल जैन यांचे सर्वच व्यवसाय शेती व शेतकऱ्यांशीच संबंधित राहिले. त्यांच्या या कार्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह एकूण २६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यात २००८ मध्ये मिळालेल्या ‘पद्मश्री’चाही समावेश आहे

२५ फेब्रुवारी २०१६ रोजी भवरलाल जैन यांचे वयाच्या अष्टत्तराव्या वर्षी निधन झालं. शेतकऱ्यांच्या शेतात झुळझुळ पाणी खेळण्यापासून ते त्याच्या पिकांना बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या या कर्मयोग्याचे जळगावला जगाच्या नकाशावर ओळख मिळवून देण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं .

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.