मराठ्यांच्या भीतीनं जयपूरच्या महाराजाने विष खाऊन आत्महत्या केली होती

गोष्ट आहे इसवी सन 1747-48 सालची. मराठ्यांचे साम्राज्य तेव्हा संबंध भारतभर पसरले होते. कित्येक राजेरजवाडे, छोटेमोठे संस्थानिक मराठा साम्राज्याचे अंकित झाले होते. भारतातील कोणतीही समस्या असो, त्याचे उत्तर मराठ्यांकडेच मिळणार याची प्रत्येकालाच खात्री होती. यामुळे ‘माधोसिंह’ नावाचा राजपुत्र मराठ्यांच्या आश्रयास आला.

हा माधोसिंह जयपूरच्या राजघराण्याचा राजपुत्र. राजा ईश्वरसिंह याचा धाकटा भाऊ. जयपूरसारख्या वैभवशाली राज्याचा राजपुत्र असूनही त्याच्यावर अन्याय झाला होता. म्हणून तो मल्हारराव होळकरांकडे मदतीसाठी आला.

राजा ईश्वरसिंहाला आपल्या लहान भावाला राज्याची वाटणी देण्यात कमीपणा वाटत होता. हे राज्य केवळ आपलं आहे आणि आपणच याचे सर्वेसर्वा, ही भावना ईश्वरसिंहामध्ये होती. जर मराठ्यांनी आपल्यावर झालेला अन्याय दूर केला तर दहा लाख रुपये नजर करेल, असे वचन माधोसिंहाने दिले.

जोवर ही नजर केलेली रक्कम सरकारजमा होत नाही, तोवर जयपूर राज्यातील चार महाल मराठ्यांच्या ताब्यात राहतील असे ठरले.

मराठ्यांच्या फौजेचे नेतृत्व होते मल्हारराव होळकर यांच्याकडे. अतिशय तडफेने झालेल्या युद्धात मल्हारराव विजयी होणारच होते, तेवढ्यात ईश्वरसिंहाच्या मदतीला सुरजमल जाट धावून आला. नव्या कुमकेच्या फौजेमुळे मराठ्यांचा निसटता पराभव झाला.

या विजयाने मात्र ईश्वरसिंह निर्धास्त झाला आणि मराठ्यांना अपमानजनक भाषेत एक पत्र लिहीले. झाले. मल्हाररावांनी त्वेषाने ईश्वरसिंहावर हल्ला केला. आता मात्र त्याचे धाबे दणाणले. आपल्या दरबारातील ‘केशवदास’ मार्फत त्याने तहाची बोलणी सुरू केली. तहमध्ये माधोसिंहाला 5 महाल मिळाले आणि मराठ्यांना ठरल्याप्रमाणे दहा लाख रुपये नजर.

मल्हारराव होळकर आणि केशवदास फार चांगले मित्र होते. तह यशवीरित्या पार पडला. मल्हारराव माघारी फिरले.

पण ईश्वरसिंह पडला हलक्या कानाचा. एका कुटील मंत्र्यांच्या नादी लागून त्याने तहात मान्य केल्याप्रमाणे मराठ्यांना दहा लाख रुपये तर दिले नाहीच, वरून केशवदासचा खून करविला. ही बातमी मल्हारबाबांना समजताच त्यांच्या रागाला सीमा राहील्या नाहीत. मराठ्यांनी पुन्हा एकदा जयपूर शहरावर हल्ला केला. राजा वेढ्यात अडकला. राजाला काय करावे समजेना.

त्याने आपल्या खास माणसांचा सल्ला घेण्याचे ठरवले पण त्याचे सल्लागार होते एक सेवक आणि एक सामान्य माहूत. असले सल्लागार असल्यावर राज्य कसे टिकेल? राजा कोंडीत सापडला.

आपल्या सेवकांकडून त्याने ‘काही औषधे बनवायची आहेत’ असे सांगून सोमलखार नामक विष आणि विषारी नाग मागवला. त्याच रात्री ईश्वरसिंहाने आपल्या तीन लाडक्या राण्या आणि एका दासीला ते सोमलखार विष पाजले आणि नागाचा दंश करून मारले. ईश्वरसिंहाने सुद्धा याचप्रकारे आत्महत्या केली.

तब्बल अठरा तास या पाच जणांचे प्रेत राजवाड्याच्या बंद खोलीत पडून होते. त्या प्रेतांची सडण्यास सुरुवात झाली होती.

मराठ्यांना एका वृद्ध मंत्र्याकडून ही बातमी समजताच त्यांनी महालाकडे धाव घेतली. ‘शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपते’ या तत्त्वावर चालणाऱ्या मराठ्यांनी ईश्वरसिंहाचा विधीनुसार अंत्यविधी केला. स्वता मल्हारबाबांनी या अंतिम कार्याचा खर्च खासगीतून केला. जयपूर शहरावर आता मराठ्यांचा जरीपटका फडकत होता.

ईश्वरसिंह हा मिर्झा राजे जयसिंगाचा वंशज.

किती दुर्दैव पहा. नव्वद वर्षांआधी जयपूरचा राजा मराठ्यांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी दख्खनेत उतरला. शिवाजी महाराजांसोबत त्याने युद्ध छेडले. आणि आता मराठ्यांनी जयपूरच्या राजाची धूळधाण उडवली. जयपूर शासकाला आत्महत्या करण्यास मजबूत केले आणि त्याच राज्यावर भगवा फडकवून मराठा साम्राज्याची सीमा वाढवली.

मराठ्यांना ‘राष्ट्रनिर्माते’ म्हणतात, ते यामुळेच..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.