अंबानी प्रकरणात चर्चेत आलेली ‘जैश-उल-हिंद’ संघटना काय आहे?

जैश ए मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा, जैश-उल-अदल अशा विविध दहशतवादी संघटना आज आजपर्यंत सतत आपल्या कानावर पडत होत्या. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या संघटनांचा सहभाग राहिला आहे. पण अलीकडेच लागोपाठ घडलेल्या २ घटनांमध्ये एका नवीनच संघटनेचं नाव चर्चेत आलं आहे.

२९ जानेवारी दिल्लीत इस्रायली दूतावासा जवळ घडलेल्या कमी तीव्रतेचा बॉम्ब स्फोट आणि २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटक या प्रकरणात चर्चेत आलेल्या संघटनेच नाव आहे, 

जैश-उल-हिंद

या संघटनेनं २९ जानेवारीच्या बॉम्ब स्फोटची जबाबदारी स्वीकारून इस्त्रायली राजदूतांच्या नावे चिट्ठी लिहीत हा ट्रेलर असल्याचं सांगितलं. आणि अजून बदला घेणार असल्याचं देखील सांगितलं.

त्यानंतर २५ फेब्रुवारीच्या घटनेत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती ती देखील जैश-उल-हिंदने ठेवल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. एका टेलिग्राम पोस्टच्या आधारे पोलिसांनी हा दावा केला होता. मात्र त्यानंतर एक पत्रक प्रकाशित करून जैशने ही जबाबदारी नाकारली आणि बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

पण अजून देखील या प्रकरणावर प्रश्नचिन्ह कायम आहे, तपासातून काय त्या गोष्टी समोर येतीलचं. मात्र या दोन्ही घटनांमध्ये या संघटनेचं नाव चर्चेत आलं हे नक्की. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत या संघटनेबद्दल उल्लेख केला. 

काय आहे ‘जैश-उल-हिंद’ संघटना? 

ही संघटना अगदीच नवीन असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणा यांच्याकडे इतर संघटनांसारखी यांच्याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हि संघटना पाकिस्तानच्या एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडलेली असण्याची शक्यता आहे.

जेष्ठ पत्रकार आलोक वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना जैश-उल-हिंद या संघटनेबद्दल काही प्राथमिक माहिती सांगितली आहे. ते म्हणतात, 

मागील अनेक वर्षात झालेल्या पोलीस आणि सैन्याच्या कारवायांनी सगळ्या आघाडीच्या संघटनांनी आपले छोटे छोटे गट बनवले. जैश-उल-हिंद बद्दल सांगायचं तर हे देखील एका नवीन संघटनेचं नाव आहे. याचा रिमोट कंट्रोल पण बाहेरूनच चालवला जात आहे. 

देशात स्लीपर सेल्सच्या मदतीनं हे लोक आपल्या कारवाया पूर्ण करतात. मात्र या संघटनेबद्दल अगदी सविस्तर माहिती तपास संस्थांकडे देखील उपलब्ध नाही. तुम्हाला जर हॉलिडे चित्रपट आठवत असले तर त्यात जी स्लीपर सेल्स आहे अगदी त्या सारखंच या संघटनेचं काम आहे.

संरक्षण तज्ञ संजीव श्रीवास्तव माध्यमांशी बोलताना सांगतात, 

दाट शक्यता आहे की, जैश-उल-हिंद ही संघटना ईरानी दहशतवादी संघटना जैश – उल-अदल या २०१२ मध्ये बनलेल्या संघटनेशी जोडलेली असण्याची शक्यता आहे. तसचं ही संघटना अगदीच नवी असल्यामुळे चर्चेत येण्यासाठी देखील प्रयत्न करत असावी. 

तसचं आलोक वर्मा यांनी सांगितलेल्या स्लीपर सेल्सच्या मुद्द्याला श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला. पण या संघटनेला देखील तेवढंच गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं त्यांचं मत आहे. त्यांच्या सदस्य आणि कमांडर यांच्या बद्दल कसलीच माहिती नसल्यानं सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा यांनी लवकरात लवकर यांच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे असं देखी ते म्हणतात.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.