जयंतराव टिळकांना उशीर होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट पुण्याचा घाटच फोडला.

सरकारी काम न् सहा महिने थांब. ही म्हण उगीच पडली नसावी. एखादा प्रकल्प मंजुरी किंवा एखादा निर्णय शासकीय पातळीवर घेतल्यानंतर तो खालच्या पातळीवर अंमलबजावणीत येवून पुर्णत्वास जाईपर्यंत कधी कधी एक-एक दशकाचा काळ लोटला असल्याची उदाहरण आहेत. हे आज नाही तर पुर्वी पासून चालू आहे.

पण महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक मुख्यमंत्री होवून गेला जो त्याच्या तात्काळ निर्णय घेण्याच्या स्टाईलने प्रसिद्ध होता. पाहू, बघू, करु असे शब्दच त्या मुख्यमंत्र्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. योग्य वाटला तर मंजुर केला असा कामाचा उरक होता.

यात मग मंत्रालयात शिवरायांचे चित्र लावण्याचे काम, संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात, रिझर्व बँकेच्या विरोधात जावून शेतकऱ्यांची कर्जमाफी, एका रात्रीत फलोत्पादन खाते सुरु करणे, अशा अनेक जलद निर्णयांसाठी ओळख मिळवलेले,

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्लुल रेहमान अंतुले.

अंतुलेचा उल्लेख करत असताना त्यांचे असेच तात्काळ निर्णयांचे एकाहून एक सरस किस्से आजही चर्चेला येतात. फक्त १८ महिन्याच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी जे करून दाखवले ते आजही एखाद्या नेत्याला करणे अशक्य वाटते.

त्यांचा असाच एक तात्काळ निर्णयाचा अनुभव म्हणजे पुण्याच्या घाटातील वाहतुक वारंवार जाम होत असे, तेव्हा आला. अंतुले तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे जयंतराव टिळक वीजमंत्री होते.

तर किस्सा असा घडला की, मुंबईत कॅबिनेटची बैठक होती. पण पुण्यात रात्री एका कार्यक्रमात वेळ झाल्याने त्यांनी रात्रीचा प्रवास टाळत पुण्यातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून टिळक बैठकीला निघाले. मात्र ते त्या बैठकीला वेळेत पोहचू शकले नाहीत.

त्यावेळी मोबाईल नव्हते. टिळक का आले नाहीत ? अंतुलेंनी बैठकीत सगळ्या मंत्र्यांना विचारले. अधिकची चौकशी केली तेव्हा कळाले की, टिळक पुण्याच्या घाटात ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. बॅ. अंतुले यांनी त्याच कॅबिनेटच्या बैठकित निर्णय घेतला की,

संबंधित घाटात वाहतुक वारंवार जाम होती, हे वारंवार निदर्शनास आले आहे. म्हणून हा घाट तोडा. मंत्र्यांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे तर सामान्य माणसांना किती त्रास होत असावा”

ते मुख्यमंत्री राहिलेल्या दिड वर्षाच्या काळातच घाटाचे काम सुरु झाले. घाटात दुहेरी रस्ता, आणि उंचवटे तोडण्याचे काम अर्धे झाले. त्यामुळे आज विकसीत झालेल्या एक्सप्रेस हायवेचे श्रेय अंतुले यांच्या या पहिल्या निर्णयशक्तीला आहे.

अंतुले हुशार होते. ते लंडनमधून वकिलीचे शिक्षण घेवून आले होते. तिथे देखील त्यांनी चळवळ उभा केली होती. याच हुशारीचा पुढे महाराष्ट्राला फायदा झाला.

कपाळावर मध्ये मध्ये येणारी केसांची बट, बोलता बोलताच ती मागे करण्याची बेफिकिरीची लकब, वागण्यात एक प्रकारचा जोश आणि ऊर्जा असेले अंतुले कायमच एक सकारात्मक आणि उत्साहीपणाचा संदेश देत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.