बाप बॉलिवुडमधला मोठ्ठा माणूस असुनही त्यानं बापाच्या नावानं काम मिळवलं नाही..

मध्यंतरी नेपोटिजम विषयी बरंच रान उठलं होतं. बॉलिवुडमध्ये असणारी जी बडी घराणी आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवला गेला होता. आज हिंदी सिनेमात अनेक असे अभिनेते आहेत ज्यांना त्यांचे वडील हीरो आहेत, म्हणून सिनेमात कामं मिळाली आहेत.

अशा अनेक स्टारकिडची त्यांच्या वडिलांशी किंवा आईशी तुलना केली जाते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायला बराच वेळ जावा लागतो.

या सर्व नेपोटिझमच्या प्रकरणात बॉलिवुड मध्ये असा एक कलाकार होऊन गेला ज्याचे वडील हिंदी सिनेसृष्टीतील महान अभिनेते. परंतु वडिलांच्या ओळखीने जे सिनेमे मिळाले ते सर्व त्यांनी नाकारले. हा कलाकार म्हणजे जलाल आगा.

जलाल आगा यांचे वडील आगाजान बेग हिंदी सिनेसृष्टीत आगा या नावाने मशहूर होते. १९३५ ते १९८६ या काळात त्यांनी जवळपास ३०० सिनेमांमध्ये काम केले. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचा बऱ्यापैकी दबदबा होता. आगा यांचा मुलगा जलाल हा वडिलांची प्रसिद्धी, लोकप्रियता लहानपणापासून पाहत आला होता.

जलालने बालपणीच ठरवलं होतं की, वडिलांच्या प्रसिद्धीचा, त्यांच्या नावाचा स्वतःसाठी वापर करायचा नाही.

दिलीप कुमार आणि आगा यांची चांगली ओळख. दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. एकदा दिलीप कुमार आगा ला भेटायला आले असता, त्यांना चुणचुणीत असलेला जलाल दिसला. त्यावेळी दिलीप कुमार ‘मुघल ए आझम’ सिनेमाची तयारी करत होते. सिनेमात छोट्या जहांगीरची भूमिका जलालने करावी अशी दिलीप कुमार यांची इच्छा होती. परंतु आगा यांनी या गोष्टीसाठी नकार दिला.

कोणाकडून नकार ऐकणं, हे त्यावेळेस दिलीप कुमारच्या तत्वात बसत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दिलीप कुमार यांनी छोट्या जलालला अक्षरशः पळवून मुघल ए आझम च्या सेटवर घेऊन आले.

इकडे आगा आपल्या मुलाला ठिकठिकाणी शोधत होते. मग त्यांना कळलं की दिलीप कुमार मुलाला घेऊन गेला आहे. आगा सिनेमाच्या सेटवर गेले. त्यांना दिलीप कुमारच्या वागण्याचा राग आला तरीही ते काही बोलले नाहीत. जलालने छोट्या जहांगीरची भूमिका केली. पण या संपूर्ण प्रकरणाचा जलाल आगा यांच्या बालमनावर परिणाम झाला.

आणि तिथेच त्यांनी ठरवलं, की वडिलांच्या माध्यमातून येणारं कोणतंही काम यापुढे करायचं नाही.

वय वाढत गेलं तसं आपण एका मोठ्या कलाकाराची मुलं आहोत, ही जाणीव त्यांना अधिक स्पष्टपणे यायला लागली. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायचे त्यांचे प्रयत्न होते. अभिनयात करियर करण्यासाठी जलाल यांनी पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला. तिथे शिक्षण घेतल्यानंतर के. ए. अब्बास यांच्या १९६७ साली आलेल्या ‘बंबई रात की बाहो मे’ या सिनेमात अभिनय केला.

पुढे काही सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले. त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘शोले’ मधील मेहबूबा मेहबूबा या गाण्याने. गब्बर सिंगच्या समोर आकर्षक कपडे परिधान करून गाणं गाणाऱ्या गायकाच्या छोट्याश्या भूमिकेत त्यांनी सर्वांचं मन जिंकलं. शोले मधल्या या विशेष भूमिकेमुळे त्यांना भरपूर लोकप्रियता मिळाली.

१९६० ते १९९० या साधारण तीस वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी ६० सिनेमांमध्ये काम केले.

हिंदी सोबतच ‘गांधी’, ‘बॉम्बे टॉकी’, ‘किम’ यांसारख्या हॉलिवूड सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘गुंज’ हा सिनेमा १९८९ साली प्रदर्शित झाला.

जलाल आगा यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. एकदा एका निवांत क्षणी मित्रांसोबत गप्पा मारत ते बसले होते. त्यावेळी कोणीतरी म्हणालं,”आपण तुझ्या ५० व्या वाढदिवसाचं मोठं सेलिब्रेशन करू.” यावर हसून जलाल आगा इतकंच म्हणाले,

“कल किसने देखा है, पहले कल तो आने दो.”

दुसऱ्याच दिवशी जलाल आगा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते जेव्हा गेले तेव्हा नातेवाईकांनी त्यांच्या मित्रपरिवाराला कळवण्यासाठी नंबर शोधायला सुरुवात केले. तेव्हा मित्रांच्या फोन नंबरने भरलेल्या दोन मोठ्या डायऱ्या त्यांच्या खोलीत सापडल्या.

वडिलांच्या ओळखीवर त्यांनी आज सिनेमे केले असते तर कदाचित त्यांच्या वाट्याला जास्त सिनेमे आले असते. परंतु स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून त्यांनी मोजक्याच सिनेमांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न केला.

नेपोटीजमला विरोध करणारा पहिला कलाकार म्हणून जलाल आगा यांच्याकडे आपण बघू शकतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.