अमेरिकेला फाईट द्यायची म्हणून इंग्रजांनी जळगाव डेव्हलप केलं

अस्सल झणझणीत चवीचा प्रदेश म्हणजे खानदेश. या झणझणीत भागात लोक मात्र गोड आहेत. याच भूमीत बालकवी जन्मले, याच भूमीत कवियत्री बहिणाबाई चौधरी घडल्या. कवी मनाच्या साने गुरुजींची ही कर्मभूमी होती. अहिराणीचा गोडवा प्रत्येक खानदेशी माणसाच्या उतरलेला असतोच.

खानदेशचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली काळी माती कसदार आणि सुपीक आहे. “माणूस पेरला तरी उगवून येईन”  अशी म्हण तिथे प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथे केळीचे आगमन झालं आणि तेव्हापासून इथली केळी जगावर राज्य करते. 

आजही जळगावच्या केळीने तर पार रशियापर्यंत धुमाकूळ घातला आहे. जळगावला खास केळीसाठीच ओळखलं जात. पण याच जळगावला एकेकाळी अमेरिकेपर्यंत ओळखलं जायचं. केळी साठी नाही तर कापसासाठी.

आता लगेच कन्फ्युज होऊ नका. सुरवातीपासून स्टोरी सांगतो.

खानदेशची बाजारपेठ पुरातन काळापासून फेमस आहे. सुपीक जमीनीमुळं  भरघोस धान्य उत्पादन व्हायचं. पूर्वी ज्वारी बाजरी हि इथली प्रमुख पिके होती. कष्टाळू लेवा पाटीदार समाज शेतीसाठी अगदी चिवट समजला जायचा. त्यांनीच या कोरडवाहू जमिनीमध्ये दुबार पिकं घेण्याची पद्धत रूढ केली. दूरदूर वरून व्यापारी ते खरेदी करण्यासाठी यायचे.

बरीच वर्ष इथे मुघलांच राज्य होतं. उत्तरेतून दक्षिणेत उतरताना मुघल सैन्याचा पहिला स्टॉप खानदेशात असायचा. आल्या आल्या पहिलं काम ते बाजार पेठ लुटण्याचं करायचे.  या बाजारपेठेत खान्देशातील तलम कापूस आणि रूईचाही माेठा समावेश हाेता.

उत्तरेच्या स्वाऱ्यांवर जाणाऱ्या पेशव्यांसाेबत जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खान्देशी कापूस काबुल, कंदाहरमार्गे अरबी देशांमध्ये पाेहचला हाेता.

शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांचा हा काळ. राजधानी साताऱ्यात त्यांची पदरी दुर्गोजीराव भोईटे नावाचे एक निष्ठावंत सेवक होते. त्यांच्या सेवेवर व पराक्रमावर खुश होऊन शाहू महाराजांनी त्यांना खानदेशातील नशीराबाद आणि जवळील प्रांत बक्षीस म्हणून दिले होते. याच भोईटे घराण्यातील वंशज असलेल्या सरदार तुळाजीराव भोईटे यांनी या भागात आपली गढी उभारली, आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते. या वाड्यासोबतच सरदार भोईटे यांनी एक नवीन गाव वसवले.

ते गाव म्हणजे जळगाव.

सरदार भोईटेंच्या मुळे इथली बाजारपेठ अल्पावधीतच भरभराटीस आली. पुढे पाेर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजांनी ही बाजारपेठ हेरली. या कापसाच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले. तापी, गिरणा, पुर्णा, नर्मदा या नद्याच्या खाेऱ्यात हाेणारे कापसाचे उत्पादन अधिक गुणवत्ता पुर्ण हाेते.

विशेषतः अठराव्या शतकात इंग्रजांनी संपूर्ण भारतभर आपले हातपाय पसरले. १८१८ साली मराठ्यांचा पराभव करून देशातील एकमेव शक्तिशाली सत्ता बनले. व्यापारी वृत्तीच्या कंपनी सरकारने सर्वप्रथम भारतातील प्रमुख बाजार पेठ आपल्या ताब्यात घेतल्या. यातच जळगावची बाजारपेठ देखील होती.

साधारण १८६१ साली अमेरिकेत गृहयुद्ध सुरु झाले. तो पर्यंत अमेरिका हा इंग्लंडचा प्रमुख कापूस सप्लायर होता. तिथल्या यादवीमुळे अचानक मँचेस्टर आणि इतर कारखान्यांना कापूस मिळायचं बंद झालं. इंग्लंडचा कापड उद्योगावर मोठा परिणाम झाला. कापसाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. कारखाने थंड पडले होते. अमेरिकेच्या कापसाला पर्याय काय हे शोधत शोधत इंग्रज खानदेशातील जळगावला येऊन पोहचले.

जळगावमधलं कोरड वातावरण कापसासाठी सुयोग्य होतं. अमेरिकेला फाईट देण्यासाठी इंग्रजांनी जळगावला डेव्हलप करायचं ठरवलं.

सर्वप्रथम १८६५ साली ग्रेट इंडियन पेनिनसुला या कंपनीमार्फत रेल्वेचे रूळ टाकण्याचं काम सुरु केलं. त्याकाळात फक्त मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये रेल्वे होती. जळगाव सारख्या ग्रामीण भागात रेल्वे नेण्यामागे इंग्रजांचा खूप दूरदृष्टीचा विचार होता. त्यांनी इथल्या शेतकऱ्याना कापूस पिकवण्यासाठी प्रेरणा दिली. जळगाव भागातील कापूस अधिक गुणवत्तापुर्ण असल्याने इंग्रजांनी रेल्वे लाईन टाकून थेट मुंबईच्या बंदरापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली.

जळगावचा कापूस वेगाने इंग्लंडला जाऊ लागला. याच काळात कापसाची ओळख पांढरं सोनं म्हणून झाली. कापसाच्या गाठी बनवण्यासाठी कामगार आले. लोकसंख्या वाढली. लोकांकडे पैसे खेळू लागला. पुढच्या काळात मारवाडी सिंधी व्यापारी समाज देखील मोठ्या प्रमाणात जळगाव मध्ये वसला.

इंग्रजांनी या छोट्या गावाचं रूपांतर शहरात केले आणि इथल्या कष्टाळू शेतकऱ्यांनी व हुशार व्यापाऱ्यांनी जळगावला ट्रेडिंग सिटी बनवलं.

पुढे अमेरिकेतील यादवी युद्ध संपलं आणि इंग्लंडची जळगावच्या कापसावरची डिपेन्डन्सी कमी झाली. पण तोवर व्यापारी गाव म्हणून जळगावची ओळख निर्माण झाली होतीच. कापूस नही तर केळी सही असं म्हणत जळगावने आपली उलाढाल चालूच ठेवली. आजही कोट्यवधींची उलाढाल या बाजार पेठेत होत असते.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Wasim Khan says

    मुगल शासन पूर्ण भारतात होते तर त्यांच्या कड़े भरपूर दौलत होती te कशाला जलगांव ची बाजारपेठ लुठेल… काहि पुरावा द्या इतिहासतला की फक्त द्वेष पसरवातत…..

Leave A Reply

Your email address will not be published.