जालियनवाला बागेचा महाभयंकर हत्याकांड केला आणि शेवट पर्यंत त्याच समर्थन करत राहिले
13 एप्रिल,शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल ‘रिजनाल्ड डायर’ 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या. बागेत जाण्यासाठी एकच चिंचोळा रस्ता.. गाड्या आत नेता येत नसल्यामुळे डायर आणि त्याची तुकडी मार्च करत आतमध्ये निघाली.
आतल्या व्यासपीठावर कुणीतरी भाषण देत होते.एकदमच एवढे सैन्य आलेले पाहून लोक काहीशी भेदरली होती.
काय चाललंय काही समजायच्या आत डायर ओरडला, “फायर”..
बेछूट गोळीबार होऊ लागला. लोकं घाबरून पळण्याचा प्रयत्न करू लागली पण जाणार तरी कुठे? सगळ्या बाजूने बाग बंद आणि बाहेर जाण्याच्या रस्त्यावर डायर 90 बंदुकांसह उभा. त्यातच काही लोक एका मोठ्या झाडाच्या मागे जाऊन लपली. डायरने ते पाहीले आणि त्या झाडावर गोळीबार करायला लावला. काही सैनिक हवेत फायर करत होते, डायरला हे समजताच त्या सर्वांना खाली बसायला लावून फायर करण्याच्या ऑर्डर्स दिल्या.
अक्षरशः दहा मिनिट हा नरसंहार चालला.
पहिल्या महायुद्धाचा अनुभव असलेले काही सैनिक त्या बागेत उपस्थित होते. ‘खाली झोपा,जमिनीवर झोपा’ म्हणत ते लोकांना ओरडून सांगू लागले पण ऐकतोय कोण? चेंगराचेंगरी झाली. बाजूच्याच एका आडामध्ये लोकांनी उड्या मारल्या. साऱ्या बागेत मृतदेहाचा खच झाला. रक्तामातीचा चिखल तयार झाला.
1,650 राऊंड फायर करूनच डायर थांबला. मृतांचा आकडा हजारांच्या वर होता. जखमी झालेल्यांची तर विचारणाच नको. डायरच्या मशीनगन्स बागेपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, नाहीतर काय घडले असते याची कल्पनाच न केलेली बरी.
जालियनवाला बागेच्या हत्याकांडाला सर्वस्वी जबाबदार दोन व्यक्ती.. ओडवायर आणि डायर..
आपल्या पुस्तकात मायकल ओडवायरयाने अमृतसर हत्याकांडावर तीन पानांमध्ये वृत्तांत सादर केलाय. त्यापैकी एकाही ठिकाणी ओडवायरने डायरला स्वता ऑर्डर दिल्याविषयी लिहीले नाही.
अमृतसरमध्ये जे काही झालं, ते त्याला डायरच्या मिलिटरी रिपोर्टवरून समजलं, असे लिहीले. त्या मिलिटरी रिपोर्टमध्ये डायरने लिहीले होते,
‘जेव्हा मी बागेत गेलो, तेव्हा माझ्यासमोर पाच हजारांच्या वर लोकं होती. ते आमच्यावर कधीही हल्ला करू शकतील म्हणून मी पटकन फायरिंगच्या ऑर्डर दिल्या. त्यात फक्त 200 ते 300 च लोक मेले. माझ्याकडून केवळ 1650 राऊंडस झाडण्यात आले.’
सर्वात महत्वाचे म्हणजे, ओडवायर डायरच्या या कृत्याचे समर्थन करताना लिहीतो,
‘डॉक्टर किचलू यांनी अतिशय विस्फोटक परिस्थिती करून ठेवली आहे. लोकं रस्त्यावर उतरून दंगे करत आहेत. जालियनवाला बागेत जमलेल्या लोकांमागे हीच भावना होती. जरी ते शांतताप्रिय असले तरी त्यांनी पुढे जाऊन पंजाबात दंगे केलेच असते.’
एवढंच करून ओडवायर थांबला नाही. डायरला पुढे जाऊन चौकशीच्या ससेमिराला सामोरे जावे लागले. त्यावेळेस देखील डायरच्या समर्थनार्थ ओडवायर उतरला.
‘9,10 आणि 11 एप्रिलला साऱ्या पंजाब मध्ये रेल्वेरूळ उखडण्यात आले. विद्युतवाहिन्या तोडल्या.सगळीकडे अराजक परिस्थिती निर्माण झाली. 13 एप्रिलला डायर जेव्हा जालियनवाला बागेत पोहोचला, तेव्हा आठ लोकांनी व्यासपीठावर भाषण ठोकले होते, त्यापैकी सहा जणांवर अतिशय गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेले होते. पुढे जाऊन या समूहाने पंजाबमध्ये उद्रेक केला नसता कशावरून? आपली सत्ता अबाधित राहण्यासाठीच डायरने हे कृत्य केले आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही.’
म्हणजे ओडवायरने सरळसरळ डायरच्या कृत्याचे समर्थनच केले. एवढेच नव्हे, तर अमृतसर मध्ये होणाऱ्या विस्फोटक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच ही सगळी खटपट होती,हे ओडवायरचे मत.
डायरने नोकरीतून राजीनामा देण्यास विरोध दर्शवला. ‘मी जे केलं ते माझे कर्तव्य होते. त्यासाठी मला अजिबात खेद वाटत नाही’ या शब्दात डायरने आपल्या कृत्याचे समर्थन केले. आपल्या मशीनगन्स बागेपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, याचे त्याला वाईट वाटत होते.
ओडवायरने तर पंजाबच्या विस्फोटक परिस्थितीला किचलू आणि त्यांच्या साथीदारांनाच वेठीस धरले. वास्तविक, डॉ.किचलू यांना आधीच अटक केलेली.पंजाब 20 मार्च पासून अशांत होता.. आणि जालियनवाला बागेची घटना 13 एप्रिलची.
आपल्या कृत्याचे समर्थन करणारा डायर शेवटी सडून मेला. त्याची काळजी घेणारादेखील कुणी जवळ नव्हता. इकडे मायकल ओडवायरला सरदार उधमसिंहांनी यमसदनी धाडले. जालियनवाला बागेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळेच वळण दिले.
- केतन पुरी
हे ही वाच भिडू.
- गेली ९९ वर्ष एक बंगाली कुटुंब पंजाबमधल्या जालियनवाला बाग स्मारकाची देखभाल करतंय.
- उधमसिंग आणि भगतसिंग यांच्यात कमालीच साम्य होतं.
- महाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.