मराठवाड्यातील महापुराला जलयुक्त शिवार योजनेला का जबाबदार धरण्यात येत आहे?
विदर्भ-मराठवाडा हा तसा महाराष्ट्राचा कोरडा भाग. त्यामुळे आतापर्यंत इथे दुष्काळ आल्याचंच किंवा जाहीर झाल्याचं जाहीर आपण ऐकलं आहे. ते इथं राहणाऱ्या लोकांना देखील सवयीचं झालं आहे. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या या भागामध्ये गुलाब चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणवार झालेल्या पावसानं हाहाकार उडवला आहे. विशेषतः मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने महापुराची स्थिती ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे.
एका बाजूला हि परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील या महापुरावरुनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या महापुरासाठी सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेला जबाबदार धरण्यात येत आहे. महापुराची कारण शोधताना पर्यावरण अभ्यासक आता या योजनेकडे बोट दाखवू लागले आहेत.
काय म्हणत आहेत पर्यावरण तज्ञ?
सध्या मराठवाड्यातील गावे जलमय झाली आहे. नद्या-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर आलं आहे. धरणं भरली आहेत. शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे. पण महापुराच्या याच परिस्थितीला जलयुक्त शिवार हि योजना जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी या योजनेतील कामांची चौकशीची देखील मागणी केली आहे.
देऊळगावकर याबाबत ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,
जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. त्यावेळीच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करु नका, आता त्याची फळं आपण भोगत आहे.
आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केले जाते. सर्व काम बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे.
भाजपने या आरोपांना काय उत्तर दिले आहे?
अतुल देऊळगावकर यांनी महापुरासाठी जलयुक्त शिवार योजनेला जबाबदार धरल्यानंतर भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतुल देऊळगावकर यांना मनोरुग्णालयात पाठवा, जलयुक्त शिवार चांगली योजना आहे, असं प्रत्युत्तर दिले आहे.
तर एखाद-दुसरे काम खराब झाले असेल, तर संपूर्ण योजनेला दोष देणे चुकीचे आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे म्हणणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे, असं म्हणतं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील देऊळगावकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
गतवर्षी देखील या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅगच्या अहवालात चार जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याची सांगितले होते. त्यामुळे देखील या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तर त्यानंतरच ऑक्टोबर महिन्यात ठाकरे सरकारने जलयुक्त कामांच्या चौकशीसाठी SIT गठित केली होती.
२८ पॅटर्न आणि १४ योजना एकत्रित करून जलयुक्तची सुरुवात करण्यात आली होती.
राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी डिसेंबर २०१४ मध्ये राज्य सरकारने जलयुक्त शिवार या योजनेला सुरुवात केली. यासाठी राळेगण पॅटर्न, शिरपूर पॅटर्न, हिवरेबाजार पॅटर्नसह सुमारे २८ पॅटर्न आणि १४ योजना एकत्रित केल्या. या योजनेच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले.
२०१९ पर्यंत राज्यातील १८ हजार गावांना या योजनेचा लाभ देणार असल्याचा दावा तत्कालीन सरकारने केलाहा होता. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी भागाला प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारी हि योजना असल्याचे सांगत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना प्रोजेक्ट केली होती.
हे हि वाच भिडू
- जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली का..? सरपंच काय म्हणतायत वाचा..
- महाराष्ट्रातल्या या गावात फक्त पाणी आणण्यासाठी म्हणून लोक ३-३ लग्न करतात
- मराठवाड्यात नुकसान व्हायचं तितकं झालं आता भरपाईचं काय ?