बडोद्याच्या महाराणींना ब्रिटिश सरकारने क्राऊन ऑफ इंडिया ही पदवी दिली होती

जमनाबाई गायकवाड या बडोदा संस्थानच्या राणीसाहेब होत्या.

संस्थानिक माननीय सयाजीराव गायकवाड यांच्या त्या मातोश्री. अशा जागतिक कीर्ती लाभलेल्या यशस्वी राजाच्या जडणघडणीत आईचा वाटा हा निश्चितच मोठा होता म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे व मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात त्यांचे योगदान मोठे असते हीच गोष्ट सातत्याने जाणवत राहिली म्हणून जमनाबाईंची माहिती देण्याचा हा प्रयत्न..

१८५३ मध्ये  सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्या गावातील माने घराण्यात जनाबाईंचा जन्म झाला.

त्यांचे माहेरचे नाव तान्हीबाई. बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या जमनाबाई हि तिसरी पत्नी होत्या. खंडेरावांचे ब्रिटिशांसोबत चांगले सबंध होते म्हणून ब्रिटिश सरकारने अनेक सवलती विशेषतः गायकवाडांच्या घराण्याला वारस नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार दिला होता असं म्हणले जाते.

जनाबाईंच्या सोबत लग्न झाल्यानंतर खंडेराव यांनी जनाबाईंच्या शिक्षणाची व्यवस्था केली.  लेखन-वाचन आणि गृहिणी म्हणून आवश्यक असणारी कला,कौशल्य याचे शिक्षण त्यांना दिले गेले.

 

राजवाड्यातील जीवन बाहेरून जरी आकर्षक आणि वैभवी वाटत असले तरी तेथील जीवन अस्थिर असतं.

कधी कुणावर काय संकट येईल हे सांगता येत नाही. जनाबाईंच्या आयुष्यात असंच झालं. १८७० मध्ये खंडेराव यांचे आकस्मिक निधन झाले. लग्नाच्या सातच वर्षानंतर जनाबाई विधवा झाल्या. खंडेराव नंतर जनाबाईंचा दीर मल्हाररावांना राजेपद मिळालं आणि जनाबाईंना राजवाडा सोडावा लागला.

परिस्थिती एवढी बिकट होत चालली की त्यांना बडोदा सोडून पुण्याला जाऊन राहावं लागलं होतं. खंडेरावांच्या निधनावेळेस जमनाबाई गरोदर होत्या. त्यामुळे नव्याने जन्माला येणाऱ्या जीवाची जबाबदारी संपूर्णपणे जमनाबाई यांच्यावर होती. हळूहळू काळ बदलत गेला आणि त्यांची राणीपद  त्यांना परत मिळाले. त्यानंतर १८७५ मध्ये त्यांनी सयाजीरावांना दत्तक घेतले. योग्य मुलाची निवड करणे आणि त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करणे अत्यंत महत्वाचे होते.

अल्पवयीन राजपुत्राला वाईट राजकारणापासून दूर ठेवूणे हे त्यांच्यासाठीची मोठी जोखीम होती. पण त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. त्यासाठी त्यांना संस्थानचे दिवाण सर टी. माधराव व ब्रिटिश रेसिडेंट मिड यांची मदत झाली. राजपुत्र सयाजीराव सज्ञान होईपर्यंत संस्थांनचा कारभार पाहणे ही जबाबदारी जनाबाई यांच्यावर होती.

खरं सांगायचं झालं तर भारतीय स्त्री ही संधी मिळाली तर यशाचं शिखर गाठू शकते. हेच जमनाबाईंनी दाखवून दिलं.

या मराठा महाराणीला ब्रिटिश सरकारने क्राऊन ऑफ इंडिया ही पदवी दिली होती. 

जमनाबाईंना ‘क्राउन ऑफ इंडिया’ हिंदुस्थानचा मुकुटमणी हा किताब विलायतच्या राणी सरकारने ६  जुलै १८७८ रोजी बडोद्यास एजंट साहेबांच्या मार्फत दिला गेला. त्या समारंभाची हकीकत सर टी. माधवराव यांनी आपल्या वार्षिक रिपोर्ट मध्ये लिहिली आहे,

सर टी म्हणतात ते त्यांच्याच शब्दांत,

तारीख ६ जुलै १८७८ रोजी आकाश अगदी निरभ्र होते. तिसऱ्या प्रहरी नजरबागेच्या वाड्याजवळ फौंजेचे लोकं उभे केले होते. रस्त्यात प्रेक्षकांची गर्दी झाली होती. राजवाड्यात दरबारचा दिवाणखांना सरकारी कामदार व नोकर यांनी गच्च भरून गेला होता. दिवाणखाण्याच्या मागच्या अंगाला महाराणी जमनाबाई बसल्या होत्या. त्याजपाशी मेलव्हील साहेबांची पत्नी लेडी मेलव्हील बसल्या.  कापांतील इतर युरोपीयन गृहस्थ यांच्या गाड्या लहरीपूर दरवाजाजवळ येऊन पोहोचल्या. तेथे दिवाणांनी सर्वांचे स्वागत केले. तेथून मंडळी हत्तीवर आरोहण करून राजवाड्याजवळ येऊन पोहचताच तोफांची सलामी झाली.

बँडबाजा वाजत होता. महाराजसाहेब सामोरे जाऊन एजंटसाहेब दिवाणखाण्यात घेऊन गेले. नंतर असिस्टंट एंजंटसाहेब लाटसाहेबांचा खलिता वं किताबाचा चांद घेऊन आले. त्यांना महाराजसाहेब व एजंटसाहेब सामोरे जाऊन महाराणी जमनाबाई यांकडे घेऊन गेले. तेथे गेल्यावर मेलव्हील साहेबांनी लेडी मेलव्हील यांच्या हातून खलित्याचे भाषांतर सर टी. माधवराव यांनी वाचून दाखवले. त्याबद्दल मांसाहेबांनी राणीसरकारचे आभार मानले. त्यावेळेस पुनः तोफांची सरबत्ती झाली. सर्व मंडळी मग थोरल्या दिवाणखाण्यात आल्यावर मेलव्हील साहेबांनी उभे राहून आलेला खलिता दरबारात मोठ्याने वाचून दाखवला. सर्वच जण मांसाहेबांना मिळालेल्या किताबामुळे आनंदात होते.

संदर्भ – कै. श्रीमंत महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.