मुख्यमंत्री होण्यासाठी जांबुवंतराव धोटे सिनेमात हिरो झाले परंतु झालं भलतंच…

जांबुवंतराव धोटे हे नाव जरी घेतलं तरी अनेक जण नुसता धसका घेतात…

उंच पुरा देह, काळी दाट दाढी, धोतर नी बंगाली घातलेला एकदम रागीट चेहरा, मनगटात मोठा कडा. जांबुवंतरावांचा हात जर एखाद्यावर पडला तर माणूस क्षणात देवाच्या दारी जाईल असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.

एकदा जांबुवंतराव धोटे यांनी विधानसभेत रंगाच्या भारत चक्क पेपरवेटच फेकला होता. त्यामुळे विधानसभेत असं भयानक काम करणारा माणूस बाहेर काय करेल याचा काही नेम नव्हता. निव्वळ जांबुवंतरावांचा रागच नाही तर अभ्यासही दांडगा होता. जांबुवंतरावांनी वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्यांना अभ्यासू भाषणांच्या आधारावर सळो की पळो करून सोडलं होतं.  

त्यामुळे जेव्हा जेव्हा जांबुवंतराव कुठे जायचे तेव्हा सगळीकडे एकच वाक्य घुमायचं.

आया रे आया शेर आया… 

जांबुवंतराव धोटे यांनी वेगळ्या विदर्भासाठी जितका लढा दिला होता, तितका लढा दुसऱ्या कोणत्याच नेत्याने दिला नव्हता. त्यामुळे विदर्भात गेल्या १०० वर्षात सगळ्यात जास्त प्रेम आणि मानसन्मान तो केवळ आणि केवळ जांबुवंतरावांना मिळाला होता.

जांबुवंतरावांबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळत. कुमार सप्तर्षी यांनी सुद्धा ‘मी पाहिलेले व्यक्तिरंग’ या पुस्तकात जांबुवंतरावांचा एक किस्सा सांगितलाय.

जांबुवंतराव धोटे यांना विदर्भात प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. परंतु जांबुवंतरावांना मात्र विदर्भाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवायची होती. त्यासाठी जांबुवंतरावांनी चक्क जागो नावाचा सिनेमाच बनवला होता.

जांबुवंतरावांनी सिनेमा बनवण्यामागे कारण असं होतं कि, १९८० च्या दशकात एम जी रामचंद्रन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी रामचंद्रन हे अभिनेते होते. 

मुख्यमंत्री होण्यापूर्वी रामचंद्रन यांनी ‘अण्णा’ नावाचा सिनेमा काढला होता. ‘अण्णा’ चा अर्थ होतो थोरला भाऊ! त्याच अण्णा सिनेमामुळे एम जी रामचंद्रन हे तामिळनाडूत प्रसिद्ध झाले होते. 

एम रामचंद्रन यांच्याप्रमाणे आपण सुद्धा एक सिनेमा काढावा आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर थोरल्या भावाप्रमाणे प्रसिद्धी मिळवावी. अशी कल्पना जांबुवंतरावांच्या मनात आली होती. 

त्यामुळे एक सिनेमा बनवण्याचा विचार जांबुवंतरावांच्या मनातं चालू होता. परंतु त्याचदरम्यान जांबुवंतरावांनी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या विवाहित मुलीशी गांधर्व विवाह केलं. जांबुवंतरावांनी चक्क विवाहित बाईशी लग्न करणं ही गोष्ट विदर्भातील बहुसंख्य लोकांना आवडली नव्हती.

कारण समाजात जांबुवंतरावांची प्रतिमा भारदस्त आणि ब्रह्मचारी व्यक्ती अशी होती. परंतु त्यांनी लग्न केलं आणि त्यातही एका विवाहित बाईशी लग्न केलं ही गोष्ट लोकांच्या सहज पचनी पडली नाही. लग्नानंतर जांबुवंतरावांच्या लोकप्रियतेत घट व्हायला लागली होती.

लोकप्रियतेत होणारी घट भरून काढण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी जांबुवंतरावांनी सिनेमा बनवायचं निश्चित केलं. 

जांबुवंतरावांनी सिनेमासाठी कर्ज काढला आणि सिनेमा बनवायला सुरुवात झाली. सिनेमाच्या दिग्दर्शकांनी जसं सांगितलं तसा अभिनय जांबुवंतरावांनी केला. झाडामागे लपले, नायिकेशी पकडापकडी खेळली, वेड्यावाकड्या उड्या मारल्या, बॉलिवूडच्या पद्धतीने डान्स केला. गाणं गायलं आणि अखेर सिनेमा पूर्ण झाला.

अन नंतर व्हायचा तो परिणाम झालाच..

जेव्हा ‘जागो’ सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा लोकांच्या भावनांचा पार चुराडा झाला. आजपर्यंत रुद्र अवतारामध्ये पाहिलेल्या नेत्याचा चेहरा त्यांना बाईच्या मागे धावणाऱ्या स्त्रीलंपटासारखा दिसत होता. मुळात जांबुवंतरावांचा विवाहित बाईशी गांधर्व विवाह लोकांच्या पचनी पडला नव्हता आणि त्यात कहर म्हणजे सिनेमात बाईच्या मागे धावणारा हिरो म्हणून जांबुवंतराव लोकांच्या समोर आले होते.

जांबुवंतरावांना अशा पात्रात पाहून लोकांचा प्रचंड भ्रमनिरास झाला होता. काही काळातच लोकांनी ‘जागो’ सिनेमाकडे पाठ फिरवली. कारण जांबुवंतरावांच्या चाहत्यांना त्यांच्याकडून मनोरंजनाची अपेक्षा नव्हती. त्यांना अपेक्षा होती रांगड्या राजकारणाची. परंतु हे ओळखायला जांबुवंतराव कुठेतरी चुकले होते. 

जांबुवंतरावांना आजपर्यंत डोक्यावर घेणाऱ्या लोकांनी त्यांना सपशेल खाली उतरवलं.

त्यांनतर जांबुवंतरावांचे चाहते कमी झाले. सोबतच त्यांना पुन्हा निवडणूक जिंकून येणे कठीण होऊन बसले. १९६२ पासून १९८५ पर्यंत पाच वेळ आमदार आणि दोन वेळ खासदार राहिलेले जांबुवंतराव १९८५ नंतर पुन्हा कधीच निवडून आले नाहीत.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सिनेमा बनवणारे जांबुवंतराव लोकांच्या नजरेत विदूषक बनून राहिले. त्या प्रतिमेमुळे इतके प्रतिनिधित्व केलेला यवतमाळ मतदारसंघ सुद्धा त्यांना राखता आला नाही. त्यामुळे संभ्रमाच्या भोवऱ्यात अडकून जांबुवंतरावांनी राजकीय आत्महत्त्या केली असं कुमार सप्तर्षी सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.