शाहरुख खान आणि अंजना ओम कश्यप शिकले आहेत ते जामिया विद्यापीठ का जळत आहे?

कालपासून सगळीकडे टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मिडिया सगळीकड एकच नाव ऐकायला मिळतंय, जामिया मिलीया विद्यापीठ. तिथल्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेला नागरिकता सुधारणा विधेयकाचा विरोध दिल्ली पोलिसांनी दडपशाही करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी विद्यार्थीनीना त्यांच्या राहत्या ठिकाणी घुसून करण्यात येत असलेली मारहाण सोशल मिडियावर व्हायरल झाली असून पोलिसांवर जोरदार टीकाही केली जात आहे.

अशा वेळी प्रश्न पडतो ही जामिया मिलीया युनिव्हर्सिटी आहे तरी काय?

१९२० साली  खिलाफत चळवळीने जोर धरला होता. जगभरातल्या मुस्लिमांचा प्रमुख म्हणून ओळखल्या खलिफा ला हटवण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी खिलाफत चळवळ सुरु झाली होती. भारतात देखील सर्वसामान्य मुसलमानांना ब्रिटीशांच्या बद्दल मनात उद्रेक होता.

तेव्हा गांधीजींचे असहकार आंदोलन मूळ धरत होते.

गांधीजींना लक्षात आले की या खिलाफत चळवळीचा फायदा मुस्लीम समाजाला स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करेल. गांधीजींच्याच आग्रहामुळे कॉंग्रेसने या खिलाफत चळवळीला पाठींबा दिला आणि बदल्यात मुस्लीम समाजातील नेते असहकार चळवळीमध्ये उतरले.

गांधीजींचा हा मोहम्मद अली जिना यांच्या विरोधात खेळण्यात आलेला मास्टरस्ट्रोक समजला जातो. याचे काहीही बरे वाईट परिणाम झालेले असोत पण मुस्लीम समाजातील तरुणांना मुस्लीम लीगपासून तोडून कॉंग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याशी जोडण्यात या निर्णयाचा खूप मोठा हात आहे.

यामुळेच काही मुस्लीम विचारवंत गांधीजींच्या विचारांशी जोडले गेले.

मौलाना मोहम्मद अली जोहर, मौलाना महमुद हसन, डॉ.मुख्तार अहमद अन्सारी आणि डॉ.झाकीर हुसेन. या सगळ्यांच्या डोक्यात विचार आला की मुस्लीम विद्यार्थ्यांना एक राष्ट्रीय विचारांशी ओळख करून देणारे विद्यापीठ का सुरु करु नये?

या विद्यापीठाच्या स्थापनेची चर्चा महात्मा गांधी आणि गुरदेव रविंद्रनाथ टागोर यांच्याशी करण्यात आली. त्यांनी पाठींबा दिल्यावर डॉ झाकीर हुसेन म्हणतात,

“जामिया मिलीया ही एक चळवळ असणार आहे जिथे शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रबोधन घडणार आहे.”

२९ ऑक्टोबर १९२० रोजी अलीगड येथे सर्वात जेष्ठ सदस्य मौलाना महमुद हसन यांच्या हस्ते विद्यापीठाचा पाहिला दगड रोवण्यात आला. पुढे काहीच वर्षात विद्यापीठ अलिगढ मधून दिल्लीमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. झाकीर हुसेन यांचा जामिया विद्यापीठ उभे राहण्याच्या प्रत्येक पायरीवर कष्ट घेतले. हे विद्यापीठ मुस्लीम धर्मशास्त्राचा अभ्यास घेणार मदरसा नाही तर आधुनिक शिक्षण देणारी संस्था आहे हे त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांवर ठसवल.

याच विद्यापीठातून अनेक विद्यार्थी गांधीजींच्या मौलाना आझाद यांच्या बरोबरीने अहिंसात्मक आंदोलनात उभे राहू लागले. आधुनिक शिक्षण आपली नजर धर्माच्या चर्चेऐवजी एक मोठी विस्तृत दृष्टी देते या झाकीर हुसेन यांच्या म्हणण्याचे उदाहरण ठरले.

पुढे जेव्हा १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य फाळणीच्या स्वरुपात मिळाले तेव्हा जामियात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतातच राहणे पसंत केले. एकदा भारताच्या जेष्ठ नेत्या सरोजिनी नायडू म्हणाल्या होत्या,

They built up Jamia Millia Islamia, stone by stone, sacrifice by sacrifice.

या विद्यापिठाचा प्रत्येक दगड त्यागाने उभा राहिला आहे. आणि ते खरच आहे. आजही या आंदोलनातून उभे राहिलेल्या विद्यापीठाची ओळख तिथल्या चळवळ्या विद्यार्थ्यांमुळे आहे.

येथून शिकून गेलेल्या पैकी काही सुप्रसिद्ध नावे म्हणजे शाहरुख खान पासून किरण राव पर्यंत, लवलीन टंडन पासून हबीब फैझल पर्यंत, वीरेंद्र सेहवाग पासून हॉकी प्लेअर गगन अजित सिंग, बरखा दत्त पासून अंजना ओम कश्यप पर्यंत अनेक विद्यार्थी आजही जामिया मिलीया इस्लामियाविद्यापीठाचे नाव रोशन करत आहेत.

१९८८ साली कायदा करून जामिया मिलीयाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. 

आज जामिया मिलीया विद्यापीठाचा भारतातील सर्वोत्तम विद्यापीठात समावेश करण्यात येतो. येथील ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ जगात प्रसिद्ध मानले जातात. दरवर्षी फक्त मुस्लीमच नाही तर हिंदू शीख ख्रिश्चन समाजातील हजारो विद्यार्थी येथून पास होतात.

आंदोलन हा इथला पाया आहे. ब्रिटीशांच्या विरुद्ध लढलेल्या अगणित स्वातंत्र्यवीरांचा इतिहास या विद्यापीठाला आहे. आजही येथे एका सुप्रसिद्ध गाण्यातील वाक्य सांगितलं जात,

“तूफ़ान से लाए हैं हम यह कष्ती निकाल के

इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.